Skip to main content
x

सोनार, ज्ञानेश पांडुरंग

          ज्ञानेश पांडुरंग सोनारांची सामान्य, तसेच जाणकार वाचकांना पाहताक्षणी हसू आणणारी खेळकर, खोडकर असूनही देखणी अशी व्यंगचित्रे, मासिकांची आणि पुस्तकांची मुखपृष्ठे व कथाचित्रे या सर्वांची मिळून मोजदाद करायची झाली, तर ती दशसहस्रकांच्या संख्येत करावी लागेल. सोनारांचे एस.एस.सी.पर्यंत शालेय व त्यानंतरचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविकेपर्यंतचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी, नाशिक येथेच झाले. डिप्लोमा घेतल्यावर त्यांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स येथे मिग विमान प्रॉजेक्टमध्ये नोकरी लागली. त्यांच्या पत्नीचे नाव अनुराधा होते.

पूर्णवेळ नोकरीत गुंतले असताना स्वत:मधील चित्रकलेच्या आवडीची त्यांना जाग आली व एक व्यंगचित्र रेखाटून त्यांनी ते नाशिकच्या गावकरीला पाठवून दिले. ते प्रसिद्ध झाले. त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सोनारांना हुरूप आला. परिणामी, त्यांनी पुढे जवळजवळ पस्तीस वर्षे सातत्याने गावकरीसाठी दररोज पॉकेट कार्टून्स काढली. हे कार्य चालू असताना इतरही ठिकाणी त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. १९७० पासून आवाज’, ‘जत्रा’, ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘दीपावली’, ‘रसरंग’, ‘सुगंधइ. अनेक प्रतिष्ठित, तसेच वाचकप्रिय दिवाळी अंकांतून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होऊ लागली आणि आजही होत आहेत. नागपूर व जळगाव येथील वृत्तपत्रांसाठीही ते व्यंगचित्रे देत.

सोनार यांनी व्यंगचित्रांचे अनेक प्रकार हाताळले. सुटी चित्रे, अनेक चित्रांची मिळून बनलेली साखळीचित्रे, एक विषय घेऊन त्याच्याशी संदर्भ जोडलेल्या चित्रांची मालिका, वाचकांना चकवत गंमत करणार्‍या जादूच्या खिडक्याइ.इ. अनेक.

सोनारांनी विपुल व्यंगचित्रांमधून अनेक विषय, अनेक व्यक्तिचित्रे, अनेक प्रसंग साकारले. सामान्य संसारी नवरा-बायको, त्यांचे कुटुंबीय; देखण्या, पुष्ट तरुणी, रंगेल नवरे, चलाख बायका; रंगेल डॉक्टर व अन्य व्यावसायिक तसेच रंगेल योगी, साधूसुद्धा; आपल्या जनानखान्यासह अरबी धनवंत; बादशहा, नवाब; राम, रावण; लेखक, कवी, चित्रकार, गायक, नाटककार, इतिहाससंशोधक, दहशतवादी ही पात्रे आणि बॉम्बस्फोट; हिंदी सिनेमे आणि त्यांमधली लोकप्रिय झालेली गाणी; सेक्स स्कँडल इ. (थोडक्यात, कोणताही लक्ष खेचून घेणारा विषय). दोन भिन्न घटक एकत्र आणून विनोदबुद्धीच्या काठीने ढवळून सोनार असे स्फोटक मिश्रण तयार करतात, की वाचकांना तत्काळ हसून दाद देण्याला पर्यायच उरत नाही. काही वेळा ही दाद अचूक निरीक्षणाला असते, काही वेळा त्यातील निष्कर्षाला असते. काही वेळा पुन: प्रत्ययाची असते, तर काही वेळा अश्लीलतेच्या सीमेला स्पर्श करणार्‍या चावट आशयाला असते.

स्वत:च्या व्यंगचित्रांप्रमाणेच विनोदी कथांसाठी आणि लेखांसाठी सोनारांनी काढलेल्या कथाचित्रांची आणि पुस्तकांच्या मुखपृष्ठांची संख्याही हजारांत आहे.विशेष म्हणजे, त्यांच्या चित्रांनी मराठीची सीमा ओलांडून दिल्लीच्या प्रकाशनांसाठी हिंदी भाषेतील गृहशोभा’, ‘सरिताया मासिकांवर मुखपृष्ठे, कथाचित्रे यांच्या रूपाने आपला ठसा उमटवला.

चित्र रेखाटण्याप्रमाणे वक्तृत्वाचे कौशल्यही सोनारांनी कमवले. आपल्या व्यंगचित्रांची भाष्यासहित रेखाटण्याची १५२० हून अधिक प्रात्यक्षिके सादर केलेली पाहिली की हे समजते.सोनारांच्या संगणकावरील फोटोशॉपवापरून बनविलेल्या शंभराहून अधिक चित्रांना तज्ज्ञांची आणि रसिकांची हार्दिक दाद मिळाली आहे. हे सर्व करीत असताना सर्व भारतभर कार्टून वर्कशॉपही ते सादर करतात. ज्ञानेश सोनारांनी विनोदी, तसेच गंभीर कथालेखन केले व त्यांपैकी काही कथा संग्रहित झालेल्या आहेत.

आजमितीला सोनारांचे मस्त हसामोटू मामा’ (मुलांसाठी) हे मराठी व मामू द मडलरहा इंग्रजीमधील व्यंगचित्रसंग्रह, तर चंदनदाहहा गंभीर आणि फँटॅस्टिकाहा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. कार्टून वर्कशॉपहे व्यंगचित्रकलेवरचे इंग्रजी पुस्तकही त्यांच्या नावावर आहे.

- वसंत सरवटे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].