Skip to main content
x

टेंब्ये, वासुदेव गणेश

टेंबे स्वामी

     कोकणातील सावंतवाडीजवळ असलेल्या माणगावी, श्रावण वद्य पंचमी, शके १७७६,रविवारी (इ.स.१८५४) वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई टेंब्ये होते.

      आठव्या वर्षी वासुदेवाचा व्रतबंध संस्कार झाला खरा; परंतु पाचव्या वर्षापासूनच या तल्लख बुद्धीच्या बालमूर्तीचे पाठांतर सुरू झाले होते.

     ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्रिकाल स्नान व संध्या, गायत्री मंत्र पुरश्चरण, वेदविद्या अध्ययन, मंत्रशास्त्र अध्ययन व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होत असे. त्यासाठी त्यांना  वे.शा.सं. विष्णुशास्त्री उकिडवे,वे.शा.सं.शंभुशास्त्री साधले, ज्योतिषशास्त्रतज्ज्ञ विष्णुपंत अळवणी आणि वे.शा.सं. नीलंभट पद्ये यांचे मार्गदर्शन लाभले.

     या किशोरवयातच रानावनांत फिरून सर्व वनस्पती निरीक्षण आणि आयुर्वेदाचा अभ्यासही ते करत होते. त्यामुळे ते मानवी तन आणि मनाचे धन्वंतरी झाले.

     वयाच्या एकविसाव्या वर्षी श्री. गोडे यांच्या ‘बायो’ या सुकन्येशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर तिचे नाव ‘अन्नपूर्णा’ असे ठेवण्यात आले. या गृहस्थाश्रमातही त्यांची आध्यात्मिक-पारमार्थिक दिनचर्या अधिक काटेकोर, व्यापक आणि सखोल बनली. माणगावी, दत्तमंदिरात स्थापन करण्यासाठी ‘कागल’ गावी त्यांना सगुण, सुंंदर दत्तमूर्ती लाभली होती. हळूहळू त्यांची साधकावस्था प्रगत झाली.

     शके १७९९ मध्ये त्यांना पितृवियोग झाला. अर्थात, कुटुंबातील कर्ता मुलगा म्हणून मातृसेवेबरोबर श्रीदत्तपूजा त्यांनी कटाक्षाने आरंभिली. दत्तमंदिरासाठी मिळालेले तीन खंडीचे शेत, विहीर यांची मशागत, व्यवस्था, श्री दत्तपूजेसह आरती, धुपारती, भजन, कीर्तन, योगध्यान-साधना, अनुष्ठान, दर शनिवारी-रविवारी दत्तप्रभूंची पालखी, मंदिरातील मूर्ती, औदुंबर तळी स्थापिलेल्या पादुका, पालखीतील उत्सवमूर्ती व पादुका आणि प्रवासातील श्रीदत्तप्रभूंची मूर्ती या सेवांमध्ये ते कोणतीही कसूर ठेवत नसत.

    त्यांच्या गृहस्थाश्रमाची समाप्ती करणाऱ्या दोन घटना घडल्या होत्या. शके १८११ च्या सुमारास त्यांना पुत्रप्राप्ती आणि नंतर पुत्र वियोग, शके १८१३ मध्ये सौ.अन्नपूर्णाबाईंचे देहावसान झाले. गृहस्थाश्रमातील सुख-दुःखांच्या अनुभवांनी समृद्ध आणि पूर्ण विरक्त होऊन श्री दत्तगुरूंच्या आज्ञेस अनुसरून त्यांनी शके १८१३ मध्ये संन्यास ग्रहण केला. प.पू. गोविंदस्वामी ऊर्फ ब्रह्मय्या स्वामींकडून संन्यास दीक्षा ग्रहण करून ते श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी झाले व प.पू.नारायण स्वामींकडून दण्डदीक्षा घेऊन ते पूर्ण संन्यस्त बनले. उज्जयनी येथे त्यांचा प्रथम चतुर्मास झाला.

     श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतींची साधकावस्था आता सिद्धावस्थेत परिणत झाली. परिपक्व सिद्धयोगी परिव्राजक होऊन त्यांनी आसेतु हिमाचल पदभ्रमण, तेही अनवाणी व मस्तकावर छत्र न धरता केले. उण्यापुर्‍या १५६ गावांना-देवस्थानांना भेटी; माणगावच्या निर्मला नदीपासून ते थेट कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, घटप्रभा, मलप्रभा, वैनगंगा, मंदाकिनी, अलकनंदा, गंगा या सर्व नद्यांचे पूजन करताना या लोकमाता सरितांना श्रीमत् वासुदेवानंदांच्या विचारधारेत विशेष स्थान आहे. कृष्णा आणि नर्मदा या दोन नद्यांशी त्यांचे विशेष सख्य होते. ‘कृष्णालहरी’, ‘नर्मदाअष्टक’ त्या सख्यभक्तीतून निर्माण झाले होते.

     संन्यास ग्रहणानंतर पहिला चतुर्मास उज्जयनी येथे करून तेविसावा चतुर्मास त्यांनी गरुडेश्वरी पूर्ण केला आणि शके १८३६, आनंद नाम संवत्सर, आषाढ शुद्ध प्रतिपदेस रात्री अकरा वाजता आपले शिष्य रामचंद्र प्रकाशकर यांच्या सान्निध्यात त्यांनी आपली देहयात्रा पूर्ण केली. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी श्री वामनराव गुळवणी महाराज, करवीर संकेश्वर पीठाचे शंकराचार्य शिरोळकर शास्त्री यांच्यासारखी शिष्य मंडळी निर्माण केली.

    द्विसाहस्त्री गुरुचरित्र (संस्कृत, शके १८०६), द्विसाहस्त्री टीका, शिक्षात्रयम् (संस्कृत व प्राकृत), श्रीदत्तचंपू, श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र (संस्कृत), श्रीकृष्णालहरी (संस्कृत), प्रश्‍नावली, श्री सप्तशती, गुरुचरित्र सार, नित्य उपासनाक्रम, श्रीदत्तात्रेय कवच,  अपराधक्षमापन स्तुतिस्तोत्र, श्रीदत्तस्तोत्र-(मनःशांतीसाठी), षट्पंचाशिका स्तोत्र, श्रीवेदपाद स्तुती, श्रीपादश्रीवल्लभ स्तोत्र, श्रीगुरुचरित्र त्रिशती दत्तकाव्य, श्रीदत्तलीलामृताब्धिसार, मंत्रात्मक श्लोक, जयलाभदायक, यशदायक श्रीदत्तात्रेय स्तोत्र, श्रीसत्यदत्तव्रत पूजा कथा, श्रीदत्तपुराण (संस्कृत), श्रीदत्तमाहात्म्य (मराठी) आदी श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामींचे साहित्य प्रसिद्ध आहे.

— मराठे

टेंब्ये, वासुदेव गणेश