Skip to main content
x

सुर्वे, मधुसूदन नारायण

      २० जानेवारी २००५ मध्ये मधुसूदन नारायण सुर्वे हे स्क्वाड कमांडेड या तुकडीत होते. मणिपूर येथील चुरचंद्रपुर जिल्ह्यातील अतिरेक्यांच्या अड्ड्यावर हल्ला करण्याची मोहीम या तुकडीवर सोपवण्यात आली होती. हवालदार सुर्वे हे एखाद्या निष्णात कमांडोसारखे शिताफीने या अड्ड्यामध्ये शिरले. परंतु त्याच वेळेला तिथल्या एका पहारेकऱ्याला त्यांची चाहूल लागली व तो सतर्क झाला. त्या गडबडीत सुर्वे यांच्या पोटाला इजा झाली. धोका समोर दिसत असूनही ते कौशल्याने ते पुढे सरकले.

     तेवढ्या वेळात मात्र अतिरेकी चांगलेच सावध झाले होते. प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला व आजूबाजूच्या जंगलाच्या दिशेने ते जायला लागले. हवालदार सुर्वे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पळून जाणाऱ्या अतिरेक्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यातल्या एकाला त्यांनी जखमी केले आणि बाकीच्यांच्या दिशेने बंदुकीची फैर झाडली.

     अतिरेकी व हवालदार सुर्वे यांच्यात घनघोर गोळीबार सुरूच होता. रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध होईपर्यंत सुर्वे बंदुकीच्या फैरी झाडतच राहिले. या मोहिमेमध्ये अतिशय धीटपणाने, त्यांनी एका अतिरेक्याला ठार केले व बाकीच्यांना जखमी केले. त्यांच्या ह्या अतुलनीय धाडसामुळे शत्रुला हार मानणे भाग पडले. मात्र या वेळेला त्यांनी स्वत:ला झालेल्या जखमांमुळे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. या मोहिमेदरम्यान त्यांनी दाखवलेले धैर्य, साहसी व लढाऊ वृत्ती व नेटाने शत्रूशी केलेला सामना यासाठी त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.

- संध्या लिमये

सुर्वे, मधुसूदन नारायण