Skip to main content
x

सराफ, श्रीकृष्ण शंकर

बाळासाहेब सराफ

      श्रीकृष्ण शंकर सराफ हे नाशिकमध्ये बाळासाहेब सराफ म्हणून सर्वांना परिचित आहेत. सराफ यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक नगरपालिका शाळा क्रमांक दोन मध्ये व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले. नाशिकच्या   हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयामधून ते बी. ए. झाले. पुण्याच्या टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन मधून त्यांनी बी. टी. पदवी मिळविली.

       १९५५ मध्ये नाशिकच्या पेठे विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला. मराठी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास हे विषय ते उत्तम शिकवीत. विषयांचा सखोल अभ्यास, विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता यामुळे सराफ विद्यार्थिप्रिय शिक्षक झाले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक शाळांत अध्यापक, उपमुख्याध्यापक,  मुख्याध्यापक म्हणून त्यांनी तेहतीस वर्षे काम केले. या सर्व काळात शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम व प्रकल्प त्यांनी राबविले. नोकरीच्या पहिल्याच वर्षी मोठ्या परिश्रमांनी त्यांनी प्रदर्शन भरविले. मराठी भाषेचे अध्यापन मनोरंजनातून व्हावे या उद्दिष्टाने व्याकरणविषयक विविध तक्ते प्रदर्शनात होते. इतिहास संवादाच्या माध्यमातून शिकविला जावा म्हणून त्यांनी एक पुस्तिका तयार केली होती. ‘नाशिकची साहित्य सेवा’ प्रकल्पात तयार केलेल्या तक्त्यांतून नंतरच्या काळात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात ‘नाशिक जिल्हा साहित्यिक ग्रंथसंपदा’ विभागाची निर्मिती झाली. ‘आराधना’ या पेठे विद्यालयाच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून पंचवीस वर्षे काम करताना संपादनात महत्त्वपूर्ण सहभाग असावा या आग्रहातून डॉ. यशवंत पाठक, डॉ. रत्नाकर मंचरकर, सुहास पळशीकर असे साहित्यिक तयार झाले. या अंकाचा आशय, रचना, कलात्मक छपाई या सर्व गोेष्टींचे इतर महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयामधून अनुकरण झाले.

       संस्थेची नाशिकरोडची कोठारी कन्या शाळा ही कामगार वस्तीतील शाळा आहे. या शाळेत मुलींच्या आरोग्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयोग केले व मुलींमध्ये वर्तनबदल घडवून आणला. दर शनिवारी दुपारी सर्व वर्गांच्या शैक्षणिक गुणदर्शन प्रकल्पातून मुलींना आत्मविश्‍वास दिला. पेठे विद्यालयात पहिले पुस्तक प्रदर्शन भरवून वाचनालयातून मुलांना पुस्तके मिळण्याची सुविधा त्यांनीच उपलब्ध करून दिली.

       नवीन अभ्यासक्रम शिक्षण-प्रशिक्षण शिबिराचे अतिशय नियोजनपूर्वक संयोजन सराफांनी केले. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघाच्या विविध शिबिरांमध्येही ते पंचवीस वर्षे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करीत होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्राच्या कार्यकारिणीचे ते सतत पंचवीस वर्षे सदस्य होते. अनुभवांतून भविष्यकाळातील संस्थेच्या स्वरूपाचा वेध घेण्याची दृष्टी लाभलेल्या सराफ यांनी अनेक संस्थांच्या घटना निर्मितीचेही काम अभ्यासपूर्वक केले. केंद्र सरकारने त्यांच्या या कार्याचा  गौरव १९८९ मध्ये त्यांना ‘आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार’ प्रदान करून केला आहे.

      सातत्याने चाललेल्या या कार्यात त्यांची सिद्धहस्त लेखणीही चालू आहे. ‘देवदत्ताची गोष्ट’ ही कुमारांसाठी कादंबरी त्यांनी लिहिली, तर ‘सर्वांचे तात्यासाहेब कुसुमाग्रज’ हे कुसुमाग्रजांचे छोटेखानी चरित्र २००५ मध्ये प्रकाशित झाले. डॉ. वा. वा. दातार यांच्या ‘दोन तात्या’ या पुस्तकाचे संपादक सराफ आहेत.  १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी गौरवांक, पु. रा. वैद्य अमृत महोत्सव गौरविका संपादनात त्यांचा मोठा सहभाग होता. ‘अवसर’ नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा १९८८ विशेषांक, कुसुमाग्रज अभीष्टचिंतन गौरविका १९९०, वि. वा. शिरवाडकरांचे ‘माणुसकीचे आकाश’, ‘थांब सहेली’- कविता संग्रह, ‘प्रकाशाची दारे’- स्फुट लेख संग्रह या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. किर्लोस्कर, स्त्री, ललित, अमृत, नवनीत, हंस यासारख्या मासिकांतून तर लोकसत्ता, केसरी, सकाळ, लोकमत यासारख्या वृत्तपत्रांतून ते लेखन करीत होते व आजही करीत असतात.

       नाशिकच्या एकशे अडुसष्ट वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्षपद व अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. वाचनालयाने नाशिकमधील गंगापूर रोडवर महाराष्ट्रातील ‘पहिले उद्यान वाचनालय’ सुरू केले आहे. त्याच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘आनंद विधान’ या वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव संदर्भ अंकाच्या सुधारित आवृत्तीसाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयात नामवंत चित्रकारांच्या मूळ चित्रांचा विभाग सराफ यांच्याच प्रेरणेने सुरू झाला आहे.

       नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे ते संस्थापक सदस्य आहेत. के. ज. म्हात्रे संदर्भ ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विविध समित्यांचे सदस्य, ‘संवाद: शैक्षणिक, सांस्कृतिक जागर’ चे सल्लागार, ‘हितगुज मंडळाचे’ संस्थापक सदस्य म्हणून ते काम पाहतात. शालेय जीवनापासूनच नाशिकमध्ये होणारी थोर नेत्यांची, विचारवंतांची, साहित्यिकांची व्याख्याने ऐकणे हा त्यांचा छंद आहे. यातून लाभलेली बहुश्रुतता, मराठीतील समीक्षात्मक, वैचारिक ग्रंथांचा साक्षेपी अभ्यास, सर्वांना समजून घेणार्‍या स्वभावातून जमवलेला गावातील व बाहेर गावातील लोकसंग्रह, निर्व्याज मिष्किलपणा ह्या सर्वांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वास उत्तम वक्त्याचेही परिमाण लाभले आहे.

       - प्रा. सुहासिनी पटेल

सराफ, श्रीकृष्ण शंकर