सुपे, सोपान विष्णुपंत
सोपान विष्णुपंत सुपे यांचा जन्म बुलढाणा तालुक्यातील शेंबा या लहानशा गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. त्यांनी नागपूर कृषी महाविद्यालयामधून १९५७मध्ये बी.एस्सी. (कृषी) व १९६०मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. तेथेच त्यांची महाराष्ट्र शासनातर्फे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कृषि-विस्तार खात्यामध्ये नेमणूक झाली. गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र कृषी शासनाने सुपे यांची उच्च शिक्षणासाठी नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून पीएच.डी. करण्यासाठी निवड केली. त्यांनी १९६९मध्ये ही पदवी मिळवली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९८७मध्ये अर्थशास्त्रातील पदवीही मिळवली. त्यांनी डॉ.पं.दे.कृ.वि.मध्ये विभागप्रमुख म्हणून कृषि-विस्तार विभागामध्ये २४ वर्षे यशस्वीरीत्या कार्य केले. त्यांना परिश्रमाची पावती म्हणून भारत कृषक समाज महाराष्ट्र शाखेच्या वतीने कृषिरत्न पुरस्कार मिळाला.
डॉ. सुपे यांना वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान व डॉ.पं.दे.कृ.वि. यांच्यावतीने विस्तारशिक्षण क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल २००३मध्ये पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांनी मणीभाई मानवसेवा ट्रस्ट, उरळीकांचन यांच्या वतीनेदेखील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल २००९मध्ये मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांनी भय्यूमहाराजप्रणीत ऋषी संकुल, शाखा खामगाव येथे शेतकऱ्यांना उपयुक्त असा शेतकरी प्रशिक्षण आराखडा तयार करून दिला त्याबद्दल २९ जून २००६ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.