Skip to main content
x

सरदार, गंगाधर बाळकृष्ण

     संतसाहित्याचा सामाजिक दृष्टीने विचार करणारे मराठीतील एक महत्त्वाचे अभ्यासक तसेच महाराष्ट्रातील प्रबोधन काळ, त्या काळातील व्यक्तींचे कार्य व समकालीन प्रश्न यांविषयी विचार करणारे विचारवंत अशी गं.बा. सरदार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार संस्थानात गं.बा.सरदार यांच्या वडिलांचे दुकान होते. पाच बहिणी, तीन चुलत भावंडे, काकू, आत्या, मावशी अशा एकत्र कुटुंबात त्यांचे बालपण गेले. मराठी सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण जव्हार येथील कृष्ण विद्यालयात झाले. पुढील शालेय शिक्षणासाठी ते चुलत्यांकडे मुंबईला आले. दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून १९२४मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण  झाले. १९२५च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून १९३२मध्ये बी.ए. व १९३४ मध्ये एम.ए. या पदव्या त्यांनी संपादित केल्या. १९३४ ते १९४१ या काळात त्यांना बेकारी अनुभवावी लागली. १९४१ ते १९६८ या काळात पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९६८मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अखेरपर्यंत लेखन व समाजप्रबोधन याच कार्याला त्यांनी वाहून घेतले.

     गं. बा. सरदार हे गांधीवाद व मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणींचा संस्कार असणारे एक समाजवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. जव्हारमधील बालपणीच्या वास्तव्यात त्यांनी आजूबाजूचे जे जीवन अनुभवले, त्याचे खोल संस्कार त्यांच्या मनावर झाले. एका मुलाखतीत त्यांनी त्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. ‘जव्हारला आमचं दुकान होतं. ठाणे जिल्हा सर्वांत गरीब आणि जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील सर्वांत गरीब. तिथले सगळ्यांत गरीब असलेले उघडे-नागडे वारली मी वर्षानुवर्ष रोज पाहत होतो. कुणबी, चांभार, मुसलमान हे त्या गावातले माझे मित्र. ते सगळे व्हर्नाक्युलर फायनलच्या पुढे गेले नाहीत... त्यांचं आयुष्य मातीमोल झालेलं मी पाहिलं आहे. त्याचा परिणाम माझ्या मनावर खूप झाला. समाजवादाची प्रेरणा मी तिथूनच घेतली. मग पुस्तकातून मी थोडं वाचलं. पण प्रेरणा पुस्तकातून आली नाही.’ याचबरोबर ‘ज्याला आपण romantic nationalism म्हणू शकू त्याचाही परिणाम जव्हारमुळे माझ्यावर झाला’, असेही त्यांनी नोंदविले आहे.

     १९२५च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतरही स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा सतत संबंध आला. १९३०मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तुकडीतून ते सत्याग्रहात सामील झाले व त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ‘पुण्यातल्या सरकारमान्य महाविद्यालयातून सत्याग्रहात जाणारा मीच पहिला विद्यार्थी होतो’, असे सरदारांनी म्हटले आहे. या काळात सरदारांनी गांधीवादाचा स्वीकार केला. तो केवळ वैचारिकदृष्ट्याच केला असे नाही. गांधीवादाचे प्रत्यक्ष आचरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘अंगात आचार्य पद्धतीचे खादीचे कुडते, कमरेला आखूड पंचा, वाढलेली दाढी आणि अनवाणी चालणे’ अशा रूपात १९३०-१९३२च्या सुमारास त्यांना पाहिल्याचे ह. श्री. शेणोलीकर यांनी नमूद केले आहे. १९४२च्या चळवळीनंतर त्यांचा मार्क्सवादी विचारसणींतील संबंध आला. गांधीवाद व मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीतील माणसाला केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याची पद्धती त्यांनी स्वीकारली.

      स्वातंत्र्य चळवळीशी संबंध येऊनही १९३०च्या चळवळीनंतरच्या आयुष्यात सरदार क्रियाशील राजकारणाकडे वळले नाहीत. ‘ज्याला मॅन ऑफ अ‍ॅक्शन म्हणावे, तसा मी नाही. काही प्रमाणात चिंतन, विचार हेच क्षेत्र मी निवडलं नि तेच माझ्या स्वभावाला मानवणारं आहे असं मला वाटत’,ं असे याबद्दलचे स्पष्टीकरण सरदारांनी स्वतःच दिलें आहे.

     १९३४मध्ये एम.ए. झाल्यानंतर १९४१पर्यंत सरदारांना नोकरी नव्हती. त्या काळात पीएच.डी.ची पूर्वतयारी म्हणून एकोणिसाव्या शतकातील गद्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यामधून ‘अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ हा सरदारांचा पहिला ग्रंथ सिद्ध झाला (१९३७). निबंधमालापूर्व गद्याचे स्वरूप विशद करणारा ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’ हा दत्तो वामन पोतदार यांचा ग्रंथ १९२२मध्येच प्रसिद्ध होऊन मान्यता पावलेला होता. अव्वल इंग्रजीतील मराठी गद्य केवळ शालोपयोगी व दर्जाने बेताचेच होते या दृष्टिकोनातून पोतदारांच्या ग्रंथातील विवेचन केले गेले होते. सरदारांनी आपल्या ग्रंथातून त्या गद्याची जमेची बाजू साधार विशद केली आहे, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय.

