Skip to main content
x

शनवारे, श्रीधर कृष्ण

     श्रीधर कृष्ण शनवारे यांचे मूळ गाव साऊर (जि. अमरावती) हे होय. त्यांचे शिक्षण एम.ए. पीएच.डी.पर्यंत झाले. नाग-पूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयामधून त्यांनी मराठीचे अध्यापन केले व तिथूनच विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

      ‘उन्हउतरणी’ (१९७५), ‘आतून बंद बेट’ (१९७८), ‘थांग-अथांग’ (१९८६), ‘तीन ओळींची कविता’ (२००७) हे त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह होत. त्याशिवाय ‘अतूट’ हे नाटक (१९७६), ‘कोलंबसची इंडिया’ (प्रवासवर्णन, १९९९), ‘कथाकार वामन चोरघडे’ (समीक्षा ग्रंथ, १९९५), ‘प्रेमचंद : निवडक कथा’ (अनुवाद, १९९९), ‘राक्षसांचे वाडे’ (बालकुमार कवितासंग्रह, १९९३), ‘अभिनव मराठी व्याकरण’ (नागपूर, १९९४) ही त्यांची ग्रंथसंपदा होय.

      रोहिणी कळमकर यांनी १९९८ साली त्यांच्या साहित्यावर पी.एच.डी. मिळविली. ‘आकांक्षा’ मासिकाने मे २००६मध्ये त्यांच्यावर विशेषांक काढला. २००२मध्ये ‘गहिवरलेला महाशब्द’ हा त्यांच्या कवितेवरील नरेंद्र बोडके यांचा समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाला. शनवारे यांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य ‘केशवसुत’ पुरस्कार १९८६ साली प्राप्त झाला. त्याशिवाय, कविवर्य कुसुमाग्रज पारितोषिक, कवी उ.रा. गिरी पारितोषिक, विदर्भ साहित्य संघाचे ‘वसंतराव वर्‍हाडपांडे’ स्मृती पारितोषिक त्यांना मिळाले आहे. दर्यापूर येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

     नागपूरला मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करून ते निवृत्त झाले. शनवारे यांच्या कवितेत सत्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती प्रबळ आहे. पु.शि. रेग्यांच्या तोडीचा घोटीव रूपबंध आणि जी.एं. ची आठवण करून देणारी आशयघनता यांचा अपूर्व संगम त्यांच्या कवितेत झालेला दिसतो. तत्त्वचिंतन हे त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य आहे. पण कुठलीही एक बाजू घेऊन ते उभे राहत नाहीत. समग्र देशवास्तव कवेत घेण्याची तिची क्षमता आहे. मराठीतील ही खरीखुरी भारतीय कविता आहे.

     - नरेंद्र बोडके

शनवारे, श्रीधर कृष्ण