Skip to main content
x

तासकर, लक्ष्मण नारायण

चित्रकार

            क्ष्मण नारायण तासकर हे महाराष्ट्रामधील निसर्गचित्रण व प्रसंगचित्रण या कलाप्रकारांत, जलरंगात, पांढर्‍या रंगाचा वापर करीत दर्जेदार निर्मिती करणारे महत्त्वाचे चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चित्रात प्रयोगशील रचनांसोबतच रम्य वातावरण निर्माण होते व लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटते. बदलत्या समाजरचनेत त्यांनी केलेल्या चित्रांना दस्तऐवजीकरणाचे एक वेगळेच मूल्य आहे.

            तासकर हे मूळचे महाड जिल्ह्यातील तासगावचे. पुढील काळात तासगावची शेतीवाडी सोडून तासकर कुटुंब ठाण्यात स्थायिक झाले. तासकरांचे शालेय शिक्षण ठाण्यातच झाले, तर कलाशिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले. तासकरांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. तासकर आणि लक्ष्मीबाई यांना पाच मुले होती.

            तासकर १८९४ साली ‘ड्रॉइंग टीचर्स सर्टिफिकेट’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना १८९४ मधल्या परीक्षेत ‘ऑर्नमेंट इन मोनोक्रोम’ या कामासाठी विशेष प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी १८९५ मध्ये आर्किटेक्चरचा अभ्यास केला व एलिमेंटरी आर्किटेक्चर ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांनी १८९४ मध्ये पेंटिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि १८९८ मध्ये त्यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. तासकरांना १८९८ च्या पेंटिंगच्या शेवटच्या परीक्षेत ‘मेयो पदक’ व ‘लाइफ स्टडीचा उत्तम संच’ असा उल्लेख असलेले विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. त्यांची त्याच वर्षी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झाली.

            तासकरांनी आपल्या कोणत्याही चित्रावर तारखेची नोंद न केल्याने त्यांच्या चित्रकारितेचा निश्‍चित कालखंड ठरवता येत नाही ही एक मोठीच अडचण आहे.  चित्रप्रदर्शनात चित्रकृती पाठवण्याचा त्यांचा काळ १९०४ ते १९३६ हा होता. बॉम्बे आर्ट सोसायटी, मद्रास फाइन आर्ट सोसायटी, म्हैसूर दसरा प्रदर्शन, सिमला फाइन आर्ट सोसायटी इत्यादी कलासंस्थांच्या वार्षिक प्रदर्शनांत ते नियमितपणे चित्रकृती पाठवत असत. त्यांच्या चित्रांना १९०४ पासून १५ पारितोषिके व अनेक प्रशस्तिपत्रके मिळत गेली. त्यांच्या ‘गंगा माता — बनारस’ या चित्रास १९२९ साली बॉम्बे आर्ट सोसायटीचे रजतपदक प्राप्त झाले, तर १९३० साली ‘ऑफरिंग बनारस’ या चित्रास म्हैसूर दसरा प्रदर्शनाचे रजतपदक मिळाले. बिकानेरचे महाराज सर गंगासिंहजी बहादूर हे तासकरांच्या कलेचे चहाते होते व त्यांच्या संग्रहात तासकरांची अनेक चित्रे आहेत. तासकरांनी केलेले बिकानेरच्या महाराजांचे व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रणाचा उत्कृष्ट नमुना आहे. तासकरांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण होते. इस्त्री केल्यासारखे खांद्यावरचे कडक उपरणे, आणि बटरफ्लाय कडक कॉलरमधून दिसणारी बारीक मान, डोक्यावर पगडी आणि कपाळाला गंध असा त्यांचा पारंपरिक वेश असे. तासकर वृत्तीने कर्मठ असून त्यांचा स्वभाव अबोल व तापट होता.

            ब्रिटिश यथार्थदर्शी चित्रपरंपरा हा तासकरांच्या पिढीमधल्या चित्रकारांचा आदर्श होता. अकॅडमिक शिक्षणपद्धतीमधून आखीव, रेखीव व शिस्तबद्ध चित्रणाचे धडे या पिढीने गिरवले; पण त्यामधून बाहेर पडून स्वतंत्र व मुक्त अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न तासकरांनी केला. तासकरांच्या चित्रांमध्ये अकॅडमिक पद्धतीच्या आणि अभिजात शैलीच्या चौकटीत राहून त्यांनी काही बाबतींत स्वातंत्र्य घेतलेले दिसते. उदा. पांढर्‍या रंगाचा वापर (जलरंगात), परिप्रेक्ष्याच्या विविध कोनांचा कौशल्याने वापर करून साधलेला अवकाशाचा आभास, तजेलदार विरोधी रंगछटांचा धूसर पार्श्‍वभूमीवर केलेला उपयोग. यांतून सौंदर्यपूर्ण रचनेचा तर प्रत्यय येतोच; पण मुख्य म्हणजे या चित्रणाला तपशिलांमधून येणारा इथल्या मातीचा गंधही जाणवतो.

            ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी इंग्लंडमध्ये वेम्ब्ले येथे भरलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने १९२४ साली लिहिलेल्या लेखात (‘द ब्रिटिश एम्पायर रिव्ह्यू’) तासकरांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, ‘तासकरांच्या चित्रांमधील माणसे आणि इमारती, त्यांची वेषभूषा आणि अलंकारांच्या विश्‍वासपूर्ण, तपशीलवार चित्रणामुळे अस्सल भारतीय वाटतात. इतक्या अचूकपणे ते अन्य कुणाही पाश्‍चात्त्य चित्रकाराला साधणे खूप कठीण आहे.’ 

            तासकरांच्या चित्रकृतींचे विषय निसर्गचित्रणाशी व दैनंदिन मानवी जीवनाशी संबंधित होते. नदीचे घाट, रस्ते, मंदिरे, बाजार अशा तत्कालीन समाजाच्या सार्वजनिक वावराच्या जागा व त्यांचे मानवी जीवनाशी येणारे संबंध यांना प्रमुख स्थान होते. अचूक रेखांकन व विविध रंगछटांच्या वापरातून निर्माण केलेले वातावरण हे चित्रकार तासकर यांच्या चित्रांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. सर्वसाधारणपणे निसर्गचित्रात निसर्ग हा विराट स्वरूपात दाखवून मानवाचे नगण्य अस्तित्व सूचित केले जाते. पण तासकरांच्या चित्रात निसर्ग व मानव या दोघांच्याही समान अस्तित्वातून त्यांचे चित्र फुलत जाते.

            तासकरांची तैलरंगातील ‘रांगोळी’, ‘महाराष्ट्रातील मंदिराचे दृश्य’, ‘मंदिरासमोर प्रसाद देणारी स्त्री’ अशी अनेक चित्रे उल्लेखनीय आहेत, तर ‘साधूंना नमस्कार करताना’, ‘घाटावरील स्त्रिया’, ‘घाटावरील ऋषी’, ‘सिनेमंदिरात’, ‘बाजार’, ‘उभा हनुमान — नाशिक घाट’, ‘धार्मिक विधी — नाशिक घाट’, ‘स्नानानंतर वस्त्रे बदलताना’, ‘बनारस घाट’, ‘टांगा सवारी’ अशी अनेक जलरंगातील चित्रे प्रसिद्ध आहेत. रस्ते, नदीकाठचे घाट यांच्याशी संबंधित चित्रांत स्त्री-पुरुषांचे व वास्तुकलेच्या समूहचित्रणावरचे तासकरांचे प्रभुत्व लक्षात येते. स्त्री-देहाची कमनीयता व आकृतिबंधांची लयबद्धता, वस्त्रप्रावरणे, अलंकार यांचे उत्कृष्ट रेखांकन आणि रंगलेपनाचे कौशल्य या चित्रांमधून जाणवते. चित्रावकाशात अनेक आकारांची गर्दी असूनही रंगलेपनाच्या कौशल्यामुळे प्रतिमांची दाटी डोळ्यांना जाणवत नाही, हे त्यांच्या शैलीचे आणखी एक वैशिष्ट्य. चित्रातील मानवी समूहातील प्रत्येक मानवाकृतीचे उभे केलेले व्यक्तिमत्त्व बघता, निसर्गचित्रणासोबतच तासकर हे उत्कृष्ट व्यक्तिचित्रणही करत होते, याचे प्रत्यंतर येते. तासकरांनी माणसांच्या व विशेषत: स्त्रियांच्या बारीकसारीक हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण केलेले त्यांच्या चित्रांत प्रत्ययाला येते. त्यामुळे एकाच चित्रात अनेक मनुष्याकृती काढून त्यांच्यात सुसंवाद निर्माण करणे त्यांना सहज शक्य झाले.

