Skip to main content
x

टेंब्ये, कृष्णाजी सखाराम

टेंब्ये महाराज (शिवानंद) श्रीस्वामी शिवानंद

   कोकणातील राजापूर जवळील ‘पांगरे’ येथील कृष्णाजी सखाराम ऊर्फ स्वामी शिवानंद टेंब्ये महाराज हे वाचासिद्धी प्राप्त सिद्धावस्थेत पोहोचलेले त्रिकालज्ञानी महापुरुष होते. दत्तावतार वासुदेवानंद टेंब्ये स्वामी यांनी स्वत: कृष्णाभाऊंना अनुग्रह दिला व हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींकडे पाठविले. सिद्धारूढ स्वामी, हुमणाबादचे माणिकप्रभू अशांच्या कृपाप्रसादाने कृष्णाभाऊ यांची साधना पूर्णावस्थेस पोहोचली होती. कृष्णाभाऊंना ज्योतिषज्ञान तर होतेच; पण वाचासिद्धीमुळे ते बोलतील ते सत्य होत असे.

     बॅरिस्टर जयकर, बॅरिस्टर बॅनर्जीसह अनेकांना  त्यांचा अनुभव आला होता. कृष्णाभाऊ यांचा जन्म चैत्र वद्य एकादशी रोजी खोत घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या वागण्यात, बोलण्यात ज्ञानी पुरुषाची उपजत लक्षणे दिसत होती. वयाच्या सहाव्या वर्षी रात्री सर्वांना उठवून त्यांनी ‘‘गोठ्यात बैलाला फास लागलेला आहे, त्याला त्वरित सोडवा अन्यथा तो मरेल,’’ असे सांगितले. घरापासून थोड्या दूरवर असलेल्या गोठ्याकडे जाण्याचा कंटाळा करून नोकर म्हणाले, ‘‘आम्ही आताच तिकडून वैरण टाकून आलो आहोत. बैल मजेत खात आहेत.’’ कृष्णाभाऊ मुळीच मानायला तयार नसल्याने अखेर आईने गड्यांना गोठ्यात पाठविले आणि गड्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले, तर कृष्णाभाऊ खरे असल्याचे त्यांना दिसले. बैलाला दावे तोडून त्यांनी वाचविले.

     वयाच्या आठव्या वर्षी कृष्णाभाऊंची मुंज झाली. घरीच वडिलांपाशी त्यांचे शिक्षण झाले. पंधराव्या वर्षी कृष्णाभाऊ नोकरीसाठी मुंबईला गेले. ते गिरगावच्या झावबाच्या वाडीत चुलत्याकडे राहत. वारद यांच्या पेढीवर जमाखर्च ठेवण्याची त्यांना नोकरी मिळाली; पण ती टिकली नाही. नंतर ठाकूरद्वारजवळ एका वखारीत त्यांनी काही महिने नोकरी केली. मग भेंडीबाजारात संसारे यांच्या वखारीत त्यांना नोकरी मिळाली. आई आजारी असल्याची बातमी ऐकून कृष्णाभाऊ मुंबईला रामराम करून घरी परतले. आईची तब्येत बिघडत गेली आणि १९०५ साली तिचे निधन झाले.

     कृष्णाभाऊंचे वडील सखारामपंत हे दत्तावतार वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी यांचे अनुग्रहित होते. वासुदेवानंद सरस्वती नृसिंहवाडीला आले आहेत असे कळताच, सखारामपंतांनी कृष्णाभाऊंना त्यांच्या दर्शनाला नेले. कृष्णाभाऊंची जन्मकुंडली पाहून वासुदेवानंद सरस्वती यांनी सांगितले, ‘‘याला अध्यात्माचे उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त होईल, गुरुकृपा उत्तम लाभेल, प्रासादिक गोष्टींचा लाभ होईल; पण संसारसुख मिळणार नाही. जीवन आत्मानंदाने कृतार्थ होईल.’’ कृष्णाभाऊंनी आपणांस अनुग्रह मिळावा, अशी वासुदेवानंद सरस्वतींकडे प्रार्थना केली. त्यांनी ती मान्य केली. अशा प्रकारे पिता व पुत्र दोघेही वासुदेवानंद सरस्वतींचे अनुग्रहित झाले. स्वामींनी कृष्णाभाऊंना मंत्र उपासनेबरोबरच पूजेसाठी एक शाळिग्रम, तसेच दोन छाट्या दिल्या. ‘‘दत्त उपासनेत राहा. ही छाटी कामधेनू आहे,’’ असा त्यांनी उपदेश केला.

     पुढे वर्षभरात कृष्णाभाऊंच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर केवळ साधना, तपश्चर्या हाच कृष्णाभाऊंचा नित्य नेम झाला. त्यांनी दिवाणजी गोविंद पळसुले यांच्या मदतीने खोतींचा व्यवहार सांभाळला. गावातील एका सहकारी संस्थेचे ते चेअरमनही होते. त्यांना अनेक वर्षे कोर्ट-कचेर्‍याही कराव्या लागल्या. या काळात त्यांनी माणिकप्रभूंना पत्र पाठवून मार्गदर्शनाची अपेक्षा केली. तेव्हा माणिकप्रभू यांनी टपालाने ज्ञानेश्वरी, दासबोध व एक रुद्राक्षमाळ प्रसाद म्हणून पाठविली.

     सद्गुरू श्री वासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगितल्यामुळे कृष्णाभाऊ हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या दर्शनास निघाले. कृष्णाभाऊंच्या पेटीत लोकमान्य टिळकांचे चित्र व ‘केसरी’चा अंक होता. त्यामुळे गोव्यामध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावे लागले.

     आपल्याला येथून कोण सोडविणार अशी चिंता टेंब्ये यांच्या मनात निर्माण झाली. त्या वेळी एका अनोळखी माणसाने पोलिसांकडे टेंब्ये यांची चौकशी केली व जामीन देऊन सुटकाही केली. तो माणूस तातडीने निघून गेल्यामुळे टेंब्ये त्याच्याविषयी विचार करीत सिद्धारूढ स्वामींच्या दर्शनाला गेले. या पहिल्याच भेटीत सिद्धारूढ स्वामींनी टेंब्यांकडे त्या जामीनाबाबत आपणहून चौकशी केल्यामुळे टेंब्ये थक्क झाले. ही गोष्ट स्वामींना अंतर्ज्ञानानेच कळली हे जाणून ते स्वामींना शरण गेले व स्वामींनी त्यांच्यावर आपली पूर्ण कृपा केली. त्यांचा स्वामींशी झालेला  पत्रव्यवहार पाहण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांना स्वामींकडून कृष्णाभाऊंबाबत समजले होते आणि त्यांचा कृष्णाभाऊंशी पत्रव्यवहारही झाला होता.  

     पांगरे येथील शिवानंद यांचे निवासस्थान (आश्रम) अत्यंत निसर्गरम्य व साधनानुकूल असे एक परमपावन स्थान आहे. हरिहरेश्वराचे मंदिर हा त्यातीलच एक भाग आहे. वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी स्वामी शिवानंद टेंब्ये महाराज यांचे महानिर्वाण झाले. घरापुढे अंगणात असलेले त्यांचे समाधिस्थान असंख्य साधकांचे प्रेरणास्थान आहे.   

   — विद्याधर ताठे

टेंब्ये, कृष्णाजी सखाराम