Skip to main content
x

उपासनी, काशीनाथ गोविंदशास्त्री

उपासनी महाराज

    नाशिकजवळील सटाणा या गावातील गोविंदशास्त्री उपासनी यांना सहा मुले होती. त्यांतील दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा काशीनाथ हाच पुढे श्री उपासनी महाराज म्हणून प्रसिद्ध झाला. काशीनाथाचे शालेय शिक्षण सटाणा या गावीच झाले. लहानपणापासून त्याच्या मनात विरक्तीची भावना होती; पण त्या वेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न, संसार म्हणजे काय? हे कळण्याआधीच त्याचे लग्न लावण्यात आले. संसार-तापाने दग्ध झालेला काशीनाथ एके दिवशी घरातील कोणालाही न सांगता घरदार सोडून नाशिकला आला व भिक्षा मागून पोट भरू लागला. इकडे काशीनाथ याची पत्नी अगदी किरकोळ आजाराचे निमित्त होऊन मरण पावली.

     घरच्या लोकांना काशीनाथच्या भवितव्याची काळजी वाटू लागली. जर त्याला प्रपंचाच्या बेडीत अडकविले तरच त्याचे चित्त थाऱ्यावर येईल, या विचाराने त्याचा शोध घेऊन त्याला घरी आणला व त्याच्यासाठी स्थळाचा शोध सुरू झाला. जर आपण घरी राहिलो, तर पुन्हा प्रपंचाच्या बेडीत अडकू, पुन्हा सुटका होणार नाही, असा विचार मनात येऊन, विरक्तीने पछाडलेला काशीनाथ घरादाराचा त्याग करून पुण्यास निघाला व त्याने ओंकारेश्वराच्या मंदिरात मुक्काम ठोकला. भिक्षा मागून, तर कधी उपाशीपोटी राहून तपसाधना करू लागला.

     पुढे पुणे सोडून तो कल्याणला आला. पण तेथेही त्याची उपासमार सुरूच राहिली. कारण, स्वत: उच्चवर्णीय ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणाशिवाय  इतर कोणाकडूनही तो भीक स्वीकारीत नसे. त्यामुळे त्याच्या उपासमारीत आणखीनच भर पडली. काही वेळा पाणी पिऊन भूक भागविण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हते. तपसाधनेच्या भुकेपुढे त्याला पोटाची भूक महत्त्वाची वाटत नव्हती.

     कल्याणमध्येही काशीनाथ याला मानसिक शांती लाभली नाही. त्यामुळे काशीनाथ ऊन-पावसाची तमा न करता परत नाशिकला आला. नाशिकमधील एका डोंगरावर असलेल्या कपारीमध्ये त्याने मुक्काम ठोकला. पोटात अन्नाचा एकही कण नसल्यामुळे तो गलितगात्र झाला. त्याच अवस्थेत त्याने जेथे बैठक मारली, तिथेच तो समाधी अवस्थेचा आनंद अनुभवू लागला. पूर्वी भूकेमुळे मनात मरणाचे विचार येत होते. पण आता लागलेल्या भावसमाधीमुळे त्याची तहान-भूक हरपली. त्याला एका अवर्णनीय व अलौकिक आनंदाचा सुखकारक अनुभव जाणवू लागला. समाधीतून बाहेर पडल्यावर त्याला वास्तवाची जाणीव झाली. काशीनाथ धडपडत खाली आला. त्याची विमनस्क अवस्था पाहून दोेन गवळणींनी त्याला दूध व नाचणीची भाकरी दिली. त्याची भेदाभेदाची जाणीव नष्ट होऊन विशाल मानवतेची भावना निर्माण झाली. गवळणींनी दिलेल्या अन्नामुळे त्याला थोडी तरतरी व हुशारी आली. या गवळी लोकांचा काही दिवस पाहुणचार घेतल्यानंतर काशीनाथला आपल्या घरची आठवण झाली. तो सटाण्यास निघाला.

     काशीनाथ घरी परतला त्या वेळी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांचे छत्र हरपले होते. आजोबा अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून होते. आता काशीनाथावरच घरची सर्व जबाबदारी येऊन पडली. चरितार्थासाठी काहीतरी कामधंदा करणे आवश्यक होते. तो सांगलीतील वेदशास्त्र पारंगत वैद्यक तज्ज्ञ व्यंकटरमणाचार्य यांच्या सेवेत रुजू झाला. मुळातच हुशार असलेला काशीनाथ आचार्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे आयुर्वेदशास्त्रात प्रवीण झाला. या ज्ञानाद्वारे लोककार्य करावे असा विचार त्याच्या मनात आला. त्याने घरातल्या घरात काढे व अरिष्ट तयार करण्यास सुरुवात केली. श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या प्रोत्साहनाने त्याने ‘भेषज रत्न’ या नावाचे वैद्यकीय माहितीवर आधारित मासिकही सुरू केले.

