Skip to main content
x

शिरवाडकर, विष्णू वामन

कुसुमाग्रज ,तात्यासाहेब शिरवाडकर

     वि. वा. शिरवाडकरांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील गजानन रंगनाथ शिरवाडकर हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत येथे वकिली करीत असत. शिरवाडे येथील चुलत घराण्यात दत्तक विधान झाल्यावर त्यांचे नामांतर विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. त्यांनी काव्यलेखनासाठी कुसुमाग्रज हे नाव स्वीकारले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव आणि नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल (आत्ताच्या रुंगठा हायस्कूल) येथे झाले.

     याच काळात नाटकातली पहिली भूमिका त्यांनी केली. देवदत्त नारायण टिळक यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणार्‍या ‘बालबोधमेवा’मध्ये त्यांनी कविता लेखनास आणि गद्यकेली. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी हं. प्रा. ठा. महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९३३ मध्ये ‘धु्रवमंडळा’ची स्थापना केली. त्याच सुमारास ‘रत्नाकर’ मासिकात कविता लिहिल्या आणि ‘नवा मनू’ या वृत्तपत्रात वृत्तपत्रीय लेखन केले. १९३४ साली बी.ए. होण्यापूर्वी शिरवाडकरांनी आपल्या ‘जीवनलहरी’ ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ‘धु्रवमंडळा’तर्फे केले. १९३६-१९३८ या काळात ‘गोदावरी सिनेटोन’ ह्या चित्रपट संस्थेत प्रवेश करून त्यांनी ‘सती सुलोचना’ चित्रपटाचे कथा-लेखन केले आणि त्याच चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका केली.

     १९३८-१९४६ या सात वर्षांत ‘साप्ताहिक प्रभा’, ‘दैनिक प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ या नियतकालिकांत काम केले. १९४४ साली गंगूबाई सोनवणी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीचे सासरचे नाव ‘मनोरमा’ असे ठेवले. शिरवाडकरांनी नंतरची दोन वर्षे ‘स्वदेश’चे संपादक म्हणून काम केले. १९४२ साली वि.स.खांडेकरांनी कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ कवितासंग्रह प्रस्तावनेसह प्रसिद्ध केला. १९४६ साली ‘वैष्णव’ ही पहिली कादंबरी  आणि ‘दूरचे दिवे’ हे पहिले नाटक प्रसिद्ध झाले. त्यानंतर मात्र अन्य कोणतीही नोकरी न स्वीकारता फक्त साहित्य निर्मिती आणि शालेय पुस्तकांचे संपादन यांत त्यांनी उर्वरित काल व्यतीत केला. त्याच दरम्यान नाशिक ‘लोकहितवादी मंडळा’ची स्थापना केली. या संस्थेद्वारे आणि अन्य उपक्रमांत सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा नाशिकच्या सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक कार्यावर ठसठशीतपणे उमटवला.

     १९५९मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील सहभाग, १९६४ मधील मडगाव येथील ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद, ‘नटसम्राट’ नाटकाला १९७४ साली मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार ह्या कुसुमाग्रजांच्या १९७० पूर्वीच्या आयुष्यातील ठळक घटना आहेत. १९७२ साली पत्नीचे- मनोरमाबाईंचे निधन ही त्यांना एकाकी करणारी घटना होती.

     अनेक मानसन्मानांनी कुसुमाग्रजांना गौरवण्यात आले. २ नोव्हेंबर१९८५मध्ये पुणे विद्यापीठाची डी. लिट. ही प्रतिष्ठेची पदवी; २० डिसेंबर १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती; ११ऑगस्ट१९८९ मध्ये मुंबई येथील पहिल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद; १९९२ पासून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे कुसुमाग्रजांच्या गौरवार्थ प्रतिवर्षी नवोदितांच्या काव्यसंग्रहांस ‘विशाखा पुरस्कार’ देण्यास प्रारंभ. याशिवाय कुसुमाग्रजांच्या ‘मराठी माती’ (१९६०) ‘स्वगत’ (१९६२), ‘हिमरेषा’ (१९६४) या काव्यसंग्रहास आणि  ‘ययाती आणि देवयानी’ (१९६६), ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांना राज्यपुरस्कार मिळाले आहेत.

