वाकणकर, सिद्धार्थ यशवंत
सिद्धार्थ वाकणकर यांनी १९६७ साली, मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात बी.ए. व १९६९साली एम.ए.पदव्या प्राप्त करून बडोद्यातून पीएच.डी. उपाधी संपादन केली. ते संस्कृत, अर्धमागधी, प्राचीन इतिहास, संस्कृती, भाषाशास्त्र या विषयांचे अभ्यासक आहेत. हस्तलिखितशास्त्र व प्राचीन संस्कृत साहित्य यांमधून व पोथ्यांमधून आढळणारे क्रीडाप्रकार, संस्कृतमधील विज्ञान व तंत्रज्ञान हे त्यांचे विशेष अभ्यासाचे व संशोधनाचे विषय होत. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधील विद्वानांचे संस्कृतला योगदान, संस्कृत साहित्यातील कलहकाव्य या विषयांवरील दुर्मीळ काव्यप्रकाराचा अभ्यास, चतुरंग, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते अशा खेळांवरील संस्कृत पुस्तके व पोथ्या यांविषयीचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले.
चेतोविनोदनकाव्य, आनंदकाव्य, यादवेंद्रमहोदय या ग्रंथांचे चिकित्सक संपादक. संस्कृत साहित्यातील साहित्यरत्ने, गजशास्त्र, शतप्रश्नोत्तरी, डॉ. वा. म. कुलकर्णी यांचा अभिनंदनग्रंथ इत्यादी ग्रंथांचे लेखन व संपादन त्यांनी बडोद्याच्या प्राच्यविद्यासंस्थेतून निवृत्त होण्यापूर्वी पूर्ण केले. तर्कसंग्रह-कौतुक, वनमालीकीर्तिच्छन्दोमाला (सटीक), आहारशास्त्रावरील दुर्मीळ ग्रंथ भोजनकुतूहल, गोपाळविवेक, गुणमन्दारमञ्जिरी, शंकरमन्दारसौरभचम्पू, कल्याणमल्लाचा अनंगरंग व त्यावरील अनंगरंगप्रकाशिका ही टीका, शालिहोत्राचे अश्वशास्त्र त्यावरील टीका व इंग्रजी भाषांतर या ग्रंथांचे लेखन तसेच प्रा. रं. रा. देशपांडे यांच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध होणार्या ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेे.
वाकणकरांचे इंग्लिश, मराठी, गुजराती व संस्कृत या भाषांमधील १००हून अधिक शोधनिबंध नामांकित नियतकालिकांमधून, वृत्तपत्रांतून तसेच संशोधन पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदांमध्ये तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करणे, तरुण अभ्यासकांना प्रोत्साहन देणे, सत्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतानाही आपल्या विद्वत्तेचे ओझे न बाळगणे या त्यांच्या सहृदयतेमुळे डॉ. वाकणकरांचे व्यक्तिमत्त्व असाधारण वाटते.
त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधनामुळे डॉ. वाकणकर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे : श्रीधर रामकृष्ण भांडारकर पारितोषिक (१९६९), कॅनेडिअन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दिलेला रामकृष्ण संस्कृत पुरस्कार (२००१), वेद भारती हैदराबादने दिलेला राष्ट्रकवी
पं. ओगेटि अच्युतराम शास्त्री संस्कृत पुरस्कार (२००६), तसेच स्प्रिंजर रिसर्च स्कॉलरशिप, मुंबई विद्यापीठ (२००७-२००९) महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार (२०१५) इत्यादी. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात ‘प्राचीन क्रीडाप्रकार तसेच हस्तलिखितशास्त्र’ या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी त्यांना विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, प्राच्यविद्यासंशोधन संस्था यांच्याकडून सादर निमंत्रित केले जाते.