Skip to main content
x

सोलापूरकर, राहुल दत्तात्रय

     भारदस्त शरीरयष्टीला साजेसा भारदस्त आवाज, स्पष्ट शब्दोच्चार आणि शब्दांची फेक या बलस्थानांना अभिनयाची जोड देत वीस वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपट आणि नाट्यसृष्टीत वावरणारे राहुल दत्तात्रय सोलापूरकर यांचा जन्म पुणे येथे झाला असून बालपण पुण्यातील शनिवार पेठेत, वाडा संस्कृतीत गेले. त्यांची आई शुभा सोलापूरकर या प्रथितयश लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सचिव होत्या व त्यांचे वडील दत्तात्रय सोलापूरकर नोकरी करत असत.

     सोलापूरकर यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये अंगभूत कलागुण जोपासत, नवनव्या विषयांची ओळख करून घेत झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. दरम्यान रा.स्व.संघ शाखेच्या शिस्तीचे आणि संस्कारांचे बीज त्यांच्या मनात रुजले. साधारणपणे त्यांना १४ ते १५ वर्षे हे संस्कार मिळत राहिले आणि एकीकडे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू राहिले.

     अनेक बालनाटकात काम करत असतानाच शिशुरंजन संस्थेच्या ‘ग्रेट गाढव सर्कस’ या बालनाटकातही राहुल सोलापूरकर यांनी जॅगोदादा ही भूमिका केली. पुढे ‘थरथराट’ या चित्रपटातील टकलू हैवान ही भूमिका जॅगोदादाशी साधर्म्य सांगणारी होती. हौशी रंगभूमीपासूनच नाट्याभिनयाची भक्कम पार्श्‍वभूमी त्यांना मिळाली. जयवंत वालावलकर यांच्या ‘बहुरूपी’ या नाट्यसंस्थेच्या ‘राजाची लेक माझी बायको’ या रवींद्र भट लिखित नाटकात भूमिका केली. हे त्याचे पहिले व्यावसायिक नाटक होय. नाटकातील बारकाव्यांची खोलवर ओळख होण्यासाठी पुरुषोत्तम करंडकचा वाटा खूप मोठा होता. ‘अभ्यास’ या एकांकिकेतील अभिनय पाहून डॉ. जब्बार पटेल यांनी राहुल सोलापूरकर यांच्या नावाची निवड केली ती ‘पडघम’ या नाटकासाठी. त्यांनी या एकाच नाटकात निरनिराळ्या अकरा भूमिका साकारल्या. त्यामुळे हौशी रंगभूमीकडून व्यावसायिक रंगभूमीकडे होणारा त्यांचा प्रवास सहज झाला.

     सोलापूरकर यांना ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे नेपथ्यकार म्हणून राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बक्षीस मिळाल्यामुळे त्यांची राज्य नाट्यशिबिरात निवड झाली. तेथे त्यांना डॉ. विजया मेहता, दत्ता भट, माधव वाटवे, श्रीराम लागू, अशोकजी परांजपे अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले.

     अण्णासाहेब देऊळगावकर यांची पटकथा-संवाद असलेल्या ‘नशिबवान’ या चित्रपटात सोलापूरकर यांना खलनायकाची भूमिका मिळाली. १९८८ मध्ये एन.एस. वैद्य यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उषा नाडकर्णी, आशा काळे, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, नितीश भारद्वाज, मोहन जोशी, चंदू पारखी अशा अभिनयकुशल कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.

     महेश कोठारे यांनी १९८९ साली दिग्दर्शित केलेल्या ‘थरथराट’ या चित्रपटात सोलापूरकर यांनी टकलू हैवान ही खलनायकी भूमिका लोकप्रिय ठरली. चित्रपटाची संवादात्मक ध्वनिफीत येणारा हा मराठीतील पहिलाच चित्रपट होय. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर साधारणपणे बावीस चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. १९९० साली ‘पळवापळवी’ या चित्रपटात दादा कोंडके यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली.

     ‘विरुद्ध’ (महेश मांजरेकर), ‘होली’ (केतन मेहता), ‘हनन’ (मकरंद देशपांडे), ‘यशवंतराव चव्हाण’ (जब्बार पटेल) आणि ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ (जब्बार पटेल) या महत्त्वाच्या हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले.

