Skip to main content
x

सरनाईक, अरुण शंकर

      अरुण शंकरराव सरनाईक  यांच्या घरातच कला होती. अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. अरुण यांना या दोन्ही वडीलधार्‍यांकडूनच संगीताचे धडे मिळाले. त्यामुळे   अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुण यांनी पेटी व तबला या वाद्यांच्या वादनात कौशल्य मिळवले होते. कलाक्षेत्राचे दार उघडण्यास अरुण यांना संगीताची हीच आवड उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. तसेच कलाक्षेत्रात थेट उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिले. परंतु तेथे त्यांचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो.ग. रांगणेकर हे भटाला दिली ओसरीहे नाटक बसवीत होते. अरुण यांनी या नाटकात काम केले. याच वेळी त्यांच्याकडे एक उत्कृष्ट संधी चालून आली. शाहीर प्रभाकरहा चित्रपट करण्याचे विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मनात घोळत होते. अरुण यांनी यातील शीर्षक व्यक्तिरेखा साकारावी, असे त्यांच्या मनात होते. परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट बनला नाही आणि अरुण यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबले. प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांच्या शाहीर परशुरामया चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा वरदक्षिणाआणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळाहे चित्रपटही अरुण यांना मिळाले. परंतु हे तिन्ही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री अशाया चित्रपटाने किमया केली आणि अरुणोदयझाला. या चित्रपटाने अरुण यांना मोठी लोकप्रियता मिळाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांनी तबलावादन केले होते. प्रत्यक्ष चित्रपटात सरनाईकांची तबल्यावरील सफाई पाहून अल्लारखाँनी त्यांचे कौतुक केले होते. त्यापुढे जात या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे शिवसेनाप्रमुखांनी भाकीत केले आणि नंतर ते खरे ठरले.

प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणे सहजासहजी शक्य नसते. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हाने उभी असतात. सरनाईकांचा उदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यासारख्या अभिनेत्यांची कारकिर्द ऐन भरात होती. त्यामुळे सरनाईक यांची डाळ शिजणे थोडे कठीण होते. परंतु बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेक या जोरावर ते बघताबघता इतरांच्या पुढे गेले. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर त्या काळातला मराठी चित्रपट होता. अरुण सरनाईक यांनी या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित पाहू रे किती वाटया चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले, तर सुभद्राहरणया चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधन (खलनायक) साकारला. सरनाईक यांची कारकिर्द उंचावण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘सिंहासनआदी चित्रपट. सवाल माझा ऐकामधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. केला इशारा जाता जाताया चित्रपटातही त्यांनी असाच ढोलकीवाला साकारला होता. पाच नाजूक बोटेया चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीने सादर केली. मुंबईचा जावईमधील सरनाईकांचा नाटकवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासनमधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकिर्दीमधील कळसाध्याय ठरली. मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते.

सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. त्यांनी डोंगराची मैनाआणि गणगौळणया दोन चित्रपटात सरनाईकांना पार्श्‍वगायनाची संधी दिली. घरकुलया चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून पप्पा सांगा कुणाचेहे अजरामर गीत गाऊन घेतले. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळीया चित्रपटामधील एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...हे गाणेही त्यांच्यामधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. अभिनयातील व्यस्तता कायम ठेवत, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेला त्यांनी छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्‍या आनंदग्राममध्ये ते स्वत:ला झोकून द्यायचे.

- मंदार जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].