सरकार, अंबिका रमेशचंद्र
अंबिका सरकार यांचे माहेरचे नाव अंबिका नारायण भिडे असून त्यांचा जन्म मुंबईत झाला. गिरगावातील शारदासदनमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्या विल्सन महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून १९५४ साली त्यांनी एम.ए.ची पदवी संपादन केली. १९५५ ते १९६०पर्यंत एल्फिन्स्टन महाविद्यालयात व नंतर १९९२ साली निवृत्त होईपर्यंत त्या सिडन्हॅम कॉलेज, मुंबई येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या.
समकालीन लेखिकांच्या कथालेखनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असल्याचे जाणवते. कमीत-कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय, उत्कट भावभावना, कथा-भाग समर्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न अंबिका सरकार यांनी केला. ‘नकळत्या वयापासून १९५०पर्यंत माझे भरपूर वाचन झाले होते,’ असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या संस्कारी वाचनातून त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली.
१९५२-१९५३मध्ये त्यांनी ७-८ कथा एका मागोमाग एक लिहिल्या. त्यांतील एका कथेला स्पर्धेत पारितोषिक मिळाले. स्त्रीचे स्वत्व, आचार व विचार यांचे स्वातंत्र्य, परंपरागत मूल्ये बाजूला ठेवून स्वतः केलेला मूल्यामूल्य विवेक यांतून त्यांनी स्त्री-जीवनाच्या सुख-दुःखांचा वेध भावपूर्ण व संयत शैलीने आपल्या कथांतून घेतला आहे.
‘चाहूल’ (१९८०) आणि ‘प्रतीक्षा’ (१९८१) हे दोन कथासंग्रह; ‘एका श्वासाचं अंतर’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. (१९९०). त्यांचे लिखाण मोजकेच असले तरी आशयपूर्ण आहे. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘हंस’ यांसारख्या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.
विशेष उल्लेखनीय म्हणजे थिऑसफी आणि बौद्धधर्म हे त्यांच्या आवडीचे विषय असून भिक्खू संघ रक्षित यांच्या ‘हिस्टरी ऑफ माय गोइंग फॉर रेफ्यूज’ या पुस्तकाचा ‘माझ्या शरण गमनाचा इतिहास’ आणि ‘द बोधिसत्त्व आयडिअल’ या पुस्तकाचा ‘बोधिसत्त्व आदर्श’ हो अनुवाद त्यांनी केलेला आहे.