वाकणकर, विष्णू श्रीधर
विष्णू श्रीधर वाकणकर यांचा जन्म मध्यप्रदेशातल्या नीमच या गावात झाला. शाळेत असल्यापासूनच वाकणकरांना कलेविषयी व विशेषत: चित्रकलेबद्दल ओढ वाटत असे. शाळेत असतानाच त्यांनी निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे काढायला सुरुवात केली होती. त्यांना बाहेर फिरून चित्रे काढायला व प्रवास करायला अतिशय आवडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आदिवासींमध्ये समाजकार्य व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वाकणकर घनदाट जंगल असणार्या भागात आले व तेथे त्यांची नजर प्राचीन चित्रांवर पडली व या चित्रांचा अभ्यास हे त्यांचे जीवनकार्यच बनले.
जवळपास पन्नास वर्षे जंगलात सतत पायपीट करून वाकणकरांनी हजारो शैलचित्रे शोधून काढली. त्यांची वैज्ञानिक पद्धतीने नोंदणी करून फोटो काढले आणि उत्तम रेखाटने केली. त्यांनी ठिकठिकाणी शैलचित्रांची प्रदर्शने केली, तसेच देशभर व परदेशांमध्ये अनेक व्याख्याने दिली. संशोधकांसाठी व सामान्य माणसांसाठीही त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांनी व एक अमेरिकन विद्वान आर.आर. ब्रूक्स यांनी मिळून १९७६ मध्ये ‘शैलचित्रे’ या विषयावरचे भारतातले पहिले पुस्तक प्रकाशित केले.
वाकणकरांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथून ‘फाइन आटर्स’ या विषयात डिप्लोमा मिळवला. शैलचित्रे या विषयात झोकून दिल्यानंतर त्यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. प्रा. ह.धी. सांकलिया यांचे मार्गदर्शन घेऊन वाकणकरांनी पुणे विद्यापीठातून १९७३ मध्ये पीएच.डी. संपादन केली. त्यांचा प्रबंध ‘भारतातील प्रागैतिहासिक शैलचित्रे’ असा होता. वाकणकरांच्या संशोधनामुळे ‘भारतीय शैलचित्रे’ या विषयाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यांच्या अविरत परिश्रमांमुळेच ‘शैलचित्र’ या विषयाला पुरातत्त्वविद्येत मानाचे स्थान मिळाले. वाकणकरांना १९६२ मध्ये विश्वविख्यात फ्रेंच पुरातत्त्वज्ञ आन्द्रे लेरॉ-गुर्रन यांच्याकडे ‘पुरातत्त्व व शैलचित्रे’ या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळाली. वाकणकरांनी १९८६ मध्ये साउदॅम्प्टनला झालेल्या वर्ल्ड आर्कियोलॉजिकल काँग्रेसमध्ये भाग घेतला. तेथे भारतीय शैलचित्रांवरच्या त्यांच्या शोधनिबंधाचे खूपच कौतुक झाले होते.
वाकणकरांच्या या कामापासून प्रेरणा घेऊन आज अनेक भारतीय व विदेशी विद्वान प्रागैतिहासिक शैलचित्रांवर संशोधन करत आहेत. वाकणकरांमुळे प्रेरित झालेल्या या संशोधकांनी ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था दरवर्षी आपले अधिवेशन भरवते आणि ‘पुराकला’ नावाचे नियतकालिक काढते. एकेकाळी दुर्लक्षित झालेला शैलचित्रे हा विषय आता भारतात चांगलाच लोकप्रिय झालेला दिसतो. अर्थातच, त्याचे सारे श्रेय डॉ. वाकणकरांना आहे. शैलचित्रांच्या संशोधन क्षेत्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
प्रा. ह.धी. सांकलियांनी १९६१ मध्ये मध्यप्रदेशातल्या महेश्वर व नावडाटोली या नर्मदा नदीच्या तीरांवरील पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन करण्याची मोहीम हाती घेतली. वाकणकरांनी प्रा. सांकलियांकडून उत्खननात सहभागी होण्याची परवानगी मिळवली व तेथे त्यांच्याकडून पुरातत्त्वीय उत्खननाची पद्धत शिकून घेतली. तसेच, नर्मदा नदीच्या आजूबाजूला असणारी प्रागैतिहासिक स्थळे शोधण्याच्या मोहिमेत काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. या मोहिमेत वाकणकरांनी क्वेटर्नरी काळाचे भूशास्त्र, पुराजीवशास्त्र व प्रागैतिहासिक काळाच्या अभ्यासाची प्राथमिक तंत्रे शिकून घेतली. मंदसौर जिल्ह्यामध्ये आवरा व मनोती या ठिकाणी मध्यप्रदेशाच्या पुरातत्त्व व संग्रहालय खात्यातर्फे केलेल्या उत्खननात वाकणकरांचा सहभाग होता.
