Skip to main content
x

ताजुद्दिन, बाबा अवलिया

    हुजूर पुरनूर सैयदना हजरत बाबा ताजुद्दिन अवलिया या सूफी आध्यात्मिक गुरूंचा जन्म मुस्लिम हिजरी सनावळीनुसार ५, रजुब्बूल १२७९ रोजी नागपूर शहराजवळील कामठी या गावात झाला. त्यांचे वडील सैयद बद्रूद्दिन इंग्रज फौजेमध्ये सुभेदार होेते. ताजुद्दिन यांची आई मरियमबी यादेखील सुभेदार मेजर शेख मीरासाहेब यांच्या कन्या होत्या. कामठी याच गावात इंग्रजांच्या फौजेची छावणी होती.

बाबा ताजुद्दिन न रडता जन्माला आले. त्यांची आईदेखील न रडताच जन्मली होती. ताजुद्दिन एक वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे आणि नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ताजुद्दिन यांना कामठी परिसरातच असलेल्या आपल्या आजोळी राहावे लागले. तेथील शाळेत त्यांनी अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी भाषा ज्ञान प्राप्त केले. त्यांना एकदा शाळेत नागपुरातील मुस्लिम आध्यात्मिक गुरू हजरत अब्दुला शाहसाहेब भेटले. शाहसाहेबांनी ताजुद्दिनना पाहिल्यानंतर, ‘‘हा मुलगा पूर्वजन्मातूनच शिकून आला आहे,’’ असे त्याच्या शिक्षकांना सांगितले. त्यांनी आपल्या झोळीतून एक खुरमा (फळ) काढला आणि तो अर्धा खाऊन उरलेला प्रसाद म्हणून त्यांना खायला दिला आणि सांगितले की, ‘‘कमी खा, कमी झोप आणि कमी बोल’’ आणि कुराण-ए-शरीफ असे ग्रहण कर, की कुराणचा अर्थ आणि संदेश सार्‍या मानवजातीच्या उद्धारासाठी कारणी लागेल.’’ या वेळी त्यांचे नामकरण ‘चिरागुद्दिन’ असेही करण्यात आले. फळाचा प्रसाद भक्षण केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून बेसुमार अश्रुधारा बरसू लागल्या. तीन दिवस पराकोटीच्या भावावस्थेत काढल्यानंतर त्यांचा जीवनक्रम एकदम बदलला.

ताजुद्दिन एकांतात बसून चिंतनात मग्न राहू लागले. ‘किसी मनुष्य के दिल को रंज मत पहुंचा’ या फारसी उद्बोधनातील आशय ते पूर्ण जगू लागले. पुढे त्यांच्या दरबारात हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिस्ती, पारसी, बौद्ध असे सार्‍याच धर्माचे लोक एकत्र येऊ लागले. ताजुद्दिन यांना शालेय शिक्षणानंतर त्यांच्या मामांनी विसाव्या वर्षी १८८१ मध्ये इंग्रजी फौजेत दाखल केले. ‘नागपूर रेजिमेंट १३’मध्ये जवान म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी तेथील इंग्रज अधिकार्‍यांना कुराण-ए-शरीफ, तसेच अन्य प्रार्थनांची शिकवण देण्यास सुरुवात केली. त्यांना देश-विदेशांत पलटणीसह फिरावे लागले.

१८८४ मध्ये ‘रेजिमेंट सागर’मध्ये बदली झाल्यानंतर एका तळावर त्यांना हजरत दाऊदसाहेब हुसैनी या सूफी गुरूंचा सहवास लाभला आणि त्यांनी अध्यात्म मार्गाला पूर्ण झोकून देण्याचे ठरविले. याच मानसिक अवस्थेत त्यांनी एके दिवशी फौजेच्या नोकरीला अलविदा केला आणि ते रानोमाळ, मुक्तपणे फिरू लागले. तो वेडा झाला आहे असे वाटून त्यांच्या आजीने वैदू, गंडेदोरे वगैरे इलाज केले; परंतु ताजूबाबांची अवस्था ‘हम क्या करें इलाज उस लाइलाज का, जो खुद दवा था, खुद लुकमान था’ अशी झाली होती. त्यांना वेडा ठरवून पोलिसांनी वेड्यांच्या इस्पितळात टाकले आणि त्यांना मारहाण केली. तेथेही त्यांची अवलियागिरी चालूच राहिली. तेथील एक वेडा पळून गेला. डॉक्टरांसह सारेच हैराण झाले. ‘तो उद्या सकाळी नक्कीच परतेल’ असे ताजुद्दिन यांनी सांगितले, आणि तो परत आलाही. अशा प्रचितींमुळे ताजुद्दिन यांच्याकडे गूढ शक्ती असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये निर्माण झाली.

ताजुद्दिनबाबांची कीर्ती नागपूर क्षेत्र ओलांडून भारतात सर्वदूर पसरली. त्यांच्या दरबारात सर्व-धर्मीय भक्तगण प्रविष्ट होत असत. दरबारातील आरतीदेखील ‘ॐ जय ताजुद्दिन स्वामी, प्रभू ताजनाथ स्वामी, विघ्नविनाशक सद्गुरू, कृपासिंधू तुम सद्गुरू शरण सकल प्राणी, जय ताजुद्दिन स्वामी’ अशा प्रकारची होती.

‘अद्वैत वेदान्त’ या आध्यात्मिक विचारसरणीवर बाबांची श्रद्धा होती. ऐहिकवादापासून मानवजातीने दूर रहिले पाहिजे ही त्यांची शिकवण होती. भारतीय संस्कृतीतील विविधरंगी धार्मिक विचारधारांना समांतर पातळीवर आणून त्यांनी सर्व-धर्मियांना सर्वसमावेशक लोकोपदेश करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. गायक डॉ. वसंतराव देशपांडे, न्यायमूर्ती हिदायतुल्ला, क्रिकेटवीर कंकय्या नायडू, त्याचप्रमाणे देवाजी राव, मथुराप्रसाद गुप्ता, गंगाधरराव चिटणीस अशा भारतभरातील अनेक कलावंत, उद्योगपती, राजकीय  प्रसिद्ध व्यक्तींना बाबा ताजुद्दिन यांचा अनुग्रह प्राप्त झाला. बाबा ताजुद्दिन यांनी, आपल्या भक्तगणांनी अर्पण केलेल्या सार्‍या धन-धान्यादी मौल्यवान चिजा लोकार्पण करून विशेषत: वंचित गरजूंना वाटून टाकल्या.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाबा ताजुुुद्दिन अवलियांची स्मारके बांधण्यात आली आहेत. नागपुरातील शक्करदरा येथील स्मृती मंदिर, सावनेर येथील श्री बाबा ताजुद्दिन दर्गा, पागलखाना दरबार, शक्करदरा दरबार या ठिकाणी बाबांची स्मृती मंदिरे बांधण्यात आली. बाबा ताजुद्दिन यांचे समकालीन अवतार मेहेरबाबा यांनी त्यांचे वर्णन ‘कुतुब’ म्हणजे अस्सल गुरू असे केले आहे. या अवलिया सूफी साधूचे देहावसान नागपुरातच झाले. ताजाबाद शरीफ, नागपूर येथे त्यांची मझार म्हणजेच ‘शरीफ-ए-दरगाह’ भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे.

 — संदीप राऊत

ताजुद्दिन, बाबा अवलिया