     काशीनाथामध्ये झालेला हा बदल पाहून घरच्या लोकांना अतिशय आनंद झाला व त्यांनी दुर्गाबाई  नावाच्या मुलीशी त्याचा दुसरा विवाह लावून दिला. काशीनाथांनी धर्मार्थ औषधी देण्याचा व्यवसाय सुरू केला. पत्नी दुर्गाबाईंच्या मदतीने माफक आहार व काटकसर यांचा मेळ साधून दहा वर्षे संसार केला. लोकांना माफक दरात सेवा-शुश्रूषा पुरविली. सर्व काही व्यवस्थित चालले असतानाही काशीनाथ यांचा जीव कुठेतरी तळमळत राही. काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव त्यांच्या मनाला बोचत होती. त्यातच निष्कारण एका खटल्यात काशीनाथ यांना गोवण्यात आले. विनाकारण मानहानी झाली. कारावास भोगावा लागला. कष्टाने उभारलेला व्यवसाय कोलमडला. पत्नीच्या सल्ल्याने गाव सोडून काशीनाथ हे उभयता ओंकारेश्वरास आले.

     ओंकारेश्वर येथील शंकराच्या देवळात एकदा काशीनाथ यांना अचानक समाधी लागली. त्या निर्जन स्थळी पतीची ही अवस्था पाहून दुर्गाबाई घाबरल्या. लौकिक उपायांनी काशीनाथ यांची समाधी भंग पावली. तरीपण त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे राहुरीस जाऊन काशीनाथ यांनी तेथील योग शिक्षक श्री.कुलकर्णी यांचा सल्ला घेतला. श्री. कुलकर्णी यांनी काशिनाथ उपासनी यांना शिर्डीच्या साईबाबांकडे जाण्याचा सल्ला दिला.

     काशीनाथ व दुर्गाबाई शिर्डीला आले. साईबाबांच्या एका दृष्टिक्षेपातच काशीनाथांची व्याधी दूर झाली. साईबाबांनी त्यांना शिर्डीतच ठेवून घेतले. पुढील चार वर्षांत त्यांची अपुरी साधना पूर्ण करून घेतली. काशीनाथ यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्याच सुमारास दुर्गाबाईंचे निधन झाले. काशीनाथ संसाराच्या बंधनातून मुक्त झाले. साईंसारखा सद्गुरू लाभताच त्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शनामुळे काशीनाथांनी साधनेमध्ये कमालीची प्रगती केली. ते साईंच्या सूचनेनुसार खंडोबाच्या देवळात राहू लागले; परंतु काशीनाथ यांची महती न कळलेल्या लोकांनी त्यांना खूपच त्रास दिला.

    एक तरटे अंगाला गुंडाळून काशीनाथ देवळात राहत. साईंनी त्यांना सुगंधित करून सोडले. आपले स्वत्व त्यांच्यात ओतले. एकदा तर द्वारकामाईच्या दरबारात साई म्हणाले, ‘‘अरे, त्याच्यासारखा आहेच कोण? सगळे एकीकडे व तो एकीकडे! तो माझा आहे. मी त्याला सुवर्णपट दिला आहे!’’ या शब्दांत त्यांनी काशीनाथांचा गौरव केला. साईंच्याच सल्ल्यानुसार काशीनाथांनी शिर्डीपासून सात किलोमीटर अंतरावरील साकुरी या गावी मुक्काम हलवला. या ठिकाणी अंगावर तरटे गुंडाळलेल्या काशीनाथाला लोक ‘उपासनीबाबा’ म्हणू लागले. उपासनीबाबांनी स्त्रीतत्त्वाचा परमार्थ प्रचारासाठी उपयोग करून घेण्याचे ठरविले. त्यांनी ‘कन्याकुमारी संघा’ची स्थापना केली.

     स्त्रियांनी वेदविद्या ग्रहण करावी, यज्ञकार्य करावे अशी मते मांडून त्यांनी २४ सुशिक्षित, घरंदाज मुलींना कन्याकुमारी व्रताची दीक्षा दिली. या सर्व मुलींना वेद, उपनिषदे, यज्ञविधींचे व इतर धार्मिक विधींचे रीतसर शिक्षण दिले. उपासनी बाबांच्या या बंडखोर वृत्तीचा धर्ममार्तंडांनी व तथाकथित समाजसुधारकांनी कडाडून विरोध केला. त्यांचा निषेध केला. उपासनी बाबांची निंदानालस्ती केली. त्यांच्यावर प्रखर टीकेची झोड उठविली. पण उपासनीबाबांनी त्यांना दाद दिली नाही. उलट, आपले कार्य जोमाने सुरूच ठेवले. वेदमूर्ती सातवळेकर व महात्मा गांधीजींनी उपासनी बाबांच्या या क्रांतिकारक कार्याचे कौतुक केले. ‘श्री उपासनी वाक्सुधा’ या त्यांच्या ग्रंथात त्यांच्या शिकवणीचा प्रत्यय येतो.

     साकुरी येथील मठाची व ‘कन्याकुमारी’ या संघाची जबाबदारी ‘श्री गोदावरीमाता’ या शिष्येच्या सुपूर्द करून साईबाबांच्या या थोर शिष्याने २४ डिसेंबर १९४१ रोजी महासमाधी घेतली.

प्रा. नीलकंठ पालेकर

उपासनी, काशीनाथ गोविंदशास्त्री