भीमबेटकाचा शोध वाकणकरांनी १९५७ मध्ये लावला. नंतरच्या काळात त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशात सर्वेक्षण केले. या दरम्यान त्यांनी भौनेरवाली, विनायक, जोन्द्रा, लखाजौर, दिवेतिया, बांसकुवर आणि करीतलाई अशा अनेक टेकड्यांवर १००० पेक्षा जास्त स्थळे शोधून काढली. वाकणकरांनी व त्यांचे गुरुबंधू असलेल्या वीरेंद्रनाथ मिश्र यांनी मिळून, मध्यप्रदेशातल्या रायसेन जिल्ह्यातल्या, भीमबेटका या सुप्रसिद्ध प्रागैतिहासिक स्थळाचे १९७३ ते १९७७ असे पाच वर्षे उत्खनन केले. भीमबेटका गुहांमध्ये त्यांना प्राथमिक निक्षेपांत पुराश्मयुगीन अवजारे मिळाली. या संशोधनामुळे भारतीय उपखंडातील पुराश्मयुगीन पुराव्यांत फार मोलाची भर पडली.
वाकणकरांनी उज्जैन जिल्ह्यातल्या कायथा आणि दंगवाडा या दोन पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले. त्यामुळे इसवीसनपूर्व ३५०० ते इसवीसन ६०० एवढ्या प्रदीर्घ काळातील माळव्याच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडला. कायथ्याचे उत्खनन १९६५-६६ असे दोन वर्षे झाले. या दोन्ही ठिकाणांच्या उत्खननाला विशेष महत्त्व आहे; कारण त्यामुळे माळव्यामध्ये शेती करून स्थिर जीवन सुरू करणार्या लोकांविषयी फार महत्त्वाची माहिती मिळाली. वाकणकरांना फक्त प्रागितिहास, इतिहासाचा संधिकाल किंवा शैलचित्रे यांच्यातच रस होता असे मात्र नाही. नाणकशास्त्र, पुराभिलेखविद्या, संस्कृत साहित्याचा इतिहास अशा प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्वाच्या इतर कितीतरी शाखांमध्ये त्यांना संशोधनाची आवड होती. भारतीय पुरातत्त्वामध्ये वाकणकरांनी केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. वाकणकरांना भारताच्या राष्ट्रपतींनी १९७६ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले.
वाकणकरांच्या निकट असणारे त्यांचे सहकारी त्यांना दादा म्हणून संबोधत. आपल्या देशाचा इतिहास जगासमोर आणायच्या ध्येयाने वाकणकर भारून गेले होते. इतकेच नाही, तर त्यांना युरोपच्या व उत्तर अमेरिकेच्या इतिहासातही प्रचंड रस होता. या दोन्ही ठिकाणी त्यांनी भरपूर प्रवासही केला होता.
