Skip to main content
x

समर्थ, शोभना कुमारसेन

शोभना समर्थ

     रामराज्य’ या चित्रपटात शोभना कुमारसेन समर्थ यांनी आपल्या अभिनयाने सीतेची भूमिका अजरामर केली आणि  प्रत्येकाच्या मनावर सीतेचे रूप कोरून ठेवले. कारण आजही सीता म्हटली की ‘रामराज्य’ चित्रपटातील नायिकेचाच चेहरा नजरेसमोर येतो, इतके गारुड त्या चेहऱ्याने निर्माण केलेले आहे. शोभना समर्थ यांनी ४० च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप निर्माण केली होती. शोभना यांनी आपल्या आईकडून सौंदर्याचा वारसा घेतला होता, तर वडिलांची कर्तव्यदक्षता आणि हिशोबीपणाही त्यांच्यात उतरलेला होता. त्यांच्या पुढच्या काळात त्यांना या गुणांचा फायदा झाला.

      भिवंडीजवळच्या गोर या खेड्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात रतनबाई शिलोत्री आणि डॉ. प्रभाकर शिलोत्री या दांपत्याच्या पोटी शोभना समर्थ यांचा जन्म झाला. सरोज प्रभाकर शिलोत्री हे त्यांचे मूळ नाव, पुढे चित्रपटात काम करू लागल्यावर शोभना समर्थ या नावाने त्या सुपरिचित झाल्या. वडिलोपार्जित शेती असूनही शोभना समर्थ यांच्या वडिलांनी डॉक्टरकी केली. ते स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांचे कल्याणला ६० एकर फार्म हाऊस होते, तर मुंबईला महालक्ष्मी मंदिराजवळ ते राहत होते. अशा वातावरणात शोभना समर्थ यांचे बालपण गेले. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असूनही त्यांचे लाड कधीच झाले नाहीत. त्यांच्या वाट्याला अचानक आलेल्या दारिद्य्राच्या झळांनी त्या डगमगल्या नाहीत की कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना खचल्या नाहीत. तारेवरची कसरत करत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली.

      एके दिवशी घरातील सुबत्तेला नजर लागली आणि डॉ. प्रभाकर यांच्यावर जप्ती आली. होते-नव्हते ते सर्व धुळीस मिळाले. त्यांच्या वडिलांना कारावास भोगावा लागला. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. अशा परिस्थितीत शिलोत्री कुटुंबाने बंगलोरला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे गेल्यावर ते झोपडपट्टीत राहायला लागले. नव्याने सुरुवात करण्यासाठी गाठीला काहीही नव्हते. त्यामुळे खचून जाऊन डॉ. प्रभाकर व्यसनाच्या आहारी गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या १२व्या वर्षी नवे काही शिकण्याच्या ओढीने शोभना समर्थ यांनी पाऊल उचलले, पण बाबांच्या मृत्यूमुळे त्याही खचून गेल्या आणि आपल्या आईसोबत त्या आपल्या मामांकडे राहावयास आल्या. मामा म्हणजे अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे वडील. येथे आल्यावर, मामाने खर्चाला दिलेल्या पैशावर त्यांची गुजराण होत होती. त्यामुळे शोभना समर्थ यांनी शिकवणी घ्यायला सुरुवात केली. त्या स्वत: केंब्रिज सिनिअरपर्यंत शिकल्या होत्या. पण काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना शिकवणीही सोडावी लागली. खरे तर तो काळ बघता, जात्याच सुंदर असलेल्या शोभना समर्थ यांचे राहणीमान आणि घरासाठी काही करण्याची जिद्द, असे असताना सुरुवातीला कुणाशी बोलणे काय किंवा फिरणे काय - सगळेच लोकनिंदेला कारणीभूत झाले. मग भावांसोबत चित्रपट-नाटक पाहणेसुद्धा कठीण झाले. त्यामुळेच ‘नाटकात (आंधळ्याची शाळा) काम करतेस का?’ असे काणेकरांनी विचारल्यावर, सुरुवातीला मामांकडून त्यांना नकार आला होता. पुढे ज्योत्स्ना भोळे यांनी हे काम केले. मधल्या काळात आईचे आणि मामाचे पटेनासे झाले आणि त्या दोघी स्वतंत्र राहू लागल्या. खर्चाची पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली. त्याच वेळी एक परिचित वामन तळपदे यांनी ‘कोल्हापूरला शालिनी सिनेटोनमध्ये काम करणार काय?’ म्हणून विचारणा केली. पण इथेही मामा आडवे आले. त्यांचे म्हणणे होते की, कुलीन घराण्यातल्या मुलीने असे केले तर तिचे लग्न कसे होईल? चित्रपट काय किंवा नाटक काय, शोभना समर्थ यांच्या आयुष्यात यांची दारे उघडणारच होती आणि म्हणूनच त्यांना कुमारसेन समर्थ यांनी मागणी घातली. जर्मनीच्या उफा स्टुडिओतून सिनेमॅटोग्राफीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल्या कुमारसेन समर्थ यांनी लग्नाचा प्रश्‍न चुटकीसरसा सोडवला आणि दोघांनी ८ फेब्रुवारी १९३५ रोजी बेळगावला जाऊन नोंदणी पद्धतीने विवाह केला. कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला.

