Skip to main content
x

स्वामी, विज्ञानानंद

   स्वामी विज्ञानानंद यांनी १९४२ च्या लढ्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. वृत्तपत्रात लेखन, संपादन, त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचा वावर होता. चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी त्यांचा परिचय होता. त्या काळात ते भिडे या नावाने परिचित होते. क्रीडा क्षेत्रात कबड्डी, क्रिकेट यांत ते पारंगत होते. पुढे त्यांच्यामध्ये अध्यात्म, विज्ञान या विषयांची गोडी निर्माण झाली. त्यांच्यामध्ये विलक्षण आत्मशोध आणि अतींद्रिय शक्तीची प्रतिभा होती. त्यामुळेच त्यांना समोरच्या व्यक्तीच्या मेंदूलहरी कळत, दिसत. त्यांचे भविष्य कथन अचूक असे.

हस्तसामुद्रिक विषयाचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. ग्रह- ताऱ्यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे त्यांना पटत नव्हते. भविष्य हे आपल्या कर्माने बदलता येते हा त्यांचा निष्कर्ष होता. त्यांचे राजकीय भविष्य कथन खोटे ठरले नाही. संन्यास घेण्याच्या आधी त्यांना अनेक अडचणी, दु:खांचा सामना करावा लागला होता. त्यातूनच त्यांनी आपला जीवनमार्ग बदलला. १९५७ साली त्यांना दैवी साक्षात्कार झाला व आत्मशोध लागला. विज्ञानाच्या मार्गाने लोकांना ज्ञानी करावे हा संकेत मिळाला.

१९६३ साली संन्यास घेऊन , ‘स्वामी विज्ञानानंद’ हे नाव धारण करून त्यांनी भारतभर भ्रमण करून भारत जाणून घेतला. परिस्थितीचे जाणिवेने अवलोकन करून त्यांनी त्या अभ्यासाचे ज्ञानात रूपांतर केले. वैज्ञानिक अधिष्ठान असलेल्या अध्यात्माचा पुरस्कार केला. लोकसेवेसाठी माध्यम म्हणून त्यांनी चार विश्वस्त संस्थांची स्थापना केली.

एकविसाव्या शतकातील विज्ञान कसे असावे याची त्यांनी आखणी केली. ‘व्हॉट इज माइंड’ या ग्रंथात त्यांनी मनाचे सखोल विश्लेषण केले आहे. रशियातील परामानसशास्त्रज्ञ डॉ. ब्रॉदॉव्ह यांनीदेखील विज्ञानानंदांचे विश्लेषण आणि व्याख्या मान्य केली.

रोगमुक्तीसाठी शास्त्रीय संकेत, जप, मंत्र, प्रार्थना, वनस्पती या माध्यमांचा परिणामकारकपणे उपयोग करता येऊ शकतो यासाठी विज्ञानानंदांनी प्रख्यात ‘आरसीएफ’ संस्थेमार्फत संशोधन केले. मानवी मनाचा अभ्यास त्यांच्या ‘न्यू वे फिलॉसॉफी’ या ग्रंथांच्या मालिकेतून लिखित स्वरूपात प्रसिद्ध झाला आहे. मनाचे शरीरावरील परिणाम, यश, अपयश, सुखदु:ख, रोगमुक्ती, मंत्र अशा विविध विषयांवर त्यांनी २९ वृत्तपत्रांतून लेखमाला चालविल्या.

विज्ञान सोप्या शब्दांत समजावून देण्याची स्वामी विज्ञानानंद यांची शैली होती. शिक्षणशास्त्र, मेंदूशास्त्र, शरीरशास्त्र, मंत्रशास्त्र, औषधशास्त्र, न्यायशास्त्र, पदार्थविज्ञान, सूक्ष्मविज्ञान अशा कित्येक शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

जनसामान्यांच्या विविध प्रश्नांची उकल त्यांनी त्या- त्या विषयांचे अभ्यासवर्ग आयोजित करून केली. यासाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती’ केंद्रात त्यांनी जन्म-मृत्यु विज्ञान रहस्य, देवदर्शनानुभव वर्ग, बाल समस्या, कुटुंब सुखवर्धन, योगशक्ति-ध्यान, जीर्ण रोगमुक्ती, शुभ भविष्य ज्ञान, बुद्धीवर्धन शिबिरे, गर्भ सामर्थ्य, इच्छापूर्ती, मंत्रविज्ञान, वंशजकल्याण, मत्सरघातशुद्धी, मेंदूक्रांती वर्ग, यौवनक्रांतिदर्श अशा विविध विषयांचे अभ्यासवर्ग त्या-त्या वयोगटांतील व्यक्तींसाठी सुरू केले. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम जसा चौवार्षिक वर्ग, तसेच एका दिवसाचा ‘एज्युकेशन ऑफ हॅपिनेस’, ‘सक्सेस विदाउट टेंशन’ असे माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग घेतले.

