Skip to main content
x

ठोसर, हरिहर शाहूराव

     ‘‘पूर्वसुरींनी पुराभिलेखांचे खूप संशोधन करून ठेविले आहे. त्यांच्या काळात इतिहास संशोधनाने जेवढी माहिती उपलब्ध होती, त्याच्या मदतीने नवोपलब्ध साधनांची संगती त्या विद्वानांनी लावली आहे. परंतु काळ जसजसा पुढे सरकत जातो, तशी नवी ऐतिहासिक साधने उजेडात येतात. त्याच्या आधाराने पूर्वप्रकाशित ऐतिहासिक साधनांचे पुनरावलोकन करून नवी समीकरणे मांडणे गरजेचे असते. त्या पुराभिलेखांचे पुनर्वाचन करणे, पाठ निश्चिती करणे, कठीण शब्दांची अर्थ निश्चिती करणे, त्यात आलेल्या स्थळांची ओळख पटवून स्थळ निश्चिती करणे आदी बाबींची चर्चा करणे हे सुद्धा संशोधनाचे एक अंग बनले आहे. ऐतिहासिक साधनांचे रवंथच म्हणा ना!’’ हे उद्गार आहेत पुराभिलेख संशोधक डॉ. हरिहर ठोसरांचे.

     डॉ. हरिहर ठोसरांचा जन्म केसापुरी, जि. बीड येथे झाला. ते १९६५ मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे इतिहास विषयात एम.ए. झाले. त्याच विद्यापीठात त्यांनी ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ मराठवाडा’ या विषयावर प्रबंध सादर करून १९७७ मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या बिकट अशा कौटुंबिक परिस्थितीवर मात करून स्वकर्तृत्वावर शिक्षण पूर्ण केले.

     पदव्युत्तर शिक्षणानंतर सुरुवातीला त्यांनी पुरातत्त्व खात्यात संशोधक म्हणून सेवा केली. तद्नंतर औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. ते एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रपाठक आणि इतिहास विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. इ.स.१९९६ मध्ये ते त्या पदावरूनच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मुंबई येथील अनंताचार्य इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इतिहास संशोधक म्हणून बहुमोल योगदान दिले. त्यांनी सुमारे ५०हून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.

     पुराभिलेख संशोधन व वाचन, पाठ पुन:परिष्कर  असे त्यांनी खूप काम केले. विशेषत: स्थळ नाम व त्यांची निश्चिती आणि कोरीव लेखांतील भूगोल यांची त्यांना आवड होती. त्यांनी आपला पीएच.डी. प्रबंधसुद्धा ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ मराठवाडा’ या विषयावरच सादर केला. या प्रबंधात आणखी भर घालून ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ या शीर्षकाने इ.स. २००४ मध्ये प्रकाशित केला. प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राच्या व गोव्याच्या भूगोलावरील एक विद्वतपूर्ण ग्रंथ म्हणून त्याची नोंद घ्यावी लागेल. या काळातील भूगोलाविषयीची एक मोठी खाणच अभ्यासकापुढे उघडी झाली आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. या क्षेत्रातील विद्वानांकडून या कृतीचे विशेष स्वागत व प्रशंसा झाली.

     ‘एपिग्रफिक सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘प्लेसनेम्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थांचे ते सक्रिय सभासद होते. सुरुवातीपासून ते या परिषदांच्या अधिवेशनास हजेरी लावून तेथे शोधनिबंध सादर करीत. पुराभिलेख आणि ऐतिहासिक भूगोल या विषयांवर डॉ. ठोसर यांनी सुमारे १२५ शोधनिबंध वाचले. हे निबंध संस्थेच्या जर्नल्समधून नंतर प्रसिद्ध झाले आहेत.

     पुराभिलेख या विषयातील त्यांच्या पांडित्याचा सन्मान म्हणून ‘एपिग्रफिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने त्यांना इ.स.२००१मध्ये ताम्रपट प्रदान करून  त्यांचा गौरव केला. या गौरवाने त्यांचा या विषयातील उत्साह द्विगुणित झाला. प्राचीन भूगोल आणि स्थल नामे ही इतिहास रचनेची प्रमुख स्रोत होत, अशी त्यांची ठाम विचारधारा होती.

     महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाकडून प्रसिद्ध होणार्‍या जिल्हा दर्शनिकामधील इतिहास विभागातील नोंदीचे कार्य डॉ. ठोसर यांनी केलेले आहे. या विभागाकडून प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर’, इतिहास : प्राचीन काळ (खंड १), यातील वातापीचे चालुक्य व राष्ट्रकूट राजवंश ही दोन्ही प्रकरणे डॉ. ठोसरांच्या लेखणीतून उतरली आहेत.

     मराठवाड्यातील व कोकणातील ग्रमीण भागातील महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना त्यांनी इतिहासाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल संबंधितांकडून त्यांचा उचित गौरवही झाला. अखिल भारतीय महाराष्ट्र इतिहास परिषदेचे चौथे अधिवेशन इ.स.१९९५ मध्ये नागपूर येथे भरले होते. त्या अधिवेशनात प्राचीन विभागाचे अध्यक्षपद डॉ. ठोसरांनी भूषवले हातेे. इ.स.२००१मध्ये वसई विकासिनी तर्फे गुणीजन संशोधक म्हणून त्यांना गौरवण्यात आले.

     इ.स.२००१मध्ये तामिळनाडूतील कोर्टालम येथे २७वे अखिल भारतीय पुराभिलेख परिषदेचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात  परिषदेतर्फे डॉ. ठोसरांना ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. २००२मध्ये म्हैसुरू विश्वविद्यालयाकडून त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आणि २००३मध्ये भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकाता शताब्दी महोत्सवानिमित्त अविरत संशोधनासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

     महाराष्ट्राच्या प्राचीन ऐतिहासिक -भौगोलिक विषयासंबंधी अभ्यास व चर्चा ज्या ज्या वेळी होईल, त्या त्या वेळी डॉ. ठोसरांचे नाव अवश्य घ्यावे लागेल एवढे कार्य त्यांनी करून ठेवले आहे.

      —आनंद नागप्पा कुंभार   

ठोसर, हरिहर शाहूराव