Skip to main content
x

वाघ, विठ्ठल भिकाजी

विठ्ठल भिकाजी वाघ यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील तल्हेरा तालुक्या-तील हिंगणी या मूळ गावी मोठ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विदर्भातच झाले. त्यांना वैद्यकीय डॉक्टर व्हावयाचे होते; पण मोठ्या कुटुंबामुळे ते शक्य न झाल्याने ते मानव्यविभागाकडे (आर्ट्स फॅकल्टी) वळले आणि १९६९ साली मध्य प्रदेशातील इंदूर विद्यापीठाची एम.ए.ची पदवी त्यांनी संपादन केली. त्यांचा विषय मराठी हा होता. त्याच वर्षी ते अकोला येथील श्री. शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

तेथील अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी १९९७ साली सूत्रे स्वीकारली. या पदावरून ते २००५ साली निवृत्त झाले. दरम्यान, त्यांनी अमरावती विद्यापीठातून ‘पारंपरिक वर्‍हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर १९८२ साली वाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली. हा प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे.

त्यांचे लहानपण सातपुडा पर्वतरांगांमध्ये, निसर्गाच्या कुशीत गेल्याने त्यांना निसर्गाची, त्यांच्या विविध विभ्रमांची, काळ्या मातीची आवड असल्याने त्यांची कवी म्हणून ओळख ‘ग्रामीण संस्कृतीतील वैदर्भीय निसर्ग कवी’ अशीच झाली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीत व कविता रचना केल्या असून त्यांतील बव्हंशी गेय आहेत आणि ते स्वतः खड्या आवाजात उत्तम रितीने सादर करतात. ख्यातनाम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांची काव्यप्रेरणा बहिणाबाई चौधरी या आहेत.

विठ्ठल वाघ यांनी पंचेचाळिसावे विदर्भ साहित्य संघ संमेलन, कारंजा (१९९२), दहावे वर्‍हाडी साहित्य संमेलन इत्यादी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले असून ‘म्हणी आणि लोकधर्म’ हे त्यांनी संकल्पित व संपादित केलेले म्हणींचे पुस्तक लोकवाङ्मयात महत्त्वाचे मानले जाते.

वाघ यांची ‘काया मातीत मातीत, तिफण चालते, तिफण चालते’ ही कविता सर्वदूर लोकप्रिय असून  मातीशी माणसाचे असलेले सनातन नाते त्यातून नेमकेपणाने व्यक्त होते. वाघ यांची समग्र कविता ‘काया मातीत, मातीत’ याच शीर्षकाने संस्कृती प्रकाशन, पुणे यांच्यामार्फत याच वर्षी (२००९) प्रकाशित होत असून तिचे संपादन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

डॉ. वाघ यांनी अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सिनेटचे सदस्य व अन्य अनेक शैक्षणिक समित्यांवर काम केले आहे.

- मधू नेने

वाघ, विठ्ठल भिकाजी