ताठे, पांडुरंग लक्ष्मण
चित्रकार
निसर्गापासून प्रेरणा घेऊन, त्याचे वास्तववादी शैलीत अनुकरण न करता ते अंतर्मनाचे प्रकटीकरण असले पाहिजे या भूमिकेतून पुण्यातील चित्रकार पांडुरंग लक्ष्मण ताठे चित्रनिर्मिती करतात. विशेष म्हणजे पुण्यासारख्या परंपरा जपणार्या शहरात राहूनही ताठे यांनी आपल्या अमूर्त चित्रकलेतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
ताठे यांचा जन्म पुण्यात पर्वती गाव परिसरात झाला. बागकामाच्या परंपरागत व्यवसायामुळे घरातील कोणाचाही चित्र-शिल्पकलेशी संबंध नव्हता. शालेय शिक्षण सुरू असताना पाठ्यपुस्तकातील बाबूराव सडवेलकरांनी लिहिलेला आबालाल रहिमान यांच्यावरील लेख वाचून त्यांच्यात कलाविषयक कुतूहल व ओढ निर्माण झाली. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य दिवाकर डेंगळे यांची निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके ताठे यांना शालेय वयातच पाहावयास मिळाली. अभिनव कला विद्यालयातील छंदवर्गात प्रवेश घेतल्यावर ही प्रेरणा अधिकच तीव्र झाली शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून १९७९-८० मध्ये ‘आर्ट टीचर्स डिप्लोमा’ व त्यानंतर १९८४ मध्ये जी.डी. आर्ट (पेंटिंग) ही पदविका प्राप्त केली.
आधुनिक भारतीय दृश्यकलेच्या क्षेत्रात १९९० ते २०१० हा कालखंड महत्त्वाचा आहे. या दोन दशकांत झालेल्या जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रांत खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे पडसाद कलाक्षेत्रातही उमटणे अनिवार्य होते. कलानिर्मिती ही केवळ निर्मिती न राहता तिचे व्यावसायिकीकरण होत गेले. कलाकार, कलासंग्रहक, कलाग्रहक आणि कलाप्रदर्शक अशा अनेक घटकांचे महत्त्व या कालखंडात वाढले. पांडुरंग ताठे हे या कालखंडातील एक प्रातिनिधिक कलावंत म्हणावे लागतील.
त्यांनी १९७९ ते १९८४ या काळात कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘निसर्गचित्र’ हीच त्यांची प्रेरणा होती. वास्तववादी शैलीत न अडकता त्यांची वाटचाल हळूहळू सर्जकतेकडे होत गेली. १९८८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ना.सी. बेंद्रे यांच्या एका मुलाखतीतील नंदलाल बोस यांनी बेंद्रे यांना दिलेला सल्ला वाचून ताठे अंतर्मुख झाले व त्यातून त्यांच्या कलानिर्मितीला वेगळे वळण मिळाले. ‘निसर्गचित्राचं वास्तववादी अनुकरणात्मक चित्रण न करता ते अंतर्मनाचं प्रकटीकरण असलं पाहिजे; कारण भारतीय कला ही अंतर्मनावरच आधारित आहे,’ असा सल्ला थोर चित्रकार नंदलाल बोस यांनी चित्रकार बेंद्रे यांना त्यांच्या उमेदीच्या काळात दिला होता.
ताठे यांच्या चित्राला १९८४ मध्ये प्रथम राज्य पुरस्कार मिळाला. (प्रसिद्ध चित्रकार तय्यब मेहता आणि जहांगीर सबावाला यांच्यासारखे प्रयोगशील आणि आधुनिक विचारांची कास धरणारे कलावंत त्यावेळी परीक्षक होते.)
‘निसर्गचित्र’ ही प्रेरणा घेऊन कालानुरूप आणि वैचारिक प्रगल्भतेनुसार ताठे यांची चित्रशैली बदलत गेली. बाह्य अनुकरणाऐवजी अंतर्मनाचे पडसाद आविष्कृत करणार्या त्यांच्या कलाकृतींचे कलासमीक्षक, जाणकार रसिक आणि चित्र-खरेदीदार यांनी स्वागत केले. ताठे यांच्या चित्रात निसर्गापासून प्रेरणा घेऊन रंग आणि आकारातून एक अमूर्त रचना कॅनव्हासवर साकार होते. असे घडत असताना ही प्रक्रिया विविध प्रकारच्या रचना व आकृतिबंध व रंगसंगतींसह अस्तित्वात येते. यात रंगलेपनातून निर्माण होणारया विविध पोत आणि आकारांचा खेळ दिसून येतो.
ताठे यांच्या मानवी आकृतिबंधावर आधारित कामाबद्दल कवी दिलीप चित्रे यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘ताठ्यांची मानवी चेहर्यांची चित्रे ही ऑब्स्ट्रॅक्ट नसून फिगरेटिव्ह आहेत.’ ‘ऑब्स्ट्रॅक्ट रिअॅलिटी’ असे त्यांचे वर्गीकरण चित्रे यांनी केले होते.
पांडुरंग ताठे यांना १९८४ ते १९८८ या कालावधीत दोन राज्य पुरस्कारांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकूण अकरा पुरस्कार मिळाले केवळ विशिष्ट शैलीत अथवा माध्यमात न अडकता त्यांनी अनेक प्रयोग केले. ब्लॅक अॅण्ड व्हाइट ड्रॉइंगपासून अॅल्युमिनिअम कास्टिंगमध्ये केलेल्या शिल्पांपर्यंत अनेक कलाप्रकार त्यांनी हाताळले. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनांबरोबरच अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरांवरील प्रदर्शनांत त्यांचा सहभाग आहे आणि त्यांची अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली आहेत.
आपल्या १९९१ च्या एकल प्रदर्शनानंतर चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून ताठे काही ठाम निष्कर्षांपर्यंत आले. त्यांपैकी एक म्हणजे, यापुढे कोणत्याही स्पर्धात्मक प्रदर्शनात भाग घ्यायचा नाही असे त्यांनी ठरविले आणि ते आचरणातही आणले. लोकांना काय पाहिजे यापेक्षा मला काय पाहिजे हे सूत्र ठेवून काम करणार्या या कलावंतावर ताओ, बुद्ध, ओशो यांच्या विचारांचाही प्रभाव आहे.
- सुधाकर चव्हाण