Skip to main content
x

सुबंध, प्रल्हादबुवा सीताराम

    प्रल्हादबुवा सीताराम सुबंध यांची प्रमुख ओळख म्हणजे ते जोग महाराजांचे प्रिय शिष्य तर होतेच; परंतु आदर्श कीर्तनकार, प्रवचनकार व व्यासंगी, साक्षेपी लेखक होते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून समाजोपयोगी व राष्ट्रीय कार्य केले. बुवा आळंदीला राहिले आणि त्यांनी जोग महाराजांकडून वारकरी पंथाची दीक्षा घेतली. संत साहित्याच्या अभ्यासातही त्यांनी जोग महाराजांचे मार्गदर्शन घेतले. संतवाङ्मयाच्या अभ्यासकांना बुवांनी कायमस्वरूपी उपकृत करून ठेवले आहे. ते योगाभ्यास नियमाने करीत, त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य लाभले व त्याचा उपयोग बुवांच्या गावोगावी कीर्तने, प्रवचने, व्याख्याने करण्यासाठी झाला.

महाराष्ट्रभर त्यांचे चहाते होते. पुण्यात राहून प्रल्हादबुवांनी वेदविद्येचे सखोल अध्ययन केले. वारकरी संप्रदायात त्यांची ‘थोर संत’ म्हणून गणना होते. ते परिश्रमी, अभ्यासू व चिकाटीचे लेखक होते. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटविण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना स्वत:ला कमी ऐकू येई; पण त्यांचे संभाषण, निरूपण स्नेहल, प्रासादिक व अभ्यासपूर्ण असे. त्यांच्यात साधकाची, उपासकाची प्रवृत्ती होती. त्यांना प्रवासाची आवड होती, तसेच मित्र जोडण्याची कलाही अवगत होती. या अभ्यासू लेखकाला द्रव्यलाभ नव्हता. त्यामुळे पुस्तकांच्या मुद्रणासाठी व प्रकाशनासाठी त्यांना खूप कष्ट पडले.

अनेक वेदान्त ग्रंथांचे अनुवाद करण्यासोेबत त्यांनी संत ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या रचनांच्या सार्थ प्रती प्रकाशित केल्या. श्रेष्ठ कीर्तनकारांकडून समाज- प्रबोधनाच्या ज्या अपेक्षा असतात, त्या त्यांनी पूर्ण केल्या. वारकरी वर्गाचा त्यांनी मार्मिक अभ्यास केला व म्हटले, ‘‘या संप्रदायामध्ये श्रमजीवी आणि अज्ञ वर्ग विशेष आहे खरा; परंतु तो भावनाप्रधान आहे. त्यांच्या श्रद्धेचा विनियोग त्यांच्या उद्धाराकरिता झाला पाहिजे.’’ बुवांनी कृतज्ञतापूर्वक आपल्या प्रत्येक ग्रंथात आश्रयदात्यांची यादी दिली आहे.

अकोला येथे श्री शंकराचार्यांकडून त्यांना ‘संत- वाङ्मय विशारद’ अशी सन्मान्य पदवी देऊन गौरविण्यात आले. वयाच्या सत्तराव्या वर्षी पुणे येथे त्यांचे देहावसान झाले. प्रल्हादबुवा सुबंध यांच्या व्यासंगी लेखनाचे सातत्य त्यांच्या श्रेष्ठ ग्रंथसंपदेवरून सहज नजरेत भरण्याजोगे आहे : ‘वेदान्तयुक्तिप्रकाश दर्शन’, (१९२९), ‘अनुभवामृत दीपिका’ खंड १ (१९३०), ‘अनुभवामृत दीपिका’ खंड २ (१९३३), ‘विचारचंद्रोदयदर्शन’ (१९३६), ‘पासष्टी प्रदीप’ (१९३६) मराठी, ‘ओम्’ (१९३७), ‘वृत्ति प्रभाकर’ (१९४०), ‘हरिपाठदीपिका’ (१९४२), ‘पासष्टी प्रदीप’ (१९४२) हिंदी, ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड १ (१९४९), ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड २ (१९५१), ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड ३ (१९५४), ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड ४ (१९५६),  ‘अनुभवामृतदीपिका’ भाग १ व २, द्वितीय आवृत्ती (१९५६), ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड ५ (१९५८), ‘सार्थ नामदेवगाथा’ खंड ६ (१९६०).

वि.ग. जोशी

सुबंध, प्रल्हादबुवा सीताराम