वाडेकर, रंगनाथ दत्तात्रेय
रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म सिद्धेश्वर कुरोली (जि. सातारा) येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अहमदनगर येथे व महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात झाले. सन १९२१मध्ये त्यांनी (संस्कृत व इंग्लिश या विषयांत) बी.ए. ही मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवली. नंतर पाली या भाषेचा अभ्यास स्वत:च करायचा असे ठरवून त्यांनी संस्कृत व पाली हे दोन विषय घेऊन १९२६मध्ये एम.ए.ही पदवी मिळवली. १९२७ ते १९३६ या काळात त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संस्कृतचे व पालीचे प्राध्यापक म्हणून काम केले. प्रा. एस. के. बेलवलकरांचे संशोधनातील मदतनीस म्हणूनही त्यांनी काम केले. सन १९३६मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत-प्राकृत भाषांचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले व सन १९६१साली निवृत्त होईपर्यंत तिथे अध्यापनाचे काम केले. नव्याने स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठातही त्यांनी १९४८-१९६१ या काळात संस्कृत-पाली-प्राकृत विषय शिकविले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यादेवी हायस्कूल येथेही त्यांनी शिक्षकाचे काम केले. त्यांनी स्वत: पीएच.डी. पदवी मिळवली नाही परंतु पीएच.डी.च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी खूप मदत केली. मेधा व प्रज्ञा हे बुद्धीचे दोन्ही गुण त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने असल्याने ते एक चालता-बोलता ज्ञानकोशच होते. संस्कृत आणि प्राकृत विषयात पुढे संशोधन करण्यासाठी जर्मन आणि फ्रेंच भाषांचे ज्ञान आवश्यक असते असे त्यांचे गुरू पी. डी. गुणे यांनी सांगितल्यावरून त्यांनी या दोन भाषा आत्मसात केल्या. डी. व्ही. आपटे या इतिहास संशोधकांना शिवाजीवरील पोर्तुगीज पत्रे वाचण्यासाठी डच भाषेचा जाणकार हवा होता. वाडेकर त्यांच्यासाठी डच भाषाही शिकले. त्या काळात डच भाषा जाणणारे ते एकमेव भारतीय होते. भाषा-अध्ययनाची विशेष आवड आणि कुशलता त्यांच्या ठिकाणी होती. ग्रीक-लॅटिनपासून मॉडर्न रशियनपर्यंत चौदा भाषा त्यांना अवगत होत्या.
फ्रेंच, जर्मन, अर्धमागधी, पाली या भाषांचा परिचय करून देणारी प्राथमिक पुस्तके वाडेकरांनी तयार केली. तसेच अनेक पाली ग्रंथांच्या संपादित आवृत्त्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. मिलिन्द (१९४०), पातिमोक्ख (१९४१), तेलकटाहगाथा (१९४१), धम्मसंगणि (१९४०) आणि डॉ. पी. व्ही. बापट यांच्याबरोबर अठ्ठसालिनी (१९४२) हे पाली ग्रंथ आणि उत्तराध्ययनसूत्र हा जैन अर्धमागधी ग्रंथ (१९५९) असे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. पाली तिपिटक देवनागरी लिपीमध्ये छापण्याचाही एक प्रकल्प १९३०पासूनच त्यांच्या मनात होता, पण तो त्या काळी प्रत्यक्षात येऊ शकला नाही. वैदिक संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेला (Eighteen Principal Upanishads) हा ग्रंथ वाडेकरांनी आचार्य वि. प्र. लिमये यांच्या जोडीने संपादित केला. या उपनिषदांवर त्यांनी लिहिलेल्या टिपा, तळटिपा त्यांच्या सूक्ष्म व सखोल ज्ञानाची साक्ष देतात. बौद्ध, जैन तसेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या तौलानिक विचारांनी लिहिलेल्या या टिपा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
वाडेकर हे वैदिक संशोधन मंडळाचे संस्थापक सदस्य होते. भारतीय धर्मतत्त्वज्ञान संशोधन मंडळाचेही ते सदस्य होते. तसेच मराठी तत्त्वज्ञान कोषाशीही ते संबंधित होते. तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम योग केंद्रात योगविषयक ज्ञानकोशाचे संशोधक निदेशक म्हणूनही (१९६१-१९६६) त्यांनी काम केले.
वाडेकर मूलत: शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर त्यांचे नि:स्सीम व नि:स्वार्थी प्रेम होते. त्यांना सर्वतोपरी मदत करायला ते तयार असत. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी ट्युटोरिअल डिपार्टमेंट नावाचा एक अत्याधुनिक, असाधारण असा या प्रकारचा या देशातला पहिला विभाग सुरू केला. त्यातून कोणत्याही विषयाच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक सामग्री, उपलब्ध करून दिली जाई. सुट्टीच्या काळात ते वेगवेगळ्या भाषा विषयांचे वर्ग घेत. हे सर्व अत्यंत निरपेक्षपणे ते करत. त्यांनी विद्यार्थ्यांकडून किंवा कोणाकडूनच कशाचीही अपेक्षा केली नाही.
आध्यात्मिक साधना हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य ध्येय होते वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षाच्या सुमारास त्यांना स्वप्नात साक्षात्कार होऊन आध्यात्मिक साधनेची दीक्षा मिळाली. मग १९३०-१९३६ या काळात ते रोज संध्याकाळी साधनेसाठी भाजे येथील लेण्यामधील गुहेत जात. वाडेकरांचे मनन, चिंतन सतत चालू असे. योगी अरविंदांच्या ग्रंथांचे त्यांनी चांगले परिशीलन केले होते व त्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भगवद्गीता, जैन ग्रंथ, बायबल व कुराण यांचाही अभ्यास त्यांनी केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील नित्शे, कांट, हेगेल आणि विशेषत: विटगेनस्टाइनच्या सिद्धान्ताचा त्यांना चांगला परिचय होता. त्यांची मते त्यांनी तावून-सुलाखून स्वीकारली होती. तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाप्रमाणेच वैज्ञानिक साहित्यही त्यांना वाचायला आवडे. स्वयंपाकापासून मोटार दुरुस्तीपर्यंत सर्व कामे त्यांना येत होती व ती कामे स्वत:च करण्याबद्दल त्यांचा आग्रह असे. भाषा, भाषाशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, तत्त्वज्ञान, इंजिनिअरिंग, टेलीकम्युनिकेशन अशा अनेक विषयांमध्ये त्यांना गती होती. त्यामुळे ते सतत कार्यमग्न असत. त्यांच्याबद्दल फर्गसनमधील प्राध्यापक म्हणाले,"If you allow him to work at his fullest capacity ,half of your staff will have to be dismantled "
अशा कर्मयोगी, छात्रप्रिय, नि:स्पृह वाडेकरांना लौकिक मानसन्मान फारसे मिळाले नाहीत. १९८१मध्ये ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ म्हणून त्यांना गौरवले गेले.