Skip to main content
x

तेंडुलकर, मंगेश धोंडोपंत

            अनेक वर्षे व्यंगचित्रांना छंद म्हणून जवळ केलेल्या तेंडुलकरांनी गेल्या पंधरा वर्षांत वेगाने वाटचाल केलेली आहे. या काळात त्यांनी आपल्या व्यंगचित्रांची सुमारे चाळीसहून अधिक प्रदर्शने सादर केली. काही सामाजिक प्रश्न त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडले. त्या प्रश्नांचा त्यांनी सक्रिय आंदोलनातूनही पाठपुरावा केलेला आहे. ते छान बोलतात. चुरचुरीत भाषेतील त्यांच्या नाट्यसमीक्षाही वाचकांच्या ओळखीच्या आहेत. या सर्वांमुळे पुणेकर रसिकांमध्ये त्यांना उत्तम लोकप्रियता लाभली आहे.

             मंगेश धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी बी.एस्सी (१९५८) पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या व्यंगचित्रांना १९५४ पासून प्रारंभ झाला. शिक्षणानंतर त्यांच्या सी.डब्ल्यू.पी.आर.एस., एस.टी., संरक्षण खाते इत्यादी ठिकाणी नोकर्‍या झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी एक व्यवसायही सुरू केला. वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त अशी काही साधनसामग्री ते बनवीत. आता मात्र पुण्यात राहूनच पूर्ण वेळ व्यंगचित्रांच्या क्षेत्रात ते रमले आहेत. त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नाही. स्वप्रयत्नांतून त्यांनी चित्राची भाषा संपादन केली.

             उपहास व विडंबनाची भाषा त्यांना मुळातच अवगत आहे. ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकरांचे ते धाकटे बंधू होत. तेंडुलकर घराण्याच्या साहित्यिक गुणांचा स्पर्श त्यांना झाला. त्यांच्या व्यंगचित्रांसोबतचे मथळे त्यामुळे साहजिकच समर्पक व खमंग असतात. ते नाट्यसमीक्षाही लिहितात. ‘कार्टुनिस्ट्स कंबाइन’ या मराठी व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे ते १९९४-९५ या काळात अध्यक्ष होते. या संघटनेने अनेक संमेलने, व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, परिसंवाद, चर्चा इ. कार्यक्रम योजले होते. अनेकांप्रमाणे तेंडुलकरांनाही अशा उपक्रमांच्या अनुभवाचा लाभ झाला.

             तेंडुलकरांनी व्यंगचित्रांची प्रदर्शने पुणे, गोवा व कोलकाता येथे भरविली. चाळीसहून अधिक प्रदर्शनांतून, त्यांच्या चित्रांमधून रसिकांना आनंद मिळाला. एकरंगी चित्राबरोबरच काही रंगीत चित्रेही त्यांनी सादर केली. ‘कार्टून्स’ या नावाचा त्यांच्या निवडक चित्रांचा एक संग्रह १९९८ मध्ये प्रकाशित झाला.

             ‘दै. सामना’, मुंबई, ‘ऐक्य’, सातारा या वृत्तपत्रांतून  तेंडुलकरांची मोठ्या आकाराची व एक कॉलमी पॉकेट कार्टून्स, तर ‘महाराष्ट्र हेरल्ड’, पुणे या इंग्रजी दैनिकासाठी, तसेच ‘आवाज’, ‘जत्रा’, ‘माहेर’ इ. अनेक मासिकांतून त्यांची विपुल व्यंगचित्रे प्रकाशित झाली व होत आहेत. त्यांच्या चित्रांत अतिशयोक्तीचे व  कल्पनाविलासाचे (फँटसीचे) दर्शन अनेकदा घडते. मोटारीचा पाना, पंप, स्क्रू अशी तांत्रिक साधनेही चित्रांत दिसतात. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व लाचारी, स्त्रियांचे प्रश्न, बेशिस्त वाहतूक, शासकीय यंत्रणेतील ढिसाळपणा, असे अनेक प्रश्न त्यांच्या टीकेचे विषय असतात. याबाबतचा त्यांचा निषेध मनस्वी व तीव्र असतो. काही वेळा नैराश्य व वैफल्यही त्यातून दिसते. त्यांचे स्वत:चे अर्कचित्र अनेकदा व्यंगचित्रात आलेले असते. 

             मधुकर पाटकर ‘आवाज’,  पु.ल. देशपांडे अशा काही नामवंतांचे विडंबनात्मक चित्रदर्शन शब्दांसह त्यांनी मांडलेले आहे. बेशिस्त वाहतुकीबद्दलचा त्यांचा निषेध त्यांनी व्यंगचित्रांतून मांडला. अशा वेळी ते सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत जातात. भर चौकात ते सचित्र पत्रकेही वाटतात. वाहतूक विभागासाठी भित्तिपत्रके (पोस्टर्स) बनवून देतात. व्यंगचित्रकलेबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे असे ते मानतात. पूर्वीच्या मानाने मुद्रित साहित्यात व्यंगचित्रांचा प्रभाव वाढतो आहे, त्याबाबतची समजदारीही वाढते आहे. मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांचा गौरव मुंबई मराठी पत्रकार संघाकडून पुरस्काराच्या रूपाने केला गेला. म. सा. प. चा चिं. वि. जोशी पुरस्कार तसेच  मा. दि. पटवर्धन पुरस्कारही त्यांना लाभला आहे.

              - शि.द. फडणीस, आर्या जोशी

तेंडुलकर, मंगेश धोंडोपंत