Skip to main content
x

ठोसर, बाजीराव विनायक

     बाजीराव विनायक ठोसर यांचा जन्म विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील खामगाव येथे झाला. तेथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९२९ साली वयाच्या सोळाव्या वर्षी मध्यप्रांत आणि वऱ्हाड-विदर्भ या संपूर्ण प्रदेशांसाठी घेतल्या गेलेल्या मॅट्रिक्युलेशन परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आला होता, तर वऱ्हाडमधून ते पहिल्या क्रमांकावर होते. ठोसर यांची तरल बुद्धिमत्ता त्या वेळेपासून सिद्ध झाली होती. पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर हे शहर निवडले आणि तिथल्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला.

     हा योगायोग चांगलाच म्हटला पाहिजे. एक तर १९२९ सालापासूनच नागपूरचे विज्ञान महाविद्यालय स्वत:च्या अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळेसह, नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये सुरू होत होते. जगभरातील प्रगत देशांत विज्ञानाच्या नवनव्या क्षेत्रांत होत असलेल्या घडामोडी पाहता, भविष्यकाळ विज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्याची खात्री पटत चालली होती.

     त्यातून आणखी एक योगायोग म्हणजे, त्याच वेळी सर सी.व्ही. रमण यांची नोकरीनिमित्त नागपूरला नियुक्ती झाली होती आणि ते त्यांच्या प्रयोगासाठीची उपकरणे याच विज्ञान महाविद्यालयातून मिळवीत होते. म्हणून डॉ. ठोसरांना सर सी.व्ही. रमण यांच्या संपर्कात येण्याची संधी प्राप्त झाली होती.

     महाविद्यालयाचे प्राचार्य ओवन स्वत: भौतिक विज्ञान आणि त्यातूनही प्रायोगिक भौतिकीत पारंगत असल्याने त्यांचा भर प्रामुख्याने प्रायोगिक विज्ञान संशोधनावर होता. त्यामुळे डॉ. ठोसर यांना १९२९ ते १९३५ सालांपर्यंतच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वैज्ञानिक पायाभरणीच्या काळात खूपच फायदा झाला. त्यांनी भौतिकी विज्ञानात एम.एस्सी. पदवी १९३५ साली संपादन केली. योगायोग म्हणजे, विज्ञान जगतात सुप्रसिद्ध असलेल्या बोस - आइन्स्टाइन सांख्यिकी सिद्धान्ताचे एक जनक प्रा.एस.एन. बोस हे ठोसरांच्या एम.एस्सी. प्रायोगिक परीक्षेत त्यांचे परीक्षक होते! ‘‘प्रा.बोस यांनी या परीक्षेदरम्यान तब्बल दोन तास माझ्याशी बोलून, ‘झीमन परिणाम’ प्रयोगाच्या अनुषंगाने वैज्ञानिक विचारधारेबाबतचा मला जणू वस्तुपाठच दिला,’’ अशी ठोसरांनीच नोंद करून ठेवली आहे. ठोसरांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच खास करून स्वामी रामदास विवेकानंद, अरविंद घोष, वगैरेंच्या भारतीय तत्त्वचिंतनाबाबत त्यांना रुची निर्माण झाली होती. शिवाय त्यांनी संस्कृत भाषा, भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, वक्तृत्व, सखोल अभ्यासपूर्ण चर्चा, अशा अनेक अंगांनी समृद्ध व्यासंग केला होता.

     एम.एस्सी. झाल्यानंतर लगेचच ठोसर यांना बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या सुप्रसिद्ध संस्थेत संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यातच सर सी.व्ही. रमण त्या वेळी तेथेच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या संशोधनाचा विषयही ठोसरांच्या आवडीचा असल्याने, त्यांच्या दृष्टीने ही मोठी पर्वणीच होती. पुढील दोन वर्षे ठोसरांच्या संशोधन प्रज्ञेचा मजबूत पाया घातला गेला. ठोसरांनी तेथे माणिक (रूबी) या रत्नाच्या स्फटिकावर केलेल्या संशोधनावर आधारित दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध केले. यानंतर अनेक वर्षांनी जगात लेझरचा शोध लागला आणि तोही माणिक स्फटिकावर आधारलेला होता, ही बाब लक्षणीयच समजली पाहिजे.