     मुंबई येथे ११ मार्च १९८९ रोजी शानदार समारंभात कुसुमाग्रजांना राष्ट्रीय पातळीवरील ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. वि.स.खांडेकरांनंतर राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलेले कुसुमाग्रज हे दुसरे मराठी भाषक साहित्यिक आहेत. त्यांच्यासारख्या सत्त्वशील, तत्त्वनिष्ठ आणि अभिजात कवीला भारतीय पातळीवर लाभलेल्या सन्मानामुळे नाशिकलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाचे उधाण आले.

     कुसुमाग्रजांच्या विपुल साहित्यकृतींची संक्षेपाने नोंद घ्यायला हवी. १३ कवितासंग्रह (त्यात एक संस्कृत ‘मेघदूत’ या खंडकाव्याचा अनुवाद), १९ नाटके, ३ एकांकिका संग्रह, ३ नाटके, ६ कथासंग्रह, ६ लघुनिबंध/ ललित संग्रह, काही बालकविता, बालसाहित्याचे संग्रह, निवडक साहित्यविषयक पुस्तके आणि संपादने इत्यादी. तसेच कुसुमाग्रजांच्या कविता, कथा, बालकविता या वाङ्मय प्रकारांतील इतर अभ्यासकांनी केलेली संपादने प्रकाशित झाली आहेत. ती अशी - ‘रसयात्रा’ (संपादक: बा.भ.बोरकर, शंकर वैद्य), ‘प्रवासी पक्षी’ (संपादक: शंकर वैद्य), ‘माधवी’ (संपादक: शांता शेळके), ‘कुसुमाग्रजांच्या बारा कथा’ (संपादक: बा.वा. दातार), ‘वि.वा.शिरवाडकर: निवडक कथा’ शांता शेळके, ‘बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज’ पद्मा मोरजे; अशी आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘काव्यवाहिनी’ खंड पहिला, दुसरा, तिसरा व चौथा ही संपादने रा.श्री. जोग यांच्या सहकार्याने तयार केली आहेत. ‘सुवर्णनौका’ व ‘साहित्य सुवर्ण’ ही संपादने वा.रा.ढवळे यांच्या सहकार्याने सिद्ध केली आहेत. कुसुमाग्रजांच्या साहित्य निर्मितीवर अनेक लेख प्रसंगपरत्वे आणि साठीपंचाहत्तरीच्या निमित्ताने विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत; पाच अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर पी.एचडी.साठी प्रबंध सादर केले आहेत. रंगमंचावर कवितांचे सादरीकरण करण्यात आले आहे. ‘प्रवासपक्षी’ हा अनुबोधपट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे नाट्यदिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तयार केला आहे.

     ‘जीवनलहरी’ (१९३३), ‘विशाखा’ (१९४२), ‘मराठी माती’ (१९६०), ‘स्वगत’ (१९६२), ‘हिमरेषा’ (१९६४), ‘मुक्तायन’ (१९८४), ‘दूरचे दिवे’ (१९४६), ‘दुसरा पेशवा’ (१९४७), ‘कौंतेय’ (१९५३), ‘राजमुकुट’ (१९५४), ‘अ‍ॅथेल्लो’ (१९६१), ‘ययाती देवयानी’ (१९६६), ‘वीज म्हणाली धरतीला’ (१९७०), ‘नटसम्राट’ (१९७१)च्या पहिल्या आवृत्तीनंतर १९९६ पर्यंत चौदा आवृत्त्या प्रकाशित); ही नाटके आणि ह्या एकांकिका. ‘दिवाणी दावा’ (१९५४), ‘नाटक बसते आहे’ (१९६१); ‘वैष्णव’ (१९४६), ‘जान्हवी’ (१९५२), ‘कल्पनेच्या तीरावर’ (१९५६); ‘फूलवाली’ (१९५०), ‘सतारीचे बोल’ (१९५२);  ‘आहे आणि नाही’ (१९५७), ‘विरामचिन्हे’ (१९७०), ‘एकाकी तारा’ (१९८२).

