Skip to main content
x

वाईकर, यमुनाबाई

बैठकीची लावणी’ या महाराष्ट्रातील खास गानप्रकाराच्या श्रेष्ठतम कलाकार असणार्‍या यमुनाबाई वाईकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळच्या नुने-कळमे या गावी झाला. महाबळेश्वर येथे उगम पावणार्‍या कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांपैकी ‘वेण्णा’ हे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले, मात्र धाकटा भाऊ ‘यमुना’ म्हणू लागल्याने तेच नाव रूढ झाले. कृष्णा नदीच्या वाई येथे त्यांचे वडिलोपार्जित घर होते. गाणे-वाजवणे, डोंबारी खेळ करण्याची परंपरा त्यांच्या कोल्हाटी समाजात होती व आई-वडील, भाऊ, पारूबाई, ताराबाई, हिराबाई, ममताबाई व यमुनाबाई या पाच मुली असे हे कुटुंब गरिबीत आपली कला जपत होते.

आई गीताबाई या तुणतुण्यावर गाणी म्हणत, तसेच गोंदणे-टोचणे अशाद्वारे गुजराण करत. आईमुळे घरात लावणी गाणे हे होतेच, शिवाय वडील विक्रमराव जावळे व भाऊ दत्तोबा डोंबारी खेळ करत असल्याने यमुनाबाईही लहानपणी केसाने दगड उचलणे, कोलांट्या मारणे इ. कसरतीचे खेळ करत.

आईची लावणी आणि वडिलांची ढोलकी, तबला ऐकून त्याबरोबर त्याही अगदी बालवयापासून गाऊ-नाचू लागल्या, तमाशाच्या फडाबरोबर गावोगावी जाऊ लागल्या. बेबी-शेवंता बार्शीकर, लैला-चांगुणा जेजुरीकर, लीला-कला येवलेकर, रामप्यारी पुणेकर अशा त्या काळातील उत्तम लावणी गाणार्‍या कलावतींच्या लावणी गायनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला.

उ.अब्दुल वहीद खाँ यांच्याकडे शिकलेली शेवंती नावाची गायिका त्या काळात पक्की, रागदारीवर आधारित लावणी गात असे, त्याचाही प्रभाव यमुनाबाईंवर पडला. बैठकीच्या लावणीचा पारंपरिक अंदाज, गायनाची रीत, लावणीवर अदा करणे, भाव दाखवणे हे सर्व त्यांना प्रसिद्ध लावणी गायिका गोदावरीबाई पुणेकर यांनी शिकवले. मुंबईला तमाशा पार्टीतील पेटीवादक फकीर मुहंमद, द्वारकाबाई सातारकर या मैत्रिणीकडे त्या ठुमरी, कव्वाली, गझल शिकल्या. बडे गुलाम अलींची शागिर्दी करणार्‍या अख्तरभाई कोल्हापूरकर यांच्याकडे त्या काही काळ ख्याल, तराणाही शिकल्या.

यमुनाबाई १०-१२ वर्षांच्या असताना तेव्हाच्या गाजलेल्या ‘रंगू-गंगू सातारकर आणि पार्टी’मध्ये होत्या. पुढे त्यांनी नृत्यापेक्षा लावणी गायनावरच भर दिला. तमाशात त्यांच्या बहिणी नाचत, तर त्या व त्यांच्या आत्या वडिलांची ढोलकी, चुलत भावाची पेटी यांच्या साथीने गात असत. मुंबईत नायगाव व भुलेश्वर येथे तमाशाच्या ‘झडती’ होत असत, तेथे त्या लावणी सादर करत. ‘पिला हाउस थिएटर’मध्येही १९४२ साली त्यांचा कार्यक्रम झाला. त्यांनी १९४३ साली ‘यमुना-हीरा-तारा तमाशा’ ही स्वत:ची बारी सुरू केली व मुंबई गाजवली. वाईमध्ये त्यांनी अल्पकाळ ‘मानापमान’, ‘भावबंधन’ या संगीतनाटकांत भूमिका व गायन केले. त्या काळात त्यांच्यावर बालगंधर्वांच्या नाट्यसंगीताचा प्रभाव होता.

