Skip to main content
x

थोपटे, दिनकर शंकर

शिल्पकार

              फायबर ग्लास माध्यमात व्यावसायिक व सर्जनशील शिल्पे घडविणारे शिल्पकार म्हणून पुणे परिसरात ख्यातनाम असलेले प्रा. दिनकर शंकर थोपटे यांचा जन्म जेजुरी-थोपटेवाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई व वडिलांचे नाव शंकर गेनबा थोपटे होते. दिनकर थोपटे यांना लहानपणापासूनच चित्रकलेची व विशेषत: मातीची खेळणी बनविण्याची आवड होती. त्यांचे मामा नानासाहेब पवार चित्रकार होते. त्यांचे प्रोत्साहन दिनकर थोपटे यांना लाभले. शालेय जीवनात त्यांना खूप अस्थिरतेचा सामना करावा लागला. सुरुवातीची शाळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १ मध्ये त्यांचे शिक्षण सुरू झाले. तेथे चित्रकला शिक्षिका हिरा ओगले यांनी त्यांच्यातील कलागुण जाणून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

              त्यापुढचे माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठी हायस्कूल येथे झाले. आर्थिक चणचण असताना तेथील आळसुंदेकर सरांनी थोपटे यांना हरतर्‍हेने मदत केली. तेथे शाळेच्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर शिवाजी महाराजांचे अश्‍वारूढ चित्र निवडण्यात आल्याने थोपटे यांचा उत्साह शतगुणित झाला. नंतर या शाळेतून त्यांनी महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मूर्तिकामातील त्यांची जाण लक्षात घेऊन क्षीरसागर सरांनी थोपटे यांना शाळेची गणेशोत्सव मूर्ती बनविण्याची संधी दिली आणि भावी काळातील त्यांचा शिल्पकार बनण्याच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. १९६० मध्ये त्यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या बदाम काळभोर यांच्याशी झाला.

              रेखाकला व रंगकलेचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून पूर्ण केले. प्राचार्य दिगंबर डेंगळे, प्रा. डी.एस. खटावकर व प्रा. मुरलीधर नांगरे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्या मूळच्या कलागुणांना अधिक उभारी लाभली. १९६९ साली जी.डी. आर्टची पदविका उत्तम तर्‍हेने प्राप्त केल्यानंतर दिनकर थोपटे यांनी अभिनव कला महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. ते २००० पर्यंत प्राचार्यपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळून बत्तीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

              गेल्या पन्नासपेक्षा अधिक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिनकर थोपटे शिल्पकलेची अव्याहतपणे साधना करीत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, हत्ती गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणेशोत्सव, हुतात्मा बाबू गेनू मंडळ अशा अनेक प्रतिष्ठित मानांकित मंडळांसाठी त्यांनी मूर्तिकाम व सजावट केली आहे. भारतीय पारंपरिक शैली, वास्तववादी पाश्‍चात्त्य शैली, आधुनिक समकालीन शैली अशा शिल्पकलेच्या विविधस्पर्शी अंगांनी त्यांनी शिल्पकलेचा अभ्यास केला. त्यांची सिमेंट, काष्ठ, पाषाण, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, गन मेटल, फायबर ग्लास, अशा विविध माध्यमांतील आधुनिक शिल्पे ठळक आकार, लयबद्ध रेषा, सुडौल मांडणी, पोतांचा योग्य परिणाम, भावनोत्कट अभिव्यक्ती यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण झाली आहेत.

              चार वेळा राज्य पुरस्कार, २०११ मध्ये महाराष्ट्र राज्यातील श्रेष्ठ शिल्पकार म्हणून मानपत्र व रोख पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने केलेला गौरव, हैद्राबाद आर्ट सोसायटी, बॉम्बे आर्ट सोसायटी, नाशिक कला निकेतन, महाकौशल कला परिषद, रियाज आर्टिस्ट ग्रूप, पंजाब, आंध्र प्रदेश कौन्सिल ऑफ आर्टिस्ट अशा राष्ट्रीय प्रदर्शनांमधून त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या शिल्पकलेतील प्रावीण्याची साक्ष देतात. त्यांच्या ‘प्रवासी’ या शिल्पाकृतीसाठी त्यांना १९९६ मध्ये ललित कला अकादमी, नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

              हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर थोपटे यांनी स्पर्धात्मक कला प्रदर्शनांतून स्वत:हून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर समाज-जागृती करणार्‍या, ऐतिहासिक मूल्यांचे जतन, संवर्धन करणार्‍या प्रबोधनपर, वास्तववादी शिल्पाकृतींच्या प्रकल्पांना त्यांनी वाहून घेतले आहे. त्यांनी राजा केळकर म्यूझियम, महालक्ष्मी मंदिर (पुणे), आर. अॅण्ड डी.ई. लिओनार्दो दा व्हिंची ऑडिटोरियमसाठी शिल्पे केली. यापैकी ६५×४ फुट आकाराच्या म्यूरलसाठी केलेल्या उठावशिल्पात भारतीय शिल्पकलेतील पहिले शतक ते अठराव्या शतकापर्यंतच्या उत्तमोत्तम शिल्पाकृतींचे दर्शन घडते. महत्त्वाची मंदिरे, गुंफा, स्तूप यांच्या देखण्या प्रतिकृती यात आहेत.

              नागपूर येथील पारडीतील भारतरत्न लता मंगेशकर उद्यानात चाळीस फूट उंचीचे नटराजाचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. अकलूज (सोलापूर) येथे २००३ ते २००६ या काळात साकार केलेला ‘शिवसृष्टी’चा शिल्पप्रकल्प थोपटे यांच्या कलाजीवनातील एक मानबिंदू आहे. ही शिवसृष्टी १२११ मधल्या यादवकालीन भुईकोट किल्ल्याच्या साडेचार एकरांमध्ये उभारली आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक उत्कट प्रसंग तिथे साकारले आहेत.

              महाळुंगे येथील हुतात्मा बाबू गेनूंच्या जीवनावरील शिल्पाकृती, तसेच देहू - पुणे येथील आनंद डोह परिसरात श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या शिल्पसृष्टीचे भव्य काम थोपटे यांनी साकारले आहे. येथे संत तुकाराम महाराजांच्या जन्मापासून ते वैकुंठगमनापर्यंतचा जीवनप्रवास विविध प्रसंगांच्या शिल्पाकृतींतून साकारण्यात आला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, हॉलंड, फ्रान्स, जपान, इंग्लंड, कोरिया, कॅनडा, चीन येथील कलासंग्रहालयांतून थोपटे यांच्या शिल्पाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. साधी राहणी आणि व्रतस्थ  कलासाधना हे त्यांच्या जीवनाचे आदर्श आहेत.

              - मिलिंद फडके

थोपटे, दिनकर शंकर