     या अभ्यासाचाच एक भाग म्हणून एकोणिसाव्या शतकातील सामाजिक प्रश्नांविषयी विचार करताना ज्या व्यक्तींचे कार्य सरदारांना महत्त्वाचे वाटले; अशा भाऊ महाजन, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जोतीराव फुले व विष्णुशास्त्री पंडित यांच्या कार्याचे विवेचन करणारे सरदारांचे लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिक या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. या लेखांचाच ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ हा ग्रंथ सिद्ध झाला (१९४१). सरदारांचे हे दोन्ही ग्रंथ विषय व विवेचनपद्धती यामुळे मान्यता पावले.

     महाराष्ट्राच्या या उपेक्षित मानकर्‍यांपैकी जोतीराव फुले यांच्याविषयी सरदारांनी पुन्हापुन्हा लिहिले. अनाथ विद्यार्थिगृहाच्या स्वाध्यायमालेसाठी ‘जोतीराव फुले’ ही पुस्तिका त्यांनी लिहिली (१९४५) तर पुढे ‘महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार’ (१९८१) या ग्रंथात फुल्यांचे कार्य व विचार या विषयीचे विस्तृत विवेचन सरदारांनी केले.

      मराठी साहित्यक्षेत्रात सर्वाधिक मान्यता मिळालेला सरदारांचा ग्रंथ म्हणजे ‘संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ हा होय (१९५०). (या ग्रंथाची अलीकडची आवृत्ती पाहिली तर १९४७ ते १९८२ या काळात संतसाहित्याविषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे हे जाणवते.) मराठी समाजावरील संतसाहित्याचा प्रभाव लक्षात घेऊन सामाजिक दृष्टीने संतसाहित्याची मीमांसा करण्याची परंपरा मराठी साहित्यक्षेत्रात न्यायमूर्ती रानड्यांपासून आहे. गं.बा.सरदारही याच परंपरेतील विचारवंत होत. आपल्या ग्रंथातील विवेचनातून सरदारांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या भूमिकेचाच पुनरुच्चार केला आहे. संतांनी समाजाला पंगू बनविले, या वि.का.राजवाडे यांच्या निष्कर्षाचा साधार प्रतिवाद करून, संतवाङ्मय ही एक प्रबोधनाचीच चळवळ होती. ‘मध्ययुगीन समाजरचनेचा पाया खणून काढून स्वतंत्रपणे नवी समाजव्यवस्था स्थापण्याची प्रेरणा या प्रबोधनात नव्हती. ही मर्यादा ओळखून संतांचे कार्य पाहिले तर मोठ्या धैर्याने व चिकाटीने त्यांनी समाजजीवनावर मौलिक व चिरंतन संस्कार घडविले याबद्दल शंका उरत नाही’, असे ठाम प्रतिपादन सरदारांनी प्रस्तुत ग्रंथात केले आहे. साहित्याचे साहित्य म्हणून असणारे महत्त्व अबाधित ठेवून सामाजिक दृष्टीने साहित्याकडे कसे पाहावे, याचा एक चांगला नमुनाच या  ग्रंथाद्वारे मराठीत सिद्ध झाला आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ‘Saint Poets of Maharashtra : There Impact on Society’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९६९). डॉ.कुमुद मेहता यांनी हे भाषांतर केले आहे.

     संतसाहित्य हा सरदारांच्या आस्थेचा एक विषय राहिला आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांचे व्यक्तित्व, तत्त्वचिंतन व कामगिरी यांचे समालोचन करणारी तीन व्याख्याने त्यांनी ‘कौशिक व्याख्यानमाले’त दिली (१९७१). तीच ‘ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा’ या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. पु.मं.लाड व्याख्यानमालेत दिलेल्या ‘संतसाहित्याची सामाजिक व राष्ट्रीय कामगिरी’ या आकाशवाणीवरील व्याख्यानांचाही पुस्तकात समावेश झाला आहे.

     याशिवाय तुकाराम, रामदास व एकनाथ या संतांच्या समग्र काव्यसंपदेतून प्रातिनिधिक वेचे निवडून त्यांचे संपादन सरदारांनी केले आहे. ‘तुकाराम दर्शन’ (१९६८), ‘रामदास दर्शन’ (१९७२) व ‘एकनाथ दर्शन’ (१९७८) या नावांनी ही संपादने प्रकाशित झाली आहेत. या प्रत्येक ग्रंथाला विवेचक प्रस्तावना असून त्यामध्ये त्या-त्या संताचा काळ, चरित्रपट, व्यक्तित्वाची जडणघडण व लेखनाचा विकासक्रम यासंबंधी विवेचन आले आहे. निवडलेल्या वेच्यांचे केलेले विषयवार वर्गीकरण व सूचक शीर्षके यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही संपादने उपयुक्त ठरली आहेत.