     १९३७ साली ठोसरांना नागपूरच्या त्यांच्याच महाविद्यालयात प्राचार्य ओवन यांनी व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. १९४६ सालापर्यंत नागपूरला भौतिकशास्त्राच्या तरुण विद्यार्थ्यांना शिकविण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. तथापि तेवढ्यावरच संतुष्ट न राहता, परदेशी जाऊन पुढील संशोधन करण्याचा विचार करून ठोसरांनी त्यासाठी किंग एडवर्ड स्मृती शिष्यवृत्ती मिळविली. १९३८ साली एक वर्षासाठी इंग्लंडमधील मार्कोनी कंपनीत, बिनतारी संदेशवहन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते १९३९ साली भारतात परतले.

     दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रा. ठोसरांनी भारत सरकारकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविली. १९४६ साली इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी अणुविज्ञानशाखेत डॉ. ऑलिफंट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांच्या आतच पीएच.डी. मिळविली. या कामात त्यांनी ‘इलेक्ट्रोस्टॅटिक बीटा रे स्पेक्ट्रोमीटर’ हे अणुकेंद्र संशोधनासाठी उपयोगी ठरणारे महत्त्वाचे संयंत्र स्वत: बनविले व त्यावर काही मोजमापेही घेतली. त्या काळातच डॉ. भाभा काही निमित्ताने तेथे आले असताना डॉ. भाभांशी त्यांची पहिली भेट झाली. डॉ.भाभा भारताच्या अणुसंशोधन प्रकल्पाची जुळवाजुळव करण्यात गुंतले होते. त्यांच्या गुणग्रहक नजरेने डॉ. ठोसरांमधील वैज्ञानिक प्रतिभा हेरली होती. त्यांनी डॉ. ठोसरांना मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी बोलावून घेतले. डॉ. ठोसरही अशा संधीच्या शोधात होतेच. १९४९ साली त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आपले काम सुरू केले.

     डॉ. ठोसरांच्या विज्ञान संशोधन प्रज्ञेला फुलविणारा कालखंड म्हणजे टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील त्यांची उणीपुरी तीस-पस्तीस वर्षांची दीर्घ कारकीर्द. डॉ. भाभा त्यांच्या पद्धतीला अनुसरून प्रथम योग्य व्यक्तीची निवड करून मग त्या वैज्ञानिकाला कामाबाबत शक्य तितकी जास्त मोकळीक देत असत. डॉ. ठोसरांनादेखील त्यांनी अशीच मोकळीक दिली. ‘अणुकेंद्र विज्ञान’ हा विषय त्या काळात जगभर अभ्यासला जात होता. एकीकडे इलेक्ट्रॉनिक्स या तंत्रशाखेची घोडदौड चालू होती. त्यातच संगणक तंत्रही विकसित होत होते. वैश्विक किरणांच्या (कॉस्मिक रेज) उच्च ऊर्जा असलेल्या प्रक्रिया अभ्यासल्या जात होत्या. तथापि डॉ. ठोसरांनी आपले लक्ष अणुकेंद्राशी संलग्न प्रक्रिया, उदा. रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉन-बीटा किरणांच्या प्रारणाबाबत सखोल अभ्यास करण्याकडे वळविले. त्यांनी निवडक ताज्या दमाच्या हुशार अशा निवडक संशोधक वैज्ञानिकांना हाताशी धरून अणुकेंद्र वर्णपटाविषयी (न्यूक्लियर स्पेक्ट्रोस्कोपी) सर्वंकष स्वरूपाचे संशोधनकार्य सुरू  केले. ते आजतागायत भारतभर पथदर्शी म्हणून वाखाणले जात आहे. याच काळात अशाच प्रकारचे संशोधन भाभा अणू संशोधन केंद्रातही चालू असायचे. टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि भाभा अणू संशोधन केंद्र या दोन्ही संस्था एकमेकांच्या हातात हात घालून एक प्रकारची परस्परपूरक आणि मैत्रीपूर्ण चढाओढ करू लागल्या. त्यांचेही श्रेय डॉ. ठोसरांचेच आहे.

     आपले वैज्ञानिक कार्यातील अनुभव डॉ. ठोसरांनी त्यांच्या ‘लाइफ विथ सायन्स इन इंडिया’ या पुस्तकात नोंदून ठेवले आहेत. डॉ. ठोसर १९७८ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून भौतिक विभागाचे अधिष्ठाता या पदावर असताना निवृत्त झाले. त्यानंतरही अनेक वर्षे त्यांचा टाटा मूलभूत संस्थेतील संशोधन कार्याशी मानद प्राध्यापक या नात्याने संपर्क होता. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी डॉ. ठोसरांची जीवनयात्रा संपली.

डॉ. गो. के. भिडे 

ठोसर, बाजीराव विनायक