       कोल्हापूरला आल्यावर २१ जून १९३४ या दिवशी शोभना यांनी ‘विलासी ईश्वर’ या चित्रपटाचा करार केला. मा. विनायक या चित्रपटाचे नायक होते, तर खलनायक बाबूराव पेंढारकर होते. ‘गाडी खडा करो’ या नावाने हिंदीत हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर उर्दूत ‘निगाहे-नफरत’ या नावाने. त्यांना त्या वेळी महिना रुपये ५००/- मिळाले. साठवलेल्या पैशातून त्यांनी पुढे एक गाडी घेतली. त्यांनी सरोज शिलोत्री या नावाने चित्रपटाचा करार केला, पण चित्रपट प्रदर्शित होता होता त्या ‘शोभना समर्थ’ झाल्या.

      लग्नानंतर त्या मुंबईत गिरगाव येथील चौबळ लेनमध्ये राहू लागल्या. येथे आल्यावर त्यांना सागर मुव्हीटोनचा ‘दो दिवाने’ (१९३६) हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील मोतीलाल या नायकाला पहिल्यांदा सेटवर पाहिल्यावरच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. आपल्या प्रेमालाही त्यांनी कधीच नाकारले नाही. पण आपल्या घरासाठी, समाजासाठी त्यांनी प्रेमाला दुय्यम स्थानावरच ठेवले आणि म्हणूनच आपल्या नवऱ्याच्या पश्चात लोणावळ्याला त्या एकट्या आपल्या घरी राहायला गेल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नूतनचा (४ फेब्रु. १९३६) जन्म झाला. आपल्या मुलीबद्दल शोभना समर्थ यांना भारी काळजी वाटे. ती गर्भात असताना चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शोभना समर्थ यांना अपघात झाला. गर्भपात होण्याची शक्यता असतानाही नूतन जन्माला आली.

     ‘दो दिवाने’नंतर शोभना समर्थ यांना अनेक चित्रपट मिळाले. त्यांच्या हाती पैसा आला. सामाजिक आशयाच्या चित्रपटांसोबत त्यांनी बरेच पौराणिक चित्रपट केले. मुळातच कोणालाही लाजवेल असेच सौंदर्य त्यांना लाभले होते. म्हणूनच त्यांनी साकारलेली पौराणिक चित्रपटातील नायिका आजही चित्रपटाचा पडद्यावर भाव खाऊन जाते. ‘राम विवाह’, ‘रामबाण’, ‘नलदमयंती’, ‘तारामती’ असे चित्रपट त्यांनी केलेच. पण ‘वीर कुणाल’ (१९४५) या चित्रपटामध्ये त्यांनी उच्छृंखल खलनायिकेची भूमिका वठवली, तर ‘कोकिळा’मध्ये दुय्यम भूमिकाही केली. आपण कुठलीही भूमिका लीलया पेलू शकतो हेच शोभना समर्थ यांनी नकळत दाखवून दिले होते.

      मराठीसोबत हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले. ‘अपनी नगरीया’ (१९४०), ‘बंबई की सैर’ (१९४१), ‘सवेरा’ (१९४२), नर्गिससोबत ‘नौकर’ (१९४३) या चित्रपटांत त्या चमकल्या. पण हिंदीतही त्यांच्या सौंदर्याचे गारूड कायमच राहिले. उलट मराठीप्रमाणेच त्या दुसऱ्या बाजूला पौराणिक चित्रपटातही चमकतच राहिल्या. त्या काळातल्या दिग्गजांसोबत त्या काम करत होत्या. ‘एकच प्याला’च्या रिमेकमध्ये त्या चेतन आनंद, पहाडी सन्याल यांच्यासोबत चमकल्या. त्याच दरम्यान त्यांच्याकडे विजय भट्ट यांचा ‘रामराज्य’ हा चित्रपट चालून आला. वसंत पंचमीला या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. या चित्रपटाने इतिहास घडवला, हे तर जगजाहीर आहेच.

      - शारदा गांगुर्डे

संदर्भ
१) टिळेकर महेश, 'मराठी तारका', प्रकाशक - महेश टिळेकर, पुणे; २००७.
समर्थ, शोभना कुमारसेन