Skip to main content
x

वालावलकर, सीताराम बुवा

    वालावलकर सीतारामबुवा यांचा जन्म तेरसे बांबडे गावी (सावंतवाडी संस्थान), एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांना एका खासगी शाळेत फार थोडे शिक्षण  मिळाले. त्यांनी गिरणीत, कापड दुकानात, पोलीस खात्यात व इतर अशा नोकऱ्या ८-९ वर्षे केल्या. त्यांचे मन नोकरीत रमत नसे; कारण बालवयापासून मित्रांबरोबर ईश्वरनामाचा गजर करