Skip to main content
x

सोराबजी, सोली जहांगीर

सोली जहांगीर सोराबजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मुंबईतच झाले. १९५२ मध्ये शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९५३ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. कॉलेजमध्ये त्यांना रोमन कायदा आणि न्यायशास्त्रातील(ज्युरिस्प्रुडन्स)  ‘किनलॉक फोर्ब्ज सुवर्णपदक’ मिळाले.

१९७१ पासून ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून वकिली करू लागले. १९७७ ते १९८० या काळात ते भारताचे सॉलिसिटर-जनरल होते. डिसेंबर १९८९ ते डिसेंबर १९९० या वर्षभराच्या काळात आणि नंतर पुन्हा एप्रिल १९९८ ते मे २००४ पर्यंत ते भारताचे अ‍ॅटर्नी-जनरल होते. अशा रीतीने दोन वेळा अ‍ॅटर्नी-जनरल होण्याचा मान सोराबजी यांना सर्वप्रथम मिळाला.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटना, समित्या, आयोग इत्यादींशी सोराबजी यांचा पदाधिकारी म्हणून घनिष्ठ संबंध आहे.  ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या भारतीय शाखेच्या सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, तर ‘मायनॉरिटी राइट्स् ग्रूप’ या संघटनेचे निमंत्रक आहेत. दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’चे ते अध्यक्ष आहेत, तर ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आहेत, बंगलोर येथील ‘नॅशनल लॉ स्कूल’मध्ये ते मानद प्राध्यापक आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगाच्या आणि अल्पसंख्यांकांच्या हक्करक्षणावरील उप-आयोगाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. २००० ते २००६ ते हेग येथील ‘पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चे सदस्य होते. शिवाय ‘युनायटेड लॉयर्स असोसिएशन’चे व ‘इंटरनॅशनल बार असोसिएशन’च्या मानवी हक्क समितीचे ते उपाध्यक्ष आहेत.

घटनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी १९९९मध्ये नेमण्यात आलेल्या वेंकटाचलय्या आयोगाचे ते सदस्य होते. नंतर भारतातील पोलिस प्रशासनात आणि १८६१ च्या पोलिस कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सोराबजी अध्यक्ष होते. या समितीने २००६ मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला.

सोराबजी यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असून ते सातत्याने लेखन करीत असतात. ‘लॉ ऑफ प्रेस सेन्सॉरशिप इन इंडिया’ आणि ‘दि इमर्जन्सी, सेन्सॉरशिप अ‍ॅन्ड दि प्रेस इन इंडिया : १९७५-१९७७’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तके पूर्वी प्रसिद्ध झाली, तर ‘लॉ अ‍ॅण्ड जस्टिस’ हे पुस्तक अलीकडे म्हणजे २००४ मध्ये प्रसिद्ध झाले. अन्य विविध महत्त्वाच्या पुस्तकांतही त्यांचे निबंध समाविष्ट झालेले आहेत. कायदेविषयक नियतकालिकांत तसेच वृत्तपत्रांतही त्यांचे लेखन नियमित सुरू असते. कायदा आणि न्यायविषयक वेगवेगळ्या विषयांवर सोराबजींनी अनेक व्याख्याने दिली आहेत.

भारत सरकारने २००२ मध्ये पद्मविभूषण हा सन्मान देऊन सोराबजींचा गौरव केला. त्यांना इंग्रजी साहित्याची तसेच अभिजात आणि जॅझ या दोन्ही प्रकारच्या पाश्चात्त्य संगीताची अतिशय आवड आहे. सोराबजी यांचे वास्तव्य नवी दिल्ली येथे आहे.

- शरच्चंद्र पानसे

सोराबजी, सोली जहांगीर