     नाटक, चित्रपट यांच्या बरोबरीनेच दूरदर्शन मालिकांचा पर्यायही सहजगत्या सोलापूरकर यांच्यासमोर आला. १९८५ साली त्यांना विनय धुमाळे निर्मित ‘शोध’ या मालिकेत नाना पाटेकर, विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करता आले. ‘मृगनयनी’, ‘अवंतिका’, ‘नंदादीप’, ‘नूपुर’, ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकांमध्येही भूमिका केल्या. ‘राजर्षी छत्रपती शाहू’ या मालिकेमध्ये राहुल सोलापूरकर यांनी शाहू महाराजांची भूमिका जिवंत केली. ही भूमिका लक्षणीय ठरल्यामुळे शाहू महाराज म्हणजे राहुल सोलापूरकर आणि राहुल सोलापूरकर म्हणजे शाहू महाराज असे समीकरण तयार झाले. त्यामुळे ‘बालगंधर्व’ या चित्रपटातही त्यांना पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या भूमिकेत पाहता आले. याशिवाय चित्रपट आणि जाहिराती यांकरता आवाज देणे, तसेच निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक, संवादक म्हणूनही त्यांनी अतिशय ठळकपणे आपले नाव नोंदवले आहे. ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ हा जुन्या चित्रपटांतील गाणी आणि आठवणी यांच्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. जगभरात त्याचे शेकडो प्रयोग त्यांनी केले. राहुल सोलापूरकर यांचा २२ व्यावसायिक नाटके, ८७ मराठी चित्रपट, ५ हिंदी चित्रपट आणि ३१ दूरदर्शन मालिका असा चौफेर अभिनयाचा प्रवास आजही सुरू आहे.

     राहुल सोलापूरकर यांची स्वामी विवेकानंद, शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर यांच्यावरील अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील व्याख्याने रसिक श्रोत्यांना भावतात. अमेरिका, इंग्लंड, मस्कत येथे आणि इतर अनेक देशांमध्ये खूप मोठ्या प्रतिसादाने ही व्याख्याने होत असतात. याशिवाय ‘जनरेशन गॅप’, ‘कशी असावी जीवनशैली’, ‘पसायदान’, ‘समर्थ रामदास’ या विषयावरील त्यांची व्याख्याने रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत. अभिनय, लेखन, निवेदन अशा एकमेकांशी निगडित कलाक्षेत्रात त्यांचे काम सुरू आहे. ८ डिसेंबर १९८८ रोजी झालेल्या लग्नानंतर त्यांच्या या अभिनयप्रवासात त्यांच्या पत्नीची म्हणजे मृणाल सोलापूरकर यांची साथ आणि पाठिंबा त्यांना सातत्याने लाभला आहे.

     त्यांची देवाशिता क्रिएशन ही निर्मिती संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून काही संगीतविषयक कार्मक्रमांची आणि माहितीपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘शिवतीर्थ रायगड’, बालाजी तांबे यांचे ‘आत्मसंतुलन व्हिलेज’, ‘वंदे मातरम्’ ही त्याची काही बोलकी उदाहरणे आहेत. ‘वंदे मातरम्’ हा माहितीपट पाहून  २००६ साली  तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सोलापूरकर यांना भारतीय सेनादलासाठी अप खवशर उरश्रश्रशव खपवळर हा माहितीपट तयार करण्यास सांगितले. सैन्यात पाच हजार पदे रिक्त होती. या पदांकरता तरुणांनी पुढे यावे, या दृष्टीने प्रोत्साहनपर असा हा माहितीपट होता.

     श्रीपाद गोखले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या राहूल सोलापूरकर यांचा अभिनेता, संवादक, निवेदक असा प्रवास सुरू असतानाही संस्कारभारतीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच भारत विकास परिषदेचे पुण्याच्या शिवाजीनगर शाखेचे कामही पाहतात. तसेच निरामय फाऊंडेशन, कामायनी यासारख्या चौदा समाजसेवी संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पुढची पिढी म्हणजे भारताचा भविष्यकाळ अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने दर वर्षी १० ते २० वर्षे वयोगटातील मुलांसाठी सांगली येथे वर्ग चालवण्यात येतो. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आणि मुलांच्या क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या वर्गाचा आराखडा तयार करण्याच्या कामी सोलापूरकर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. सामाजिक भान जपत, जबाबदारीच्या जाणिवेतून केलेल्या त्यांच्या प्रत्येक कामात आजवर त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे.

- नेहा वैशंपायन

सोलापूरकर, राहुल दत्तात्रय