     बालवाङ्मय

     ‘जाईचा कुंज’ (१९३६), ‘जादूची होडी’ (१९४२), ‘छोटे आणि मोठे’ (१९५३); ‘श्रावण’ (१९८५).

     काव्यसंग्रह

     शिरवाडकरांच्या विविध आयामी लेखनात महत्त्वाचे ठरणारे मराठी साहित्याचे स्वयंपूर्ण स्थान असलेले लेखन म्हणजे कुसुमाग्रज ह्या नामनिर्देशाखालील त्यांचे काव्यलेखन ‘जीवन लहरी’ (१९३३) आणि ‘विशाखा (१९४२) ते ‘मारवा’ (१९९९) या काव्यसंग्रहापर्यंतचा त्यांचा काव्यलेखनप्रवास हा विकसनशील प्रवास आहे. तीव्र आणि प्रखर सामाजिक जाणीव, असीम ध्येयनिष्ठा आणि आदर्शवादाची जोपासना करणारी कुसुमाग्रजांची कविता उत्तरोत्तर अधिक जीवनसन्मुख, मानवकल्याणाची आकांक्षा बाळगणारी आणि चिंतनात्मक झाली. ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘क्रांतीचा जयजयकार’, ‘स्वप्नाची समाप्ती’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘स्मृती’ या रसिकप्रिय कवितांमुळे ‘विशाखा म्हणजे कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रज म्हणजे विशाखा’ असे समीकरण तयार झाले. त्यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह मराठी काव्यप्रवाहातील एक वाङ्मयीन लक्षणीय घटना आहे. या संग्रहाने एकाच वेळी मराठी कवितेला समाजसन्मुख करण्याचा आणि समाजाला काव्यसन्मुख करण्याचा अलौकिक विक्रम केला. सामाजिकतेचे अधिष्ठान असलेल्या कवितांप्रमाणे प्रेमभावना प्रकट करणार्‍या कविता कुसुमाग्रजांनी लिहिल्या आहेत. ‘विशाखा’ संग्रहापासून ‘पाथेय’ पर्यंत कुसुमाग्रजांनी बर्‍याच प्रेमकविता लिहिल्या आहेत. त्यांची कविता पुढे अधिकाधिक निर्मोहाकडे गेली आहे.

     ‘प्रेमयोग’ ह्या कवितेत त्यांनी प्रेमाचे व्यापक तत्त्वज्ञान सांगितले आहे. ते प्रेमाकडे विशाल दृष्टिकोनातून पाहतात. प्रेमभावनेची संकुचित कक्षा ओलांडून जातात. जगासकट जगदीश्वराला, अवघ्या ब्रह्मांडाला ते प्रेमप्रदेशात सामावून घेतात. कुसुमाग्रजांची बरीचशी कविता आरंभापासून आजतागायत सामाजिक जाणीव व्यक्त करणारी कविता म्हणून अवतरली आहे. केशवसुतांच्या कवितेशी नाते जोडणारी ही कविता केशवसुतांच्याही पुढे गेली आहे. तसेच  मराठीतील उत्तरकालीन कवितेचे ती प्रेरणास्रोत ठरली आहे. सामाजिक- राजकीय जीवनातील विसंगतीवर परखडपणे भाष्य करणारी कुसुमाग्रजांची कविता ‘जीवननिष्ठ’ कविता आहे. समग्र जीवनशोध हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे.