शारीर-सौंदर्यातील आवाहकतेपेक्षा आपले नजाकतदार गायन, प्रभावी अदाकारी यांद्वारे यमुनाबाई लावणीची बैठक यशस्वी करत. उंच आणि बुलंद सूर, भावदर्शक उच्चारण, अदाकारीतील नखरा, मुरका, तोरा यांमुळे त्यांची प्रस्तुती अत्यंत सरस होत असे. लावणीतील एखादी ओळ वारंवार आळवत आवाजाचा पोत व गरिमा बदलून, सूचक मुद्राभिनयाने नाना भावच्छटा उलगडत त्या लावणी ‘खेळवत’. चौकाची लावणी ही त्यांची खासियत होती व बालेघाटी, छक्कड, सवाल-जवाब इ. लावणीचे प्रकारही त्या रंगवून गात. ऐंशीव्या वर्षीही त्यांनी पतंगाच्या लावणीवर त्यांची केलेली अदा षोडशेला लाजवेल अशी असे.

‘नेसले पितांबरी जरी’, ‘पंचकल्याणी घोडा अबलख’, ‘तुम्ही माझे सावकार’, ‘शुद्ध श्रावणमासी’, ‘सोडा मनगट’, ‘पाहुनिया चंद्रवदन’, ‘सांभाळा झोक’, ‘अहो भाऊजी मी कोरा माल’ इ. लावण्या त्यांनी गाजवल्या. चित्रपटगीतांच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही यमुनाबाईंनी नेटाने पारंपरिक लावणी गायनाचा ढंग कसोशीने मांडला व जपला. पं. बिरजूमहाराज यांच्यासारख्या कथक नृत्यसम्राटानेही यमुनाबाईंच्या अदाकारीला सलाम केला एवढेच नव्हे, यमुनाबाईंचे ठुमरी गायन आणि त्यावर बिरजूमहाराजांची अदाकारी असाही कार्यक्रम रंगतदार झाला होता.

डॉ.अशोक दा.रानडे यांनी त्यांची विस्तृत मुलाखत ‘ग्रंथाली’साठी घेतली होती व डॉ.रानडे यांच्या ‘बैठकीची लावणी’ या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. यमुनाबाईंच्या लावणीगायनाचे ध्वनिमुद्रणही त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ध्वनिसंग्रहालयासाठी केले होते.

अत्यंत साध्यासुध्या स्वभावाच्या व राहणीच्या यमुनाबाई वयाच्या ८०-८५ पर्यंत उत्तम गान-अदाकारी करत होत्या. त्यांच्या भाच्या, पुतण्या यांखेरीज अनेकांना त्यांनी बैठकीची लावणी आणि अदाकारी शिकवली आहे, शासकीय कार्यशाळांतूनही अनेकांना मार्गदर्शन केले आहे. यमुनाबाईंकडून मार्गदर्शन घेऊन काही विदेशी संशोधकांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये लावणीविषयक प्रबंध सादर केला आहे.

भटक्या डोंबारी कोल्हाटी समाजासाठी वाईत पक्की घरे उभारण्यात पुढाकार घेणे, लाखानगरमध्ये विठ्ठल मंदिर बांधणे, अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे अशी सामाजिक बांधीलकीची कामेही यमुनाबाईंनी केली. 

राज्य सरकारचा ‘लावणी सम्राज्ञी’ पुरस्कार, ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक मराठी परिषदेचा सन्मान, सांगली नगर परिषद सन्मान, ‘निळू फुले’ सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा ‘अहिल्यादेवी होळकर’ सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी रत्न’ पुरस्कार (१९९४), संगीत नाटक अकादमीचा ‘टागोर सन्मान व भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ (दोन्ही २०१२) असे पुरस्कार देऊन यमुनाबाईंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

चैतन्य कुंटे

वाईकर, यमुनाबाई