सुभेदार, आनंद मुकुंद
आनंद मुकुंद सुभेदार यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील तिवसा या गावी झाला. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता व त्यांच्याकडे तिवसा येथे १०.४०हेक्टर जमीन होती. त्यांची जमीन ओलिताखालची होती. ही जमीन ते उपसा जलसिंचन पद्धतीने ओली करत असत. या जमिनीत ते संकरित कापूस, संकरित ज्वारी, केळी, गहू व भुईमूग ही पिके प्रामुख्याने घेत असत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्धोत्पादनाचाही व्यवसाय सुरू केला होता. उत्तम शेतीसाठी आनंद सुभेदार आधुनिक अवजारांचा वापर करत. जमिनीची तपासणी करून रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर ते करत. हंगामी पीक घेण्यापूर्वी ते पिकांचा आराखडा तयार करत. शेतीचा संपूर्ण हिशोब व हंगामाच्या नोंदी नियमितपणे करून ठेवण्याची सवयही त्यांनी अंगीकारली.
सुभेदार यांनी आपल्या शेतात निरनिराळे प्रयोग केले. रासायनिक खते, कीटकनाशके यांची खरेदी एकटे न करता गावातील सर्व शेतकऱ्यांसह ते करत. त्यामागे सर्वांना आर्थिक लाभ व्हावा हा विचार असे. कृषी खात्याच्या निरनिराळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा फायदा मिळवून देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत. त्यात भू-संरक्षण व भूविकास तसेच गोबर गॅस प्लँट, जमिनीच्या नमुन्याची तपासणी, खतांचा वापर यांचा समावेश असे. रासायनिक खते, पीक संरक्षण रसायने, शेतीसाठी आधुनिक अवजारे उपलब्ध करून देणे, गावाचे पीक नियोजन तयार करणे यांबाबतचे मार्गदर्शन करून ते शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत.
- संपादित