     नाटक व एकांकिका

     १९४६ ते १९९६ या पाच दशकांच्या कालावधीत शिरवाडकरांनी नाटकांचे योगदान दिले आहे. स्वतंत्र, भाषांतरित, रूपांतरित, आधारित अशा नाटकांमध्ये गडकरी-खाडिलकरी पद्धतीची नाटके सादर करून मराठी नाट्यपरंपरेतील सत्त्व आणि स्वत्व त्यांनी टिकवून ठेवले. भाषांतरित वा रूपांतरित नाट्यलेखनातही त्यांची स्वतःची अशी दृष्टी आहे. भाषांतराबाबतची त्यांची दृष्टी व्यावसायिकाची नाही, केवळ हौशी नाटककाराची नाही. ती नाटक  ह्या वाङ्मयप्रकारावर अंतर्मनातून प्रेम करणार्‍या अस्सल कलावंताची आहे, अभिजात आहे. ‘दूरचे दिवे’, ‘दुसरा पेशवा’, ‘कौंतेय’, ‘ऑथेल्लो’ ‘ययाती आणि देेवयानी’ आणि ‘नटसम्राट’ ह्या त्यांच्या नाटकांचा निर्देश प्रातिनिधिक नाटके म्हणून करता येईल. शिरवाडकरांच्या सर्व नाटकांतील अधिक प्रयोग झालेले, महाराष्ट्रभर नव्हे तर अन्यत्रही गाजलेले बहुचर्चित नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विशेष म्हणजे प्रेक्षक, नट, दिग्दर्शक, समीक्षक यांनाही या नाटकाचे आकर्षण वाटत आले आहे. श्रीराम लागूंप्रमाणेच दत्ता भट, चंद्रकांत गोखले, सतीश दुभाषी, मधुसूदन कोल्हटकर, यशवंत दत्त आणि उपेंद्र दाते आदी नामवंत अभिनेत्यांनी त्यांना काकासाहेब गणपतराव बेलवलकरांची नटसम्राटमधील भूमिका व अभिनय सर्वस्व पणाला लावून केली आहे. मराठीतील नाट्यसमीक्षकांनी आणि साहित्यसमीक्षकांनी ‘नटसम्राट’ नाटकाचे मूल्यमापन आपापल्या परीने केले आहे; मतमतांतरांना, अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियांना अवसर अनेक प्रश्न निर्माण करणारे, प्रयोगनिर्मितीसंबंधी पुनर्विचार करायला लावणारे नाटक म्हणून ‘नटसम्राट’ची नोंद उद्याच्या वाङ्मयेतिहासात व नाट्यसृष्टीच्या इतिहासात अभिमानपूर्वक घेतली जाणार आहे.

     कथा, कादंबरी व ललितगद्य

     कथाकार आणि ललितगद्य लेखक म्हणून शिरवाडकरांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कविता आणि नाट्यलेखनाला जशी स्वानुभवाची पार्श्वभूमी आहे, तसेच स्फुट लेखनाला आहे. त्यांचे ललितगद्य लेखन भाष्यपर आहे. त्याला चिंतनशीलतेची डूब मिळाली आहे. शिरवाडकर निसर्गसौंदर्याचा शोध तन्मयतेने घेतात. बालकवी, विनोबा भावे, बाबा आमटे ह्यांच्यासारख्या मान्यवरांविषयी असलेली आस्था त्यांच्या गद्यलेखनात व्यक्त होते. साहित्यातील सौंदर्य, साहित्यातील वैफल्य, विकृती, साहित्य आणि नीतिमत्ता, साहित्यातील संस्कारशीलता अशा साहित्यविषयक पैलूंवर त्यांनी ललित-लेखनात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

     शिरवाडकरांनी उमेदीच्या काळात काही वर्षे पत्रकारिता केली. पुण्याला ‘प्रभात’मध्ये नोकरीस असताना त्यांनी रात्रपाळीच्या धबडग्यात ‘गर्जा जयजयकार’ ही कविता लिहिली. ‘सकाळ’चे नानासाहेब परुळेकर, ‘प्रभात’चे वालचंद्र कोठारी, ‘सारथी’चे खंडेराव दौंडकर, ‘धनुर्धारी’चे प्रभाकर पाध्ये आणि अ.सी. केळूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवाडकरांनी वृत्तपत्रविद्येचे धडे गिरवले. वृत्तपत्रात लिहिणे त्यांनी दुय्यम मानले नाही. वृत्तपत्र ही  एका कलावंतासारखी समाधान देणारी निर्मिती आहे, असा अभिप्राय व्यक्त करणार्‍या वि.वा. शिरवाडकरांनी अल्पकाळातच वृत्तपत्रसृष्टी सोडली आणि स्वतंत्रपणे लेखन करण्याचा निर्णय घेतला.

