Skip to main content
x

श्रेष्ठ लक्ष्मण गोरेप्रसाद

 

             क्ष्मण गोरेप्रसाद श्रेष्ठ यांचा जन्म नेपाळमधील सिराह या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव संतकुमारी होते. त्या वेळच्या ‘राणा’ म्हणजे राज्यकर्त्यांनी गोरेप्रसाद यांना पूर्व नेपाळमध्ये न्यायालयात न्यायाधीश म्हणून पाठविले. त्यांचे मुख्य काम होते गुन्हेगारीच्या खटल्यांचा निवाडा करणे. गोरेप्रसाद व संतकुमारी  यांचे सहा पुत्र व तीन कन्या असे मोठे कुटुंब होते.

             त्या वेळी नेपाळमध्ये शाळा नव्हत्या व नेपाळ महाविद्यालय हे बिहार विद्यापीठाच्या अखत्यारीत होते. त्यामुळे श्रेष्ठ सहा-सात वर्षांचे असतानाच शिकण्यासाठी दरभंगा, उत्तर बिहार येथे आले. तिथे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. त्या वेळी श्रेष्ठ बिहारी लोकांसारखे धोतर नेसत व त्यांनी शेंडीही ठेवली होती. त्यामुळे त्यांची पहिली भाषा होती मैथिली. पण त्याव्यतिरिक्त त्यांना नेपाळी व त्यांची स्वत:ची भाषाही येत होती.

             श्रेष्ठ यांना लहानपणापासूनच चित्रकार व्हावे असे वाटत होते. पण तेव्हा शहरापासून इतक्या दूरच्या गावी कलेचे शिक्षण घ्यायची काहीही सोय नव्हती. ते ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ किंवा ‘धर्मयुग’ यांसारख्या मासिकांतील छायाचित्रांवरून हुबेहूब चित्र काढत. त्या चित्रांची लोक भरपूर प्रशंसा करीत.

             एक दिवस योगायोगाने त्यांची भेट एका चित्रकाराशी झाली. तो मुंबईला कलेचे शिक्षण घेऊन आला होता. तो अमेरिकन लायब्ररीमध्ये अमेरिकन लोकांना स्वत:ची चित्रे दाखवत होता. त्याने श्रेष्ठ यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्याचा सल्ला दिला.

             श्रेष्ठ यांच्या वडिलांना कलेची आवड असली, तरी आपल्या मुलाने असला हलक्या दर्जाचा पेशा स्वीकारू नये असे त्यांना वाटत होते. म्हणून साधारण चारशे रुपये इतकी रक्कम जमल्यावर श्रेष्ठ मुंबईला पळून गेले. त्यापूर्वी श्रेष्ठ यांनी प्रवेशासाठी जे.जे.मध्ये पोस्टकार्ड पाठविले होते. जे.जे.मध्ये आल्यावर त्यांनी त्या वेळचे अधिष्ठाता गोंधळेकर यांची भेट घेतली. गोंधळेकरांनी श्रेष्ठ यांची राहण्याची व्यवस्था वांद्रे येथील वसतिगृहात केली. ते १९५७ मध्ये पहिल्या वर्गात दाखल झाले. जे.जे.मध्ये पहिल्या वर्षी ते दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांना भारतीय सरकारची शिष्यवृत्ती व वसतिगृहात मोफत राहण्याची सवलत मिळाली.

             कलाशाळेतील व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, स्मरणचित्र अशा सर्व विषयांची त्यांना आवड होती; पण तिसर्‍या वर्षी असणार्‍या ‘कॉम्पोझिशन’ या विषयात त्यांना बिलकूल रस वाटत नसे. त्यांनी व्यक्तिचित्रणात विशेष प्रावीण्य मिळवले होते.

             जे.जे.मध्ये प्रभाकर बरवे, आडिवरेकर, गजानन भागवत, मृगांक जोशी हे थोड्याफार फरकाने त्यांचे सहाध्यायी होते. त्यांतील बरवे यांच्याशी श्रेष्ठ यांची कधीकधी कलेवर चर्चा होत असे. पुढे १९६२ मध्ये शिक्षण पूर्ण करून ते कलावंत म्हणून काम करू लागले. जे.जे.तच त्यांची सुनीता परळकर हिच्याशी ओळख झाली व १९६४ मध्ये त्यांचा विवाह झाला.

             केकू गांधी यांनी १९६३ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपली ‘केमोल्ड’ गॅलरी स्थापन केली. त्याच सुमारास केकू गांधी व श्रेष्ठ यांची योगायोगाने भेट झाली. श्रेष्ठ वांद्य्राला समुद्रदृश्य रंगवीत बसले होते ते नेमके केकूंच्या बंगल्याजवळच. केकूंनी ‘केमोल्ड’च्या उद्घाटनाच्या प्रदर्शनात श्रेष्ठ यांना सहभागी करून घेतले व त्यानंतर त्या गॅलरीत श्रेष्ठ यांनी अनेक प्रदर्शने केली. त्यापूर्वी १९६२ मध्ये श्रेष्ठ यांनी त्या वेळच्या ताज आर्ट गॅलरीतही प्रदर्शन केले होते.

