वैद्य, शंकर विनायक
शंकर वैद्य यांचा जन्म ओतूर (जि. पुणे) येथे झाला. ओतूरला निसर्गसान्निध्यात बालपण घालवलेले आणि प्राथमिक शिक्षण घेतलेले शंकर वैद्य वयाच्या तेराव्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी जुन्नरला गेले. शिवाजी आणि तानाजी यांच्या ऐतिहासिक खाणाखुणा असलेल्या परिसरात त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. कवी वा. ज्यो. देशपांडे हे त्यांचे शिक्षक होते. शंकर वैद्य यांना काव्यलेखनासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले. नंतरच्या काळात आपल्या ह्याच गुरूच्या ‘स्वस्तिका’ ह्या काव्यसंग्रहाचे संपादन करून त्यांनी त्याला प्रस्तावनाही लिहिली. शाळेत असताना संभाजी व औरंगजेब यांच्या संवादात्मक कवितेने त्यांना ‘कवी शंकर वैद्य’ ही ओळख दिली. शालेय वयात भर्तृहरी, वामन पंडित, रघुनाथ पंडित अशा जुन्या कवींच्या कवितांचे वाचन झाल्यामुळे विविध विषयांवर विविध वृत्तांमध्ये रचना करण्याचा छंद त्यांना जडला.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९४६साली पुण्यात आल्यावर शिकत असतानाच पूर्णवेळ नोकरी, काव्यलेखन, मनन हेही चालू होते. कवी यशवंत, बोरकर, मनमोहन, कुसुमाग्रज ह्यांच्या कविता त्यांनी जुन्नरला असताना वाचल्या होत्या, ते आता प्रत्यक्ष भेटल्यामुळे स्वतःच्या कवितेचे कठोर परीक्षण करण्याची दृष्टी वैद्य यांना लाभली. महाविद्यालयात चार काव्यस्पर्धांमध्ये कवितांना पारितोषिके मिळाली. बी.ए. व एम.ए. च्या परीक्षांमध्ये मराठी विभागात प्रथम आल्याबद्दल पुणे विद्यापीठाच्या पारितोषिकांचे ते मानकरी ठरले.
शंकर वैद्य यांनी एलफिन्स्टन महाविद्यालय, मुंबई (१९५३-१९६०), विदर्भ महाविद्यालय, अमरावती (१९६०-१९६३) आणि इस्माईल युसुफ महाविद्यालय, मुंबई (१९६३-१९८६) येथे मराठी विषयाचे अध्यापन केले.
शंकर वैद्य यांनी स्वा. सावरकर, केशवसुत, इंदिरा संत, बालकवी, गोविंदाग्रज, भा.रा. तांबे, मर्ढेकर, मनमोहन यांच्या काव्याचे परीक्षण, रसग्रहण आणि समीक्षालेखन ‘सत्यकथा’ इत्यादी मासिकांतून केले. कुसुमाग्रजांच्या ‘रसयात्रा’, ‘प्रवासी पक्षी’ आणि ‘इस मिट्टी से’ (कुसुमाग्रजांच्या मराठी कवितांचे हिंदी रूपांतर: डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर) या तीन संग्रहांचे संपादन प्रस्तावनालेखनासह केले. ज्ञानदेव व तुकाराम यांच्या काव्यावरही वैद्य यांनी लेखन केले.
‘कालस्वर’ आणि ‘दर्शन’ हे त्यांचे काव्यसंग्रह असून ‘मैफल’, ‘सांध्यगुच्छ’, ‘पक्ष्यांच्या आठवणी’ असे कवितांचे गुच्छ प्रसिद्ध झालेले आहेत. छंदांवर विलक्षण हुकूमत असल्याने कवितेच्या विषयानुरूप रचनाबंध त्यांच्या कवितेत दिसतात. प्रीतीची ओढ व प्रेयसीविषयी वाटणारे गाढ आकर्षण ते संयत भाषेत व्यक्त करतात.
कल्पना चमत्कृतीबरोबर तत्त्वचिंतनात गुंतलेली त्यांची कविता गेय आहे. काव्यवाचन नाट्यमय पद्धतीने करणारे शंकर वैद्य हे रसिकांचे आवडते कवी आहेत.