Skip to main content
x

ताम्हण, केशव गोपाळ

          केशव गोपाळ ताम्हण ऊर्फ ‘बापूजी’ यांचे मूळ घराणे हे आंध्र प्रदेश येथील. त्यांचा जन्म १८६० मध्ये वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी झाला. त्यांचे शिक्षण नागपूरच्या नील सीटी विद्यालयात मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृत मध्ये एम. ए. केले. त्यांचा गाढा व्यासंग होता.  नागपुरातील व्याकरण विद्वान  म.म. भटजी घाटे शास्त्री यांचे बापूजी शिष्य. संस्कृतातील घाटेशास्त्री घराण्याची कुलविद्या - ‘व्याकरण शास्त्र’ हा बापूजींचा मुख्य विषय होता. तर संस्कृत साहित्य शास्त्र  हा आवडीचा विषय होता. काव्याची आवड असल्यामुळे अनेक मार्मिक काव्य रचना त्यांनी केल्या आहेत. १९२२ मध्ये त्यांचा काव्यसंग्रह त्यांचे शिष्य प्रा. लक्ष्मण रा. कुलकर्णी यांनी प्रकाशित केला. या कविता गुणपूजक, तसेच समस्यापूर्तीच्या आहेत. मोरोपंतांच्या रचनेशी काव्यानुरूपता आढळते. निर्दोष आणि सुशोभक रचना हा स्थायीभाव आढळतो.

       बापूजी स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म यांचे पुरस्कर्ते होते. संग्राह्य, गुणपूजक वृत्ती, पराकाष्ठेचे प्रसिद्धीपरांङ्मुख, मितभाषी, विनयमधुर वर्तनाचे धनी होते.

        नागपुरातील लोकांनी ‘नागपूर महाविद्यालय’ सुरू केले. त्यासाठी बापूजींनी अथक परिश्रम घेतले होते. ते पहिले ‘भारतीय - प्राचार्य’ झाले. नागपुरातील महाविद्यालयीन शिक्षणाचे ते आद्य प्रवर्तक होते. पुढे इंग्रजांनी हे महाविद्यालय ताब्यात घेतले आणि त्याचे नाव ‘मॉरिस कॉलेज’ झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुन्हा त्याचे नामकरण ‘नागपूर  शासकीय महाविद्यालय’ झाले. प्रस्तुत महाविद्यालयातून त्या काळात विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या शिकल्या. यातील अनेक पदवीधरांचे व संस्कृत अध्यापकांचे पहिले गुरू म्हणजे बापूजी ताम्हण. यातील काही नामवंत बापूजींचे शिष्य होते. उदा.‘तिलक  यशोऽर्णव’ हे अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तक लिहिणारे चतुरस्र लोकनायक बापूजी अणे बापूजींचे शिष्य होते. तत्त्वचिंतक व तत्कालीन, माजी आरोग्य मंत्री डॉ. वा. शि. तथा दादासाहेब बारलिंगे, संस्कृत पंडित ना. न. भिडे, म. म. बाळशास्त्री हरदास, इत्यादी बापूजींनी सेवानिवृत्तीनंतर संस्कृतसाठी १९३० मध्ये ‘भोसला वेदशाळेचे’ रूपांतर ‘भोसला वेदशाळा महाविद्यालया’त केले. या महाविद्यालयाची स्थापना वाराणसीचे थोर संस्कृत पंडित लक्ष्मणशास्त्री द्रविड यांच्या पुढाकाराने झाली. महाविद्यालयाच्या जडणघडणीत, उभारणीत बापूजींचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी या महाविद्यालयाचे ‘अवेतन प्राचार्यत्व’ स्वीकारले होते.  बापूजींचे निधन १९४० मध्ये श्रावण शु. द्वितीयेला झाले.

     - डॉ. कुमार शास्त्री

ताम्हण, केशव गोपाळ