Skip to main content
x

वाडेकर, मुकुंद लालजी

      मुकुंद लालजी वाडेकरांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून संस्कृतमध्ये बी.ए., एम.ए. तसेच पीएच.डी. अशा उपाध्या संपादन केल्या. धर्मशास्त्रे, पुराणे, हस्तलिखित शास्त्र हे त्यांचे विशेष अध्ययनाचे विषय, अध्ययनानंतर काही काळ गोध्रा व बडोदा येथे अध्यापन करून नंतर बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेत ते उपसंचालकपदी कार्यरत आहेत.

     विष्णुपुराणाच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली असतानाचे त्याबरोबरच देवलस्मृतीची पुनर्रचना व चिकित्सक अध्ययनाचे दोन खंडात्मक लेखन, मार्कंडेय पुराणातील दोन खंडांतील अध्ययनात्मक लेखन, लक्ष्मीधराच्या कृत्यकल्पतरु (शान्तिकांड), गायकवाड ओरिएन्टल ग्रंथमालेतील खंड, पीताम्बराचार्यांच्या टीकेसह देवीमाहात्म्य, पंडित जनार्दन पदेशास्त्रींच्या मराठी लेखांचे संकलन, प्राच्यविद्याविषयक स्वलिखित निबंधांचा संग्रह इत्यादी ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. याव्यतिरिक्त बडोद्याच्या प्राच्यविद्यासंस्थेच्या शोधपत्रिकेचे संपादन, स्वाध्याय व वेदव्यासंग या गुजराती त्रैमासिकांचे संपादन या जबाबदार्‍या ते निष्ठेने पार पाडत आहेत.

    त्यांनी अनेक चर्चासत्रे, कार्यशाळा व राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून १००हून अधिक शोधनिबंध इंग्लिश, मराठी, गुजराती, हिंदी व संस्कृत या भाषांमधून प्रसिद्ध झाले आहेत. यांतील काही महत्त्वाचे विषय असे - ब्रह्मसूत्रशांकरभाष्यात आढळणारी स्मृतीतील उदाहरणे, विष्णुपुराणातील रामचरित्र - काही ठळक नोंदी, रामचंद्र पंडितांचे दशोपनिषत्सार, देवलस्मृती व ज्योतिष, वाल्मीकी रामायणाच्या चिकित्सक आवृत्तीची संशोधनप्रणाली, गृह्यसूत्रातील वास्तुविज्ञान, रमालहरी, सौभाग्यलहरी, गणेशलहरी, लावण्यलहरी या दुर्मीळ लहरीवाण्यांचे अध्ययन, शुक्लयजुर्वेद आणि विज्ञान, अथर्ववेद व सूक्ष्मजीवशास्त्र इ.इ. डॉ. वाडेकरांची प्रतिभा प्राच्यविद्येच्या सर्वच प्रांतात चौफेर संचार करताना दिसते. स्वतंत्र अध्ययनात्मक लेखनाव्यतिरिक्त डॉ. वाडेकरांनी अनुवादही केले आहे. जगन्मंगलस्तोत्र योगविंशिका, रावणकृत अर्कप्रकाश यांचा अनुवाद त्यांनी केला आहे. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ चा संस्कृत अनुवाद, दयारामाच्या पाच गुजराती कवनांचा संस्कृत अनुवाद त्यांच्या नावावर आहे.

     विद्यार्थिदशेत प्रत्येक वर्षी परीक्षेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी अनेक पारितोषिके, पदके, शिष्यवृत्त्या मिळवणार्‍या वाडेकरांना ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांनी डॉ. जयश्री गुणे राष्ट्रीय संशोधन पुरस्काराने त्यांच्या संस्कृत प्राच्यविद्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी सन्मानित केले. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांचे आजीव सदस्य, विश्वस्त व सल्लागार म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात गायकवाड ओरिएंटल सीरीजने अनेक गुजराती तसेच इंग्लिश पुस्तके (काही हस्तलिखिते, सूचिग्रंथ, व्याख्यानमाला) प्रकाशित केली.

डॉ. गौरी माहुलीकर

वाडेकर, मुकुंद लालजी