Skip to main content
x

सर्मा, पी. एन.

           १९४० च्या दशकातील जाहिरात क्षेत्रामधील महत्त्वाचे संकल्पनकार पी.एन. सर्मा यांचा जन्म कर्नाटकातील, कासरगोड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कासरगोड व बंगलोर येथे झाले, तर कलाशिक्षण बंगलोर (बंगळुरू) व मद्रास (चेन्नई) येथे झाले.

           १९३७ साली त्यांनी ‘द मद्रास मेल’च्या जाहिरात विभागात नोकरी पत्करली. नंतर ते १९४२ मध्ये भारत सरकारच्या ‘वॉर सर्व्हिसेस एक्झिबिशन डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अ‍ॅण्ड ब्रॉडकास्टिंग’ या विभागात कामाला लागले. १९४४ मध्ये ते मुंबईत आले व कार्टून फिल्म विभागात वरिष्ठ अ‍ॅनिमेटर म्हणून १९४५ मध्ये त्यांची नियुक्ती झाली.

           १९४६ मध्ये डी.जे. केमर अ‍ॅण्ड कंपनी या जाहिरातसंस्थेत ते वरिष्ठ चित्रकार म्हणून रुजू झाले. १९४८ मध्ये कंपनीतर्फे त्यांना लंडनमधल्या मुख्य कार्यालयात काम करण्यासाठी पाठविण्यात आले. सेंट्रल स्कूल ऑफ आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स, लंडन इथे संध्याकाळच्या वर्गात प्रवेश घेऊन त्यांनी इलस्ट्रेशन आणि टायपोग्रफी यांत प्रावीण्य मिळवले. फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इटली येथे प्रवास करून ते १९५० मध्ये भारतात परतले.

            डी.जे. केमर ही त्या काळातल्या जे. वॉल्टर थॉम्प्सन, स्ट्रोनॅक्स अशा मोजक्या परदेशी जाहिरातसंस्थांपैकी एक होती. बर्मा शेल, डनलॉप अशा मोठ्या परदेशी कंपन्यांच्या जाहिराती डी.जे. केमर जाहिरातसंस्था करीत असे. १९५५ नंतर काही काळातच डी.जे. केमर बेन्सन्स या जाहिरातसंस्थेत विलीन झाली आणि तिचे नामकरण ‘बोमास’ (बेन्सन्स ओव्हरसीज मार्केटिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस) असे करण्यात आले. जाहिरात क्षेत्रात पुढे नावारूपास आलेले अनेक संकल्पनकार, इलस्ट्रेटर पी.एन. सर्मा यांच्या कारकिर्दीत डी.जे. केमरमध्ये काम करत होते.

           सर्मा यांनी अनेक जाहिरातींसाठी कलासंचालक (आर्ट डायरेक्टर), संकल्पनकार आणि चित्रकार म्हणून काम केले. सर्मा यांच्या काळात चित्रकारांचा उल्लेख ‘आर्टिस्ट’ म्हणूनच केला जाई. नंतरच्या काळात तो ‘इलस्ट्रेटर’ म्हणून केला जाऊ लागला. सर्मा ह्यांच्या दृष्टीने जाहिरातीच्या निर्मितीत आर्टिस्ट-ची भूमिका महत्त्वाची असे; कारण जाहिरातीला दृश्य पातळीवरची एकात्मता आणि परिपूर्णता तोच देऊ शके.

           सर्मा यांनी वृत्तपत्रांसाठी केलेल्या बर्मा शेल तेल कंपनीच्या जाहिराती विशेष गाजल्या. सर्मा यांची व्यंगचित्रांची एक विशिष्ट शैली होती. स्क्रेपर बोर्डाची आठवण करून देणारा काळ्या रंगाचा व रेषांचा वापर, अ‍ॅनिमेशन चित्रांकडे झुकणारे व्यक्तिरेखन आणि जाहिरातीच्या मांडणीतली चित्राकृतींची लयबद्ध गतिमानता ही त्यांच्या संकल्पनाची आणि चित्रांची वैशिष्ट्ये होती. सर्मा ह्यांनी १९५६ च्या ‘कॅग’ वार्षिकात ‘ह्यूमर इन अ‍ॅडव्हर्टायझिंग’ ह्या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्यात प्रसंगनिष्ठ व्यंगचित्रे आणि व्यक्तिवैशिष्ट्यांवर भर देणारी व्यक्तिचित्रे, असे दोन प्रकार सांगितले आहेत. व्यक्तिरेखन असलेली व्यंगचित्रे जाहिरातीत अधिक उपयुक्त ठरतात. ‘विनोदामुळे जाहिरात केलेल्या उत्पादनांची विक्री वाढते का याबद्दल ठाम सांगता येत नसले, तरी व्यंगचित्रांची लक्ष वेधून घेण्याची क्षमता वादातीत आहे,’ असे ते म्हणतात. जाहिरातींच्या गराड्यात एखादे व्यंगचित्र असलेली जाहिरात असली तर त्यामुळे विनोदाचा हलकाफुलका विरंगुळा मिळतो, असे ते सांगतात. सर्मा यांनी विनोदाचा वापर आपल्या जाहिरातींमधून प्रभावीपणे केला. एकोणीसशे पन्नासच्या दशकातील जाहिरातींवर पी.एन. सर्मा यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पुढील काळात भारतीय जाहिरातींमध्ये हलक्याफुलक्या विनोदाचा आविष्कार अनेक पद्धतींनी होत राहिला. एअर इंडियाची ‘महाराजा’भोवती गुंफलेली पोस्टर्स,  आर.के.लक्ष्मण यांचा एशियन पेन्ट्सचा ‘गट्टू’ राममोहन यांनी फिल्म्स डिव्हिजन अ‍ॅनिमेशन पटांसाठी केलेली ‘भोला’सारखी व्यक्तिरेखा अशा अनेक अंगांनी या प्रसन्न शैलीचा विकास झाला.

- दीपक घारे

सर्मा, पी. एन.