स्वामी विज्ञानानंद यांनी आपल्या वैधानिक अभ्यासांती काही सैद्धान्तिक ग्रंथ समाजासाठी खुले केले आहेत. जसे मनबदलाने शरीरबदल, परिस्थितीबदल व भविष्यबदल शक्य आहे, मुलांचा बुद्ध्यांकवृद्धी शक्य, विचार, भावभावनांचे मेंदूलहरींच्या स्वरूपात होणारे वातावरणातील धक्के, मन हे जडापेक्षा वेगळे असते, जडत्वाचे नियम जीवनाला लागू पडणे, श्रीमंत, सत्ताधारी, अधिकारी यांना दु:खे जास्त असतात, मरणोत्तर आयुष्य, रोग आणि रोगमुक्ती, सुखदु:खाचे वैज्ञानिक विश्लेषण, देहान्तरितांशी संपर्क, सूक्ष्मशक्ती, मनाचा रेझोनन्स, शक्ती मिळविण्यासाठी प्रकाशावर करावयाची एकाग्रता या त्यांच्या सिद्धान्तांवरील ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

असामान्य बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या स्वामी विज्ञानानंद यांनी ‘माणूस’ या भूमिकेत कायम राहून सर्व स्तर, धर्म, पंथ, जातींतील याचकांना जास्तीतजास्त मदत करण्याचा प्रयत्न केला.

स्वामी विज्ञानानंद हे दयार्द्र, त्यागी, प्रेमळ, हजरजबाबी, सहिष्णू, मिस्कील होते, त्याचप्रमाणे ते दृढनिश्चयी, स्पष्टवक्ते, नीतिमान, काटकसरीही होते. पैशांच्या बाबतीत अतिशय दक्ष व काटेकोर असलेले स्वामी भ्रष्टाचाऱ्यांची कधीही गय करीत नसत. बुद्धी, मत्ता, सत्ता, कीर्ती उदंड लाभूनही त्यांनी जमिनीशी नाते सोडले नाही. स्वामीजींनी विज्ञानाधिष्ठित अनुष्ठानेही आयोजित केली. त्यांनी १९८१ साली मुंबईत केलेला ‘महागायत्री यज्ञ’ खूप गाजला. त्यांच्यावर त्या काळात टीकाही खूप झाली. त्या टीकांना शालीनपणे उत्तरे देऊन त्यांनी परतविले. ‘निषेध मोर्चातील प्रश्नोत्तरे’ या नावाने हा संवाद शब्दबद्ध झाला आहे. ‘शक्तिसंच’ या ग्रंथात त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा विरोध सभ्य आणि ज्ञानी चर्चेने मावळायला लावला. ‘न्यू वे प्रकाशन’ या केंद्राच्या प्रकाशनांतर्गत हे सारे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ‘मनशक्ती’ हे मासिक स्वामीजींच्या विचारांचा प्रसार आजही हजारो वाचक, साधकांकडे करीत आहे, साधकांची संख्या वाढवीत आहे. ‘मृत्यूचे मोल ओळखूनच त्याला मिळवावे लागते आणि जीवन जिंकावे लागते’ असे त्यांचे सांगणे होते.

विलक्षण कर्मयोगाने आणि प्रसंगी अघोरी वाटणाऱ्या प्रयोगांनी त्यांनी स्वत:चे जीवन आचरले. ‘नि:स्वार्थ म्हणजेच स्वार्थ माना, दु:खाचा स्वीकार करा’ असे केवळ दुसऱ्यांना सांगून ते थांबले नाहीत, तर स्वत: आत्मक्लेश केले. ते बऱ्याचदा तळहातावर निखारे ठेवत, दीन-दलितांच्या दु:खांत सहभागी होण्यासाठी, त्यांची दु:खे स्वत: अनुभवण्यासाठी त्यांनी तपाहून अधिक काळ तरटाचे जाडेभरडे, टोचणारे वस्त्र परिधान केले. आपल्या पायांवरील त्वचा सोलून काढली. पावणे दोन वर्षे बंद खोलीत बसून तपाचरण केले. त्याशिवाय रोग्यांची सेवा, मंदिरे, रस्त्यांची सफाई, अनाथाश्रमात सेवा स्वत: जाऊन केली. स्वामी विज्ञानानंदांचे ४००० साधक आज आपापल्या भागांत स्वामींचे सेवाकार्य करीत आहेत. दिवसातील एक तास समाजाला देण्याचा संकल्प ते करून आहेत. त्यांच्या सव्वाशे शिष्यांनी संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहायचे ठरवले आहे. ‘ज्ञान, सेवा, पुण्य यांचा गुणाकार म्हणजेच आपल्या जीवनातील सत्कृत्य बँक’ असा स्वामी विज्ञानानंदांनी संदेश दिला आहे.

१९९३ साली त्यांनी समाधी घेतली.

संदीप राऊत / आर्या जोशी

स्वामी, विज्ञानानंद