Skip to main content
x

सोहोनी, श्रीधर वासुदेव

     श्रीधर वासुदेव सोहोनी यांचा जन्म रत्नागिरीजवळच्या आगरगुळे येथे एका सुसंस्कृत, सधन कुटुंबात झाला. ते अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. व एम.ए. या पदव्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत श्रीधर सोहोनी यांना १९३०मध्ये कानडे पारितोषिक, १९३२मध्ये बाल दया कोनवार ब्रिज भुखणदास शिष्यवृत्ती, १९३६मध्ये सर विल्यम वेडरबर्न शिष्यवृत्ती, तसेच के.टी. तेलंग सुवर्णपदक व पारितोषिक आणि सर फिरोजशहा मेहता व सर लॉरेन्स जेकिन्स शिष्यवृत्ती आदींचा लाभ झाला.

     १९३६मध्ये आय.सी.एस.साठी त्यांची निवड झाली. तेथून केंब्रिजला जाऊन त्यांनी अर्थशास्त्रातील ‘ट्रायपॉस’ ही सन्माननीय पदवी मिळवली. याशिवाय डॉ. जे.ई. टॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय इतिहासातील ‘इन्डोबॅक्ट्रिअन’वर संशोधन केले. इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या. तसेच संस्कृत, प्राकृत व पाली या भाषांचेही ज्ञान होते.

     आय.सी.एस. पदवी घेऊन ते १९३८मध्ये भारतात परतले. त्यांनी १९४५पर्यंत बिहारमधील निरनिराळ्या जिल्ह्यात प्रशासकीय काम केले. नंतर ओरिसा राज्यात १९४९पर्यंत राजकीय विभाग, नियोजन विभाग इत्यादी क्षेत्रात काम केले. ओरिसा राज्यातील संस्थाने भारतामध्ये विलिन करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण मसुदा तयार केला. ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हटली पाहिजे. हा मसुदा इतर संस्थानांनाही लागू करण्यात आला. १९४९मध्ये ते बिहारला परतले आणि अनेक विभागांचे सचिव म्हणून त्यांनी तेथे काम केले. १९५२-१९५३ साली त्यांनी विभागीय कमिशनर आणि कमिशनर म्हणून पाटणा विभागाचे काम पाहिले. १९६४-१९७२ या काळात त्यांनी महत्त्वाच्या अनेक पदांवर काम केले. बिहार सरकारचे प्रमुख सचिव आणि बिहारच्या राज्यपालांचे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन बिहार सरकारने लोकायुक्त म्हणून १९७२ ते १९७८पर्यंत त्यांची नेमणूक केली.

     भारतीय संस्कृती आणि इतिहास याविषयी ४००हून अधिक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले. डॉ. राजेंद्रप्रसाद लिखित ‘चंपारण में महात्मा गांधी’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती त्यांनी तयार केली. ‘जर्नल ऑफ बिहार रिसर्च सोसायटी’चे ते १० वर्षे प्रमुख संपादक होते. ‘इंडिया न्यूमिस्मॅटिक क्रॉनिकल’ या जुन्या नाण्यांच्या अभ्यासविषयक मासिकाचे ते संस्थापक-संपादक होत. १९६४ साली भरलेल्या भारतीय मुद्रा परिषदेचे व बोधगया येथील जागतिक बुद्धिस्ट अ‍ॅकॅडमीचे ते अध्यक्ष होते. सोहोनी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथलेखन केले आहे. ‘महावंश टीका’, ‘दि ऑम्बुड्समन इन इंडिया’, ‘सिटीज डिस्क्राइब्ड बाय कालिदास’ ही त्यांची पुस्तके अत्यंत प्रसिद्ध आहेत.

    सोहोनी यांना प्राचीन मूर्ती, शिल्पे, ताम्रपट, सनदा, चित्रे वगैरे गोळा करण्याची आवड होती. या ऐतिहासिक ऐवजांच्या संग्रहाचे पाटणा येथील राष्ट्रीय संग्रहालयात एक विशेष दालन आहे.

    त्यांना अनेक मान-सन्मानांनी व पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून, १९६०मध्ये दरभंगा विद्यापीठाची विद्यावाचस्पती, १९७०मध्ये नालंदा विद्यापीठाची विद्यावारिधी, १९७२मध्ये विक्रम विद्यापीठाची डी.लिट्. या पदव्यांचा त्यांत अंतर्भाव आहे.

— संपादित

सोहोनी, श्रीधर वासुदेव