             सुरुवातीच्या काळात श्रेष्ठ यांच्या चित्रांत मानवाकृती असल्या तरी पुढे ते अमूर्तवादी कलेकडे वळले. त्यांना १९६४ मध्ये फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते पॅरिसला गेले. तिथे त्यांच्यावर विशेष करून निकोलस द स्टेल (Nicholas de Stael) या चित्रकाराचा प्रभाव पडला. त्यांनी ‘एकोल नॅसियोनल सुपेरिअर द बोझ आटर्स (Ecole National Superieure des Beaux Arts)),‘अकॅडमी द ला ग्रँट शोमिअर’(Academie de la Grande Chaumiere), तसेच अ‍ॅटलिएर-१७ येथे विल्यम हेटर (Atelier 17 of William Hayter) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. त्यांचा १९६६ मध्ये मेझॉन डे ब्यू आटर्स (Maisons des Beaux Arts) सारख्या प्रदर्शनातही सहभाग होता.

             फ्रान्समध्ये त्यांचे आदर्श असलेले व्हॅन गॉग, पॉल सेझाँ व पॉल गोगँ या चित्रकारांच्या कलाकृतींच्या ते निकट पोहोचले. ज्या कॅफेमध्ये व्हॅन गॉग जात असे, तिथे गेल्यावर श्रेष्ठ यांना स्फूर्ती मिळत असे, म्हणून ते तिथे वारंवार जात. त्या काळात सैय्यद रझाही फ्रान्समध्ये होते. त्यांनी श्रेष्ठ यांना अत्यंत आपुलकीने मार्गदर्शन केले.

             वासुदेव गायतोंडे यांना १९७० च्या सुमारास भुलाभाई इन्स्टिट्यूट ऑफ आटर्समध्ये स्टुडीओ मिळाला होता. श्रेष्ठ व गायतोंडे यांची मैत्री जमली व तिथेच दोघांची वारंवार भेट होऊ लागली. त्यामुळे गायतोंडे यांनी श्रेष्ठ यांची अनेक व्यक्तिरेखाचित्रे काढली. गायतोंडेे यांच्यामुळेच श्रेष्ठ यांची आध्यात्मिक गुरू निसर्गदत्त महाराज यांच्याशी भेट झाली.

             श्रेष्ठ यांनी जलरंग, तैलरंग, अ‍ॅक्रिलिक पेस्टल, चारकोल अशा अनेक माध्यमात काम केले आहे. त्यांची चित्रे उत्स्फूर्तपणे घडतात. कधीकधी निसर्गदृश्यातील अवकाश व भूमी यांच्या संबंधाशी काहीसे साधर्म्य त्यांच्या चित्रात दिसते. रंगलेपनातून, त्यांच्या छटा, पोत, अवकाशाची पोकळी (खोली) किंवा घनपदार्थ यांतून त्यांचे चित्र घडलेले दिसते. त्यात मूर्त वस्तूंपेक्षा अमूर्ततेला महत्त्व आहे हे स्पष्टपणे जाणवते. श्रेष्ठ यांनी अनेक भव्य भित्तिचित्रे (म्युरल्स) रंगविली, त्यातील वांद्रे-कुर्ला संकुलामधील युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया इमारतीसाठी केलेले १४×२८ फुटांचे भित्तिचित्र महत्त्वाचे आहे.

             त्यांनी अनेक एकल प्रदर्शने भारतात केली, तसेच समूह प्रदर्शनांतही भाग घेतला. त्यांतील १९६८ मधील पहिले ‘त्रिनाले ऑफ वर्ल्ड आर्ट’, नवी दिल्ली हे एक महत्त्वाचे प्रदर्शन होेते. शिवाय फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि अमेरिका येथेही त्यांची प्रदर्शने झाली.

             त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. बोर्झिअर (Boursiers) एक्झिबिशन ऑफ पेन्टिंग, पॅरिस यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. प्रिक्स हॉनर (Prix d Honneur), इंटरनॅशनल आर्ट एक्स्चेंज एक्झिबिशन, न्यूयॉर्क; गोरखा दक्षिण बाहू मेडल, नेपाळ; ब्रिटिश काउन्सिल ग्रँट; इंटर नेशन्स इन्व्हिटेशन, जर्मनी; आय.व्ही.पी. ग्रँट, यू.एस.; गव्हर्नमेंट, यु.एस.ए. डॉइशर अकॅडमीशर ऑस्टॉटिअन्ट (डी.ए.ए.डी), जर्मनी हे त्यांतील काही महत्त्वाचे सन्मान म्हणता येतील.

             

- दिलीप रानडे   

श्रेष्ठ लक्ष्मण गोरेप्रसाद