स्वच्छ पारदर्शी भूमिका, इतिहास व संस्कृतीविषयीचे जबरदस्त प्रेम यांमुळे त्यांच्या सहवासात येणार्या सर्वांना ते पूर्णपणे आपलेसे करून टाकत. वाकणकर शहरी, ग्रमीण व आदिवासी अशा सर्व लोकांमध्ये कमालीच्या सहजतेने, साधेपणाने वावरत. जंगलात राहणार्या व साधेसुधे जीवन जगणार्या आदिवासी-गिरिजनांविषयी त्यांना मनोमन जिव्हाळा होता, असे त्यांच्या सहकार्यांनी नमूद केले आहे. वाकणकरांच्या व्यक्तिमत्त्वात मुळातच साधेपणा होता. त्यांनी शोधून काढलेल्या स्थळांचे उत्खनन इतरांनी करायला त्यांची अजिबात हरकत नसे. कारण, त्यांना वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा ज्ञानप्रसारात अधिक रस होता. याच भावनेतून भीमबेटका व कायथा या त्यांनी शोधलेल्या दोन महत्त्वाच्या स्थळांच्या उत्खननासाठी वाकणकरांनी प्रा. सांकलियांना बोलवले होते.
वाकणकरांनी पुरातत्त्वाचे ज्ञान मुख्यत: स्वप्रयत्नांमधून मिळवले होते. वाकणकर हे मुळामध्ये एक गवेषक (एक्स्प्लोअरर) होते. हजारो शैलाश्रय, अनेक प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळे शोधून काढणे ही त्यांची भारतीय पुरातत्त्वसंशोधनातील फार मोठी कामगिरी आहे. किंबहुना, जागतिक ताम्रपाषाणयुगीन नकाशात भारताला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रा. सांकलियांच्या बरोबरीने वाकणकरांचे आहे.
त्यांचे प्राचीन इतिहासाचे प्रेम व त्याविषयीचा उत्साह यांवर वाढत्या वयाचा काहीही परिणाम झालेला नव्हता. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी, १९८५ मध्ये त्यांनी लुप्त सरस्वतीच्या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. हिमाचलच्या दुर्गम पहाडांमध्ये, राजस्थानच्या वाळवंटात, गुजरात, पंजाब व हरियाणाच्या मैदानी प्रदेशांत त्यांनी कित्येक महिने, पायी प्रवास केला. घग्गर-हक्रा या आता शुष्क पडलेल्या नदीकाठी असणार्या सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या अवशेषांचा मागोवा घेत असताना त्यांनी प्राचीन सरस्वतीच्या भौगोलिक खाणाखुणांचा शोध घेतला. तसेच, त्यांनी सरस्वतीविषयक लोकसाहित्याचेही संकलन केले. त्यांच्या या शोधमोहिमेला खूप प्रसिद्धी लाभली. वाकणकरांनी त्या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. त्यांनी मिळालेले पुरावे दिल्लीसह अनेक ठिकाणी प्रदर्शित केले.
वाकणकरांच्या मृत्यूनंतर मध्यप्रदेश सरकारने दिल्लीच्या इंडियन आर्कियोलॉजिकल सोसायटीला पंधरा लक्ष रुपयांची देणगी दिली. या संस्थेने वाकणकरांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी, त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय पुरातत्त्व संशोधनात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तीला दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.
२. मिश्रा, व्ही.एन.; ‘विष्णू श्रीधर वाकणकर’ (श्रद्धांजलिपर लेख), ‘मॅन अॅण्ड एन्व्हायर्नमेन्ट १३’, पृष्ठे : १०१-१०२; १९८९.
३. वाकणकर, व्ही.एस.; ‘पेन्टेड रॉक शेक्टर्स ऑफ इंडिया’, पीएच.डी. प्रबंध; डेक्कन महाविद्यालय, पुणे; १९७३.
४. वाकणकर, व्ही.एस.; ‘प्रिहिस्टॉरिक केव्ह पेन्टिंग्स’, ‘मार्ग’ २८(४), पृष्ठे : १७-३४; १९७५.
५. वाकणकर, व्ही.एस.; ‘चॉकोलिथिक कल्चर्स ऑफ मालवा’, ‘प्राच्य प्रतिभा’ ४(२); १९८४.