Skip to main content
x

ठकार, सुलभा निशिकांत

सुलभा निशिकांत ठकार यांचा जन्म पुणे येथे  वसंतराव व आनंदीबाई लोणकर यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील उत्तम ऑर्गन वाजवत व त्यांच्या आईला अनेक पदे पाठ होती. त्यामुळे त्यांना बालपणापासून संगीताचे संस्कार प्राप्त झाले. शालान्त परीक्षेत संस्कृत विषयासाठी त्यांना महामंडळातर्फे पारितोषिक व शिष्यवृत्ती प्राप्त झाली, तसेच संस्कृत विषयात त्यांनी विद्यापीठातून प्रथम क्रमांकही पटकावला. पुढे त्यांचा  निशिकांत ठकार यांच्याशी विवाह झाला. ते समीक्षक व अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.

ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक केशवबुवा इंगळे तसेच त्यांचे शिष्य पं.ना.वा. दिवाण यांच्याकडून सुलभा ठकार यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांच्यावर विजय (दाजी) करंदीकर यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीचे संस्कार झाले. तसेच, ठुमरी व सुगम संगीताचेही शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आकाशवाणीच्या  स्पर्धांमध्ये अखिल भारतीय स्तरावर पारितोषिक मिळाले.

यानंतर त्यांना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांची दीर्घ तालीम मिळाली. पटबिहाग, रामदासी मल्हार, चारुकेशी, जयंत मल्हार यांसारख्या अनवट रागांत त्यांनी नवीन बंदिशींची निर्मिती केली.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘संगीत अलंकार’ या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळविला. पं. वसंतराव राजोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘संगीत आणि सौंदर्यशास्त्र’ या विषयावर प्रबंध लिहून गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ ही सर्वोच्च पदवी मिळविली. त्यांचे ‘संगीत आणि सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

आकाशवाणी, पुणे केंद्रावरून वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी सातत्याने शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सादर केले. ‘सूरसिंगार’ या मुंबई येथील संस्थेकडून त्यांना ‘सूरमणी’ ही पदवी प्राप्त झाली. त्यांनी भारतातील विविध भागांमध्ये संगीताच्या मैफली सादर केल्या.

त्यांच्या ‘संगीत इंद्रधनू’ या संगीत नाटकास नाट्यलेखनाचे पारितोषिक प्राप्त झाले. संगीतविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून प्रचलित संगीताचा त्याच्याशी असणारा संबंध स्पष्ट करणारे ‘भारतीय संगीतशास्त्र - नवा अन्वयार्थ’ हे त्यांचे पुस्तकही लक्षवेधी ठरले.

‘संगीत कला विहार’ या मासिकामध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले. ‘गानवर्धन’ पुणे या संस्थेतर्फे प्रकाशित ‘वेध नाट्यसंगीताचा’ या ग्रंथामध्ये त्यांनी ‘नाट्यसंगीत ही एक स्वतंत्र गायनशैली आहे’ हे स्पष्ट करणारा लेख लिहिला.

ठकार यांनी ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथावर, तसेच ‘वैदिक संगीत ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत’ या विषयावर अनेक विद्यापीठे व दूरदर्शनवरून सप्रयोग व्याख्याने दिली आहेत. टोकियोच्या संगीत विद्यापीठामध्ये त्यांनी भारतीय संगीतावर व्याख्यान दिले. त्यांच्या कन्या डॉ. पौर्णिमा धुमाळे या त्यांच्या शिष्या आहेत. सोलापूर येथील आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी सुमारे वीस वर्षे संस्कृत विषयाचे अध्यापन केले.

डॉ. पौर्णिमा धुमाळे

ठकार, सुलभा निशिकांत