     शिरवाडकरांजवळ निर्मत्सरी, निरहंकारी, निर्मळ आणि विशुद्ध माणुसकी मानणारे प्रगल्भ मन होते. माणुसकी, प्रेम, सत्य, सौंदर्य, शिवम् या चिरंतन मूल्यांशी त्यांची बांधीलकी होती. सत्कार समारंभ, गौरव आणि मानसन्मान यांपासून नेहमीच दूर राहणार्‍या शिरवाडकरांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून नाशिक परिसरातील त्यांच्या सुहृदांनी, चाहत्यांनी २६मार्च १९९० रोजी ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची स्थापना केली. गरीब-श्रीमंत, जात-पात, धर्म यांच्या भिंती ओलांडून सर्व समाजजीवनाची उंची वाढावी, साहित्य-भाषा, विज्ञान-शिक्षण, वैद्यक, नाट्य-संगीतादी क्षेत्रांतील कार्यास, तत्संबंधी व्यक्तीस प्रोत्साहन मिळावे हा ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठाना’मागील हेतू आहे. ‘जनस्थान पुरस्कार’, ‘गोदावरी गौरव पुरस्कार’, आदिवासी साहाय्य, क्रीडा, वाचनालय, बालमहोत्सव, प्रबोधनपर शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी मेळावे आदी उपक्रम प्रतिष्ठानातर्फे राबवले जातात. मराठी भाषे आणि साहित्याबद्दल आस्था आणि आवड निर्माण व्हावी म्हणून ‘साहित्यभूषण’ ह्या उच्चस्तरीय परीक्षेचे आयोजन केले जाते. कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ २७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रभर ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

      ‘कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला त्या काळातल्या समीक्षकांनी धगधगत्या यज्ञकुंडातून प्रकटणार्‍या असुरसंहारिणी दुर्गेच्या स्वरूपातच पाहिले. वास्तविक, ती उमेसारखी विविधरूपधारिणी आहे. तिला क्रांतिकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या होमाइतकीच ‘माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीची ओढ’ आहे. जीवितं हे समुद्रासारखे आहे. ते केवळ सुंदर नाही आणि भीषण नाही, ते तिला ठाऊक आहे. जीवनाचा कुंभ हाती देणार्‍या कुंभाराची चौकशी करण्यात आयुष्य दवडण्यापेक्षा ‘आमंत्री बाहू पसरून ही यक्षकन्या गुणी’ म्हणणारे कुसुमाग्रज एकाच सुराने आळवीत बसले नाहीत. इथेच त्यांच्या प्रतिभेला लाभलेले चिरतारुण्य आहे... आज मागे पाहतच कृतार्थ अशीच कुसुमाग्रजांची साहित्य-साधना आहे. काव्य, कथा, निबंध, कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही पुढे जाताना त्यांनी मागे सुंदर कुसुमेच ठेवली आहे. त्यांनी चोखळलेली वाट सुगंधी झाली आहे. रंग वैभवाने नटवली आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना कुसुमाग्रज आपले वाटत आहेत’. अशा औचित्यपूर्ण समर्पक शब्दांत मराठीतील दुसरे भाषाप्रभू पु.ल. देशपांडे यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या बहुआयामी लेखनाचा गौरव केला आहे.कृती, उक्ती आणि लेखन यांतून समाजाशी नाते जोडणार्‍या कुसुमाग्रज तथा शिरवाडकरांचे नाशिक येथे निधन झाले.

     - वि. शं. चौघुले

शिरवाडकर, विष्णू वामन