तिवारी, दुर्गाप्रसाद आसाराम
खानदेशात राहणार्या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली.
‘काव्यकुसुमांजली’ (१९१६) व ‘काव्यरत्नमाला’ (१९२०) या स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ (१९२०), ‘मनोहरलीला’ (१९२०), ‘ऐतिहासिक खंडकाव्य’ (१९२०), ‘काव्यतुषार’, (१९२३, राष्ट्रीय कविता) ‘चंडीशतक’ (१९२७) अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. ‘झाशीची संग्रामदेवता’ (१९२५) या काव्यसंग्रहात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ या प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.
पूर्वसूरींच्या पराक्रमाची आठवण देऊन वाचकाला अंतर्मुख करणारे त्यांचे आणखी एक ओजस्वी खंडकाव्य ‘महाराणा प्रतापसिंह’ (१९२६) हे फार गाजले.
‘मनोहरलीला’, ‘मान्यांची यमुना’ (१९२६) आणि ‘नंदिनी’ (१९३०) ही अद्भुतरम्य कल्पित व इतिहास यांचे मिश्रण असलेली खंडकाव्ये आहेत. ‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ असे प्रतिपादन करण्यासाठी या पराक्रमाची कवने निर्माण झाली असे दिसते.
शिवकालीन हिंदी कवी भूषण यांच्या ‘शिवबावनी’, ‘शिवप्रताप’, ‘शिवराजभूषण’ या काव्यांची मराठी रूपांतरेही त्यांनी केली. मायभूमीसाठी प्राणाची बाजी लावणार्या वीर पुरुषांचा सातत्याने जयजयकार करणार्या तिवारींचे मराठी काव्यसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.
- संपादक मंडळ