Skip to main content
x

सोनार, काशिनाथ राघो

माती परीक्षणाच्या आधारे जमिनीची उत्पादकता वाढवण्याचे संशोधन पुढे नेणारे डॉ. काशिनाथ राघो सोनार यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हसावद येथे व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे झाले. त्यांनी १९६१मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली. त्याच वर्षी धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात पदवीपूर्व वर्गांना मृदाशास्त्र व कृषि-रसायनशास्त्र विषय शिकवण्यास प्रारंभ केला. त्यांनी १९६६मध्ये नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून मृदाशास्त्र विषय घेऊन एम.एस्सी.(कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी अध्यापन करत असतानाच संशोधन करून १९७९मध्ये राहुरीच्या म.फु.कृ.वि.तून पीएच.डी. प्राप्त केली. ते १९७१पासून प्रपाठक व १९८७पासून प्राध्यापक पदावर काम करून विभागप्रमुख पदावरून १९९७मध्ये निवृत्त झाले. पदवीपूर्व अध्यापन १२ वर्षे व पदव्युत्तर अध्यापन २४ वर्षे केले, तर ३७ विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी व ९ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. सोनार यांनी माती परीक्षण व खतांचा उपयोग या विषयावर २० वर्षे संशोधन केले व त्यासंबंधीच्या प्रकल्पाचे ते राहुरी केंद्र प्रमुख होते. त्यांनी मातीच्या परीक्षण पद्धती, माती परीक्षण आधारे कार्यक्षेत्र जिल्ह्याचे नत्र, स्फुरद, पालाश सुपीकता नकाशे, महत्त्वाची पिके व त्यांच्या फेरपालटींची अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी खतांची समीकरणे यांच्या विविध जिल्ह्यांत शेतकर्‍यांच्या शेतावर ३५० चाचण्या असे विस्तृत संशोधन कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत ९० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. डॉ. सोनार यांना या संशोधनाबद्दल भारतीय मृदाशास्त्र संस्था, दिल्ली यांनी १९९८मध्ये सन्माननीय सदस्यत्व फेलोशिप बहाल करून सन्मान केला. त्यांनी भात पिकासाठी काळ्या जमिनीचे व्यवस्थापन या विषयावर संशोधन करून २० शोधनिबंध प्रसिद्ध केले. फिलिपाइन्समधील ४ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी ते १९८४मध्ये उपस्थित राहिले.

सोनार यांनी महाराष्ट्रातील प्रातिनिधिक काळ्या जमिनींचे पृथक्करण करून दुय्यम खनिजे (क्ले मिनरल्स), नत्र, स्फुरद, पालाश यांच्या माहितीवर ३२ शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांनी संशोधन, चिंतन व शेतकर्‍यांच्या शेतावरील अनुभव यांच्या आधारे शेतकर्‍यांच्या प्रबोधनासाठी ३५ मराठी लेख, पुस्तिका, घडीपत्रिका प्रसिद्ध केल्या.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

सोनार, काशिनाथ राघो