Skip to main content
x

सरदार, मीर अकबर अली

खान बहादूर

          रदार  मीर अकबर अली खान हे निष्णात गुप्तहेर होते. गुन्हेगाराला शोधून काढण्याचे कौशल्य त्यांना निसर्गत:च अवगत होते. गुन्ह्याचा शोध घेताना कोणत्याही परिस्थितीचे उत्तम निरीक्षण हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. मुंबई शहराची त्यांना खडानखडा माहिती होती. मानवी मनाचा उत्तम अभ्यास, उत्तम वेशांतर करण्याचे कौशल्य या अंगभूत गुणांमुळे त्या काळातील एक महत्त्वपूर्ण गुप्तहेर म्हणून त्यांनी उल्लेखनीय व महत्त्वाची कामगिरी बजावली.

१ सप्टेंबर १८३१ या दिवशी त्यांनी मुंबई पोलीस सेवेत प्रवेश केला. कॅप्टन श्रॉट यांच्या हाताखाली असताना त्यांनी गुप्तहेर विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी करून नाव कमावले. सरदार मीर अकबर अली यांना मराठी, हिंदी व उर्दू या तीनही भाषा अवगत होत्या.

भारतीय सेवेतील त्यांच्या प्रचंड अनुभवामुळे त्यांना १८४० मध्ये ईडन येथील पोलीस दलाची पुनर्रचना करण्यासाठी पाठवण्यात आले.

मीर अकबर यांनी १८४४ मध्ये मुंबई येथील प्रवासी जहाज नष्ट करणाऱ्या अल्लू पारू या कुप्रसिद्ध गुन्हेगाराचे खूप मोठे कारस्थान उघडकीस आणण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. सरदार मीर अकबर अली खान यांच्या कामगिरीमुळे अल्लू पारू पकडला गेला व त्याला शिक्षा झाली. या कामामुळे त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला.

१८४६ मध्ये  कॅप्टन कोर्टीस यांच्याबरोबर जोरदार मतभेद झाल्यामुळे त्यांनी पोलीस सेवा सोडली होती.

१४ डिसेंबर १८४७ रोजी त्यांनी पुन्हा मुंबई पोलीस सेवेत प्रवेश केला. १८४७ ते १८८३ या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. १८५२ साली सरदार मीर अकबर अली खान यांची जमादार पदावर नियुक्ती करण्यात आली. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांच्याकडे मुंबईतील बंदोबस्ताचे काम होते. १८६१ साली ते नेटिव्ह कमांडंट झाले, तर १८६२ मध्ये ते सुभेदार झाले. त्यानंतर त्यांना खान बहादूरया पदवीने गौरवण्यात आले.

१८६५ साली मुंबई पोलीस दलाची पुनर्रचना करण्यात आली, त्या वेळेस सरदार मीर अकबर अली खान यांची पोलीस निरीक्षक (इन्स्पेक्टर ऑफ पोलीस) या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा गौरव म्हणून १८८३ मध्ये या गुप्तहेर खात्यातील पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. आताच्या काळाशी तुलना करता, हे पद डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीसया दर्जाचे होते. 

- अरविंद इनामदार

सरदार, मीर अकबर अली