Skip to main content
x

स्टाइन, मार्क ऑरेल

        मार्क ऑरेल स्टाइन यांचा जन्म हंगेरीत झाला व शिक्षण बुडापेस्ट, व्हिएन्ना, लाइपोझिग, ऑक्स्फर्ड व लंडन येथे त्यांचे शिक्षण झाले. संस्कृत भाषा व सर्व्हे यांचे शिक्षण घेतल्यावर ते प्रथम लाहोर ओरिएन्टल कॉलेजचे प्रिन्सिपॉल व नंतर पंजाब युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार झाले. याच वेळी दहा वर्षे परिश्रम करून त्यांनी ‘राजतरंगिणी’ची सटीप व भाषांतरित आवृत्ती काढली.

       प्रथम १८९८मध्ये बूनेर फील्डफोर्सबरोबर व नंतर आशिया खंंडात त्यांनी अनेक सफरी काढल्या (१९००मध्ये, १९०६-१९०८मध्ये, १९१३-१९१६ मध्ये) व या सफरी करताना त्यांनी मध्ययुगीन फाहियान, सून्युंग, युआनच्वांग इत्यादी व अर्वाचीन बोनिन, पी. पेलिओ, स्वेन हेडिन (१८९६) वगैरेंच्या प्रवास वृत्तांचा उपयोग केला.

      त्यांना तुर्फानच्या परिसरात सापडलेल्या अवशेषांची शंभर खोकी वाहण्यास पन्नास उंट लागले. दुुनहुआंग येथील सहस्रगुंफेत मिळालेली हस्तलिखिते व चित्रे यांनी चौतीस पेटारे भरले. दुसर्‍या सफरीत त्यांनी ऐंशी उंटांवर एकशे ब्याऐंशी खोकी आणली. त्यांनी आणलेल्या अवशेषांनी दिल्लीतील सेंट्रल एशियन अँटिक्विटीज म्युझियमचे दोन्ही भाग व्यापले आहेत. तसेच त्यांनी आणलेल्या विपुल अवशेषांपैकी पुष्कळ युरोपातील म्युझियममध्ये विखुरलेले आहेत. त्यात हजारो प्रकारच्या वस्तू आहेत. यातील लिपी व भाषा आज नष्ट झाल्या असून त्या समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सर्व साहित्य इ.स. पूर्व २ ते इ.स.च्या ११व्या शतकापर्यंतचे आहे.

      यासाठी त्यांना बर्फाची व वाळूची वादळे टाळून  पुष्कळ ठिकाणी उत्खनन करावे लागले. पुढे पुढे यांच्या या प्रचंड हव्यासास स्थानिक लोकांचा विरोध होऊ लागला व घेतलेल्या वस्तूही परत कराव्या लागल्या. पुराणवस्तूंचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन चीन सरकारने त्यांच्या मंगोलियातील सफरीस बंदी केली. त्यांनी आपले सफरीवरील ग्रंथ शास्त्रीय व लोकप्रिय अशा दोन्ही प्रकारच्या भाषेत लिहिले आहेत.

   १९४०मध्ये त्यांनी वैदिक संस्कृतींचे माहेरघर असलेल्या सरस्वतीच्या खोर्‍यात संचार केला. ती नदी आज अंशत: लुप्त असून प्रदेश वालुकामय आहे. घग्गर किंवा हकडा असे नदीचे नाव आहे. त्या बिकानेर, जैसलमीर वगैरे भागात यांना वैदिक अवशेष सापडले नाहीत.

     सिंधू नदीचे खोरे व लासवेला संस्थान (सिंधू नदी, अरबी समुद्र व बलुचिस्तान यामधील प्रदेश) या भागात त्यांनी १९४१-४२मध्ये संचार केला व अफगणिस्तानात गेले असता तिकडे ते मृत्यू पावले.

   स्टाइन यांचे ग्रंथ - (१) Sand –buried Ruisns of Khotan  (२) Ancient Khotan  (२ खंड, १९०८), (३) Ruinsof Desrt Cathay (२ खंड, १९१२), (४) Serindia  (५ खंड, १९२१), (५) The Thousand Buddhas  (६) Memoir on maps of Chinese Turkestan And kansu  (२ खंड), (७) Inner most Asia (४ खंड, १९२८), (८) On Alexander Tracks (1993), (९) On the central _asian Track  (१९३३), (१०) Old routes of western Iran . याशिवाय गेड्रोशिया, वझिरीस्थान, बलुचिस्थान येथील सफरींची प्रवासवृत्ते.

       संपादित ग्रंथ - १. Chronicles of the king of Kashmir  (कल्हणकृत, संस्कृत ग्रंथ १८९२, अनुवाद १९००), २. राजतरंगिणी, ३. हातिम्स टेल्स, ४. संस्कृत-इंग्रजी डिक्शनरी इत्यादी.

      — संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
स्टाइन, मार्क ऑरेल