     १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असतानाच सरदारांनी दोन मोठ्या ग्रंथांचे संपादन केले. ‘महाराष्ट्र जीवन: परंपरा, प्रगती आणि समस्या’ खंड १ व खंड २ (१९६०), ‘महाराष्ट्र जीवन’च्या पहिल्या खंडात इतिहास, परंपरा, धर्मसंस्था, तत्त्वमीमांसा, समाजकारण, राजकारण, अर्थकारण हे विषय आले आहेत. तर दुसर्‍या खंडात साहित्य व कला यासंबंधीचे उपविषय आले आहेत. महाराष्ट्रातील तीस विचारवंतांनी या ग्रंथासाठी लेखन केले आहे. या ग्रंथाच्या दुसर्‍या खंडात ‘नव्या महाराष्ट्राचे भवितव्य’ हा सरदारांचा दीर्घ लेख आहे.

     त्यानंतर ‘संक्रमण काळाचे आव्हान’ (१९६६) हा ग्रंथ सरदारांनी संपादित केला. ‘देशातील विचारवंतांनी सर्वसामान्य लोकांना व सार्वजनिक कार्यकर्त्यांना आपल्यापुढील समस्यांची स्थूलमानाने पण स्पष्ट कल्पना द्यावी’ या हेतूने हे संपादन केले आहे. अन्नपरिस्थिती, आर्थिक विकास, नेतृत्व, शिक्षण, राजकारण अशा विषयांवर त्यात्या ज्ञानशाखेतील चौदा विचारवंतांचे लेख या ग्रंथात आले आहेत.

     गं.बा.सरदार हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींकडे जागरूकतेने व आस्थेने पाहणारे विचारवंत होते. साहजिकच या विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘न्यायमूर्ती रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा’ (१९७५), ‘आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार’ (१९७५), ‘महाराष्ट्राच्या प्रबोधनाची वाटचाल’ (१९८६), ‘गांधी आणि आंबेडकर’ (१९८७) हे सरदारांचे ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याचबरोबर महाराष्ट्राचे समाजकारण, धर्मकारण, राजकारण व मराठी साहित्य यांच्या स्थितिगतीचा शोध घेणारे जे स्फुटलेखन सरदारांनी केले, ते ‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ (१९७८), ‘नव्या युगाची स्पंदने’ (१९८२), ‘नव्या ऊर्मी नवी क्षितिजे’ (१९८७), ‘परंपरा आणि परिवर्तन’ (१९८८) या ग्रंथांतून संग्रहित झाले आहे. या सर्व लेखनातून सरदारांची समाजविषयक असणारी आस्था व समाजातील सर्व हालचालींकडे समतोल वृत्तीने पाहण्याची दृष्टी व्यक्त होते.

     अव्वल इंग्रजीतील गद्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, संतसाहित्य व समाजप्रबोधन ही सरदारांच्या लेखनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. मराठी साहित्यक्षेत्रातील अलीकडील प्रवाशांचा विचार करताना दलित साहित्यावर त्यांनी समरसतेने लिहिले आहे. हे सर्व लेखन करीत असताना सरदारांची भूमिका केवळ अभ्यासकाची वा संशोधकाची नाही, ती ज्ञानप्रसाराची आहे.

      सरदारांच्या या भूमिकेनेच त्यांची लेखनशैली घडविली आहे. म्हणूनच त्यांच्या प्रतिपादनात एक प्रकारचा सरळपणा आढळतो. त्यांच्या लेखनात क्वचित वक्तृत्व गुण असला; तरी अलंकारिकता, भावनांना चेतविणारे युक्तिवाद, उपहास, उपरोध इत्यादींचा अभाव असतो. सात्त्विक संयमपूर्ण लेखन हेच सरदारांच्या शैलीचे वैशिष्ट्य जाणवते. दि.के.बेडेकर यांनी सरदारांचे वर्णन ‘ज्ञानप्रसारकांपुढील आदर्श’ असे केले आहे.

      आयुष्याच्या उत्तरार्धात सरदारांना काही सन्मान प्राप्त झाले.

      १४ जानेवारी १९७८ सालच्या मुंबई येथे भरलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच बार्शी येथील चौपन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला.

      महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ, गोखले एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद, समाज प्रबोधन संस्था, लोकायन प्रतिष्ठान, पुणे इत्यादी संस्थांच्या कार्यात सरदारांचा सहभाग होता. तसेच ‘नवभारत’ मासिकाच्या सुरुवातीच्या काळात त्या नियतकालिकाशी ग.बा.सरदार संबंधित होते.

       - प्रा. दिगंबर पाध्ये

सरदार, गंगाधर बाळकृष्ण