            तासकरांचे समकालीन चित्रकार त्या काळात स्त्रियांचे चित्रण करताना त्यांना सौंदर्याचे प्रतीक म्हणून रंगवीत असत. परंतु तासकरांनी त्यांच्या चित्रांतील स्त्रिया या एकूण समाजजीवनाचा एक घटक म्हणून रंगविल्या हे विशेष. वास्तववादी शैलीत चित्र रंगविणार्‍या नंतरच्या काळातील चित्रकारांनीही हा दृष्टिकोन दाखवल्याचे आढळत नाही.

            यथार्थ दर्शनाबरोबरच घनता व खोलीचा आभास याची समर्थ जाण तासकरांच्या चित्रात दिसते. त्यांची, रंगलेपनाची शैली बरीचशी अभिजाततेकडे झुकणारी होती. लहानलहान ‘स्ट्रोक्स’च्या साहाय्याने ते रंगलेपन करीत असत.

            तासकरांच्या जलरंगातील चित्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला पांढर्‍या रंगाचा वापर. असा पांढर्‍या रंगाचा वापर जलरंगात करणे हे त्या काळात तांत्रिकदृष्ट्या निषिद्ध मानले जात असे. कारण, चित्र ज्या पांढर्‍या कागदावर रंगविले जाते, तो कागद कालांतराने पिवळा पडतो व पांढरा रंग लावलेला भाग, हा डागासारखा दिसू लागतो, हा या रंगलेपनपद्धतीतील मोठाच दोष असतो. तासकरांचे समकालीन चित्रकार सा.ल. हळदणकर पूर्णपणे पारदर्शक जलरंगात चित्र रंगवीत, तर के.बी. चुडेकर पूर्णपणे अपारदर्शक जलरंग वापरीत. म्हणूनच तासकर त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या जलरंगातील चित्रकृतींसाठी प्रसिद्ध होते. परंतु तत्कालीन चित्रकारांच्या माध्यम - शुद्धतेच्या आग्रहामुळेे तासकरांच्या जलरंगात पांढरा रंग वापरून केलेल्या कलानिर्मितीची व त्यातील वैशिष्ट्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. किंबहुना आज त्याबाबत विचार करताना तासकरांवर काहीसा अन्यायच झाला असल्याचे जाणवते. वास्तविक सतराव्या शतकापासून भारतात आलेल्या युरोपियन चित्रकारांनी भारतीय समाजजीवन व निसर्ग यांबद्दल आकर्षण वाटून अनेक चित्रे रंगविली. परंतु त्यांच्या चित्रातील दस्तऐवजीकरणाला सांस्कृतिक परकेपणाचा स्पर्श होता. या पार्श्‍वभूमीवर तासकरांच्या चित्रात, शैली पाश्‍चिमात्य यथार्थदर्शी असली तरी ती या मातीतील वाटतात. म्हणूनच येथील संस्कृती व लोकजीवनाशी ती एकरूप झाल्याचे प्रत्यंतर देतात. तासकरांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली तत्कालीन समाजजीवनाची नोंद. रविवर्मांना भारतीय देवदेवता व पौराणिक विषयांवरील चित्रे रंगवून जे यश मिळाले, त्याचेच अनुकरण त्यानंतरच्या काळातील कलावंत करीत होते. त्यातून भोवतालच्या प्रत्यक्ष जीवनापेक्षा कल्पनारम्य आदर्शवादी चित्रणाकडेच (आयडिअ‍ॅलिझम) त्या काळातील चित्रकारांचा कल होता. (उदा. भरमणप्पा कोट्याळकर ऊर्फ चंद्रवर्मा, ए.एच. मुल्लर, एम.व्ही धुरंधर इत्यादिंची चित्रे.) पण तासकरांनी त्यांच्या चित्रांतून फक्त निसर्ग न रंगवता ते जगत होते त्या काळातील मराठी संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, समाजव्यवस्था व लोकजीवन यांची सातत्याने नोंद घेतली.

            तत्कालीन अनेक चित्रकारांप्रमाणेच तासकरांच्या चित्रांचे विषय मराठी भावविश्‍वामधले होते. त्यामधून त्यांनी येथील संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, समाजव्यवस्था यांतील केलेल्या नोंदीला एक वेगळेच महत्त्व आहे. एका अर्थाने या चित्रकृती तत्कालीन महाराष्ट्रीय समाजरचनेचे दृश्यकलेद्वारे दस्तऐवजीकरण करणार्‍या चित्रशैलीच्या मानदंड ठरल्या आहेत.

- माणिक वालावलकर

तासकर, लक्ष्मण नारायण