Skip to main content
x

सिरूर, शांताराम शंकर

              शांताराम शंकर सिरूर यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील हुबळी येथे झाला. त्यांचे बंगलोर येथे इंग्रजी, कन्नड व संस्कृत विषय घेऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी १९२३मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९२६मध्ये बी.एजी. पदवी अहमद मॅन सुवर्णपदकासह प्राप्त केली.  सिरूर महाविद्यालयाच्या क्रिकेट, व्हॉलीबॉल व टेनिस संघाचे खेळाडू होते. ते अभिनय व सतारवादन यामध्येही प्रवीण होते.

              महाराष्ट्रात आल्यावर मराठी आत्मसात करून या भाषेत ते वाचन, लेखन व भाषण उत्तम रीतीने करत असत. सिरूर यांनी कृषी खात्यात कनिष्ठ प्रयोगशाळा मदतनीस या पदावर नोकरीची सुरुवात करून ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व कापूस संशोधन केंद्र, सुरत येथे कृषि- संशोधनाचा अनुभव घेतला. त्याच दरम्यान त्यांनी कृषि- रसायनशास्त्रात एम.एजी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांची १९४३मध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात मृदा सर्वेक्षण अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली. शेतजमिनीचे सर्वेक्षण, वर्गीकरण, खारवट जमिनींचा अभ्यास व सुधारणा, जमिनीची सुपीकता, ऊस उत्पादनवाद इ. विषयांवर महत्त्वाचे संशोधन करून त्याविषयीचे शेतकर्‍यांना उपयुक्त होतील असे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.

              सिरूर यांनी १९५२पासून मृदा-भौतिकशास्त्रज्ञ व मृदा-विशेषज्ञ या पदांवर कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर येथे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले व भारतातील कोरडवाहू शेती या पुस्तकाची लिहिलेली पुरवणी आय.सी.ए.आर.ने प्रकाशित केली. मुंबई प्रांताच्या कृषी खात्यात ३० वर्षे कार्य केल्यानंतर राज्यपुनर्रचनेमुळे १९५६मध्ये त्यांची कृषि-रसायनशास्त्रज्ञ, कर्नाटक राज्य या पदावर नेमणूक करण्यात आली होती व १९५९मध्ये ते सेवानिवृत्त झाले. उत्पत्तीच्या आधारे (जेनेटिक) उसाखालील जमिनींचे ए ते एल या प्रकारांत वर्गीकरण करून व त्या वर्गाच्या वैशिष्टयानुसार ऊस लागवडीसाठी वैशिष्ट्यपूर्ण संस्कार हे डॉ. बसूंच्या समवेत त्यांनी केलेले संशोधन महाराष्ट्राच्या ऊस शेतीसाठी महत्त्वाचे योगदान ठरले.

              सेवानिवृत्तीनंतर सिरूर यांनी फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे दिल्ली येथे शास्त्रज्ञ सल्लागार म्हणून काम पाहिले. तसेच फर्टिलायझर न्यूज या प्रकाशन मासिकाचे संपादकपद त्यांनी सलग १० वर्षे सांभाळले. या काळात त्यांनी रासायनिक खतांच्या माहितीचा प्रसार, निरनिराळ्या पिकांवरील पुस्तिका इ. अनेक उपयुक्त प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

सिरूर, शांताराम शंकर