वाडेगावकर, विश्वनाथ नारायण
उद्यममहर्षी विश्वनाथ नारायण वाडेगावकर यांचा जन्म जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील रावबहादूर नारायण दाजिबा वाडेगावकर हे मध्य प्रांतातील अॅडिशनल ज्युडिशियल कमिशनर होते.
त्यांचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूल, नागपूर येथे झाले. वकिलांचा मुलगा वकील व डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होण्याच्या त्या काळात वाडेगावकरांनी कायदा किंवा संस्कृत हे विषय न घेता, इंडस्ट्रियल केमिस्ट्री हा विषय घेऊन बनारस हिंदू विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी १९२८ साली मिळवली.
महादेव कृष्णा पाध्ये ह्यांनी ‘उद्यम’ मासिक १९१९ साली सुरू केले होते. १९३० साली वाडेगावकरांनी ‘उद्यम’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. योग्य वेळी पाध्यांनी सर्व कारभार त्यांच्यावर सोपविला.
१९३२ साली ‘उद्यम कमर्शियल प्रेस’ची सुरुवात झाली. १९४६ साली ‘उद्यम’ची हिंदी आवृत्ती निघू लागली. संपादक म्हणून वाडेगावकर फार शिस्तीचे व ध्येयवादी होते. जे तंत्रशुद्ध, शास्त्रसंमत, उपयुक्त आणि मार्गदर्शक असेल, तेच ‘उद्यम’मध्ये छापले जात असे. तेथे येणारा प्रत्येक मजकूर शुद्ध केला जाई. लेखकांना शुद्धलेखनाच्या नियमांचे पुस्तक धाडणारा हा संपादक. मासिकांचे विशेषांक काढायची मूळ संकल्पना त्यांचीच. जानेवारी १९३२ चा शास्त्रीय विशेषांक, जुलैचा नागपूर विशेषांक, जानेवारी १९३३ चा दानशूर डी. लक्ष्मीनारायण विशेषांक अशा विशेषांकांनी सुरुवात करून नंतर त्यांनी छायाचित्रण, भाजीपाला, गच्चीवरील बाग, घरगुती काटकसर, पर्यटन, छंद, व्यायाम, सुखी जीवन, घरबांधणी, आजाऱ्यांची शुश्रूषा, सौंदर्यप्रसाधने, असे अनेक विशेषांक काढले. त्याशिवाय दिवाळी अंक दरवर्षी निघत असत ते वेगळे. ‘उद्यम’ची धंदेविषयक, शेतीविषयक प्रकाशने ही आणखी एक विशेष बाब. काही पुस्तके इतकी लोकप्रिय, की त्यांच्या आठ ते दहा आवृत्त्या निघाल्या. अशी प्रकाशने काही शेकड्यांच्या घरात आहेत.
ते जसे चुकांबद्दल कोणाची गय करीत नसत, तसेच चांगल्या कामाबद्दल, चांगल्या लेखनाबद्दल प्रशंसेची पावती दिल्याखेरीज राहत नसत. गुळमुळीतपणा त्यांना रुचायचा नाही. अंमलबजावणीत काटेकोरपणाची अपेक्षा असायची; कारण ते स्वत: जे बोलत तेच करत, व जे करत तेच बोलत. त्यांनी रोटरी क्लब, मराठी विज्ञान परिषद, नागपूर शाखा यांचे अध्यक्षपद भूषविले. तसेच, नवसमाज लि., नागपूर, जे ‘नागपूर टाइम्स’ व ‘नागपूर पत्रिका’ प्रकाशित करीत, त्यांचे ते संचालक होते. मराठी विज्ञान परिषदेच्या, १९६६ साली मुंबई येथे भरलेल्या पहिल्याच संमेलनात, ‘उद्यम’ मासिकाचा त्याच्या उत्तम कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला होता. याशिवाय त्यांना बागबगिचा, लिखाण, वाचन व फिरणे यांची अतिशय आवड होती.
अशा या उद्यमशील व्यक्तिमत्त्वाचा शेवटही त्यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी ‘उद्यम’ या त्यांच्या राहत्या घरीच, शांतपणे झाला.