तांबोळी, लक्ष्मीकांत सखाराम
लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांचे मूळ गाव जिंतूर असून संत घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्यावर धार्मिक, सांस्कृतिक संस्कार लहानपणापासून झाले. हैद्राबादला एम.ए.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
उर्दू भाषेचा आणि उर्दू साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे. त्याच्या जडण-घडणीमध्ये मराठवाडा भूमीचा फार मोठा वाटा आहे. ते उत्कृष्ट वक्ते आणि प्राध्यापक आहेत. देगलूर महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ‘हुंकार’, ‘अस्वस्थ सूर्यास्त’ आणि ‘मी धात्री मी धरित्री’ हे तीन काव्यसंग्रह; ‘दूर गेलेले घर’, ‘अंबा’, ‘गंधकाली’ आणि ‘कृष्णकमळ’ ह्या चार कादंबर्या; ‘तवंग’ आणि ‘सलामसाब’ हे दोन कथासंग्रह, अशी पुस्तके लिहिली. ‘काव्यप्रवृत्ती आणि प्रवृत्ती’,‘कबीराचा शेला’, ‘सायंसावल्या’ हे ललित लेखन केले असून ‘गोकुळवाटा’ ही गीतमालिका लिहिली.
तांबोळी मुख्यतः कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. भोवतीचे भयप्रद आणि संभ्रमित करणारे वास्तव पकडू पाहतात. ‘हुंकार’ या काव्यसंग्रहात व्यक्तीकडून समष्टीकडे जाण्याचा प्रयत्न आहे. दुःखाची अनंत रूपे आहेत याची जाण, दांभिकतेची चीड, बेगडीपणाबद्दल तिटकारा आणि तिरस्कार हे त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. त्या काव्यसंग्रहाला इंदिरा संतांची प्रस्तावना लाभली. ‘अस्वस्थ सूर्यास्त’ हा दुसरा कवितासंग्रह असून नारायण सुर्वे आणि विंदा करंदीकरांचा प्रभाव त्यावर आहे.
तांबोळींना रितेपणाची खंत वाटते. ती खंतच वेदना बनून कवितेतून व्यक्त होते. नंतर एक प्रकारची निरिच्छता जन्माला येते आणि त्यातून उपहास प्रकट होतो. ‘बरे झाले आम्ही आमचे, आधीच आत्मे विकून टाकले, नसता बिचारे उगीचच, जागच्या जागी सडले असते,’ असे ते उपहासाने म्हणतात.
मानवी जीवनातील वंश-सातत्याच्या चिरंतन ओढीबद्दल तांबोळी म्हणतात ‘अनावर उमाळ्यानं तिने त्याला मांडीवर घेतलं, तिचा अवघा देहच पाळणा होऊन झुलू लागला, आणि तिच्या काळजातील अभंग जाऊन अंगाईला कोंब फुटला, माझ्या आईला पणतू झाला.’ ‘मी धात्री, मी धरित्री’ हा काव्यसंग्रह म्हणजे आपल्याला जन्म दिलेल्या मातीची आत्मकथा आहे. यातल्या कवितांमधून जीवनातली निराशा, अपेक्षाभंग, मूल्यहीनता, व्यावहारिकता, स्वार्थाधंता आणि भ्रष्टाचार या कारणांमुळे कवी जखमी आणि विव्हल होतो, पण शेवटी प्रखर कडवट वास्तव स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही, हे मान्य करतो.
‘दूर गेलेले घर’ ही राज्य सरकार पुरस्कार प्राप्त गाजलेली कादंबरी आहे. मानसिक संघर्ष हा कादंबरीचा आत्मा आहे. ‘ही कादंबरी म्हणजे मराठवाड्यातील विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज म्हणता येईल. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे कशी झाली, ते या कादंबरीतून दिसून येते,’ सदा कर्हाडे असे म्हणतात.
‘कृष्णकमळ’मध्ये अगतिक, हतबल झालेल्या स्त्रीची वेदना चित्रित केली असून ‘अंबा’ आणि ‘गंधकालीं’ यांमधून पौराणिक पात्रांच्या वृत्ति-प्रवृत्तीचा शोध घेतला आहे. ‘काव्यप्रवृत्ती आणि प्रवृत्ती’मध्ये आस्वादक समीक्षकाच्या भूमिकेतून साहित्यविचार केला आहे. ‘कबीराचा शेला’ हे आत्मनिष्ठ, काव्यात्म, भावनेची डूब असलेले, अंतर्मुख करणारे ललित लेखन आहे. ‘सय सावल्या’मध्ये राम शेवाळकर, धुंडामहाराज देगलूरकर, वा.ल. कुलकर्णी, ए.वि. जोशी, अनंत भालेराव इत्यादींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गोकुळवाटा’ ही एक गीतमालिका असून तीमध्ये राधाकृष्णाच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास आहे, आणि त्यातूनच गवसलेल्या या गोकूळवाटा आहेत. तांबोळी यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि महाकवी विष्णुदास पुरस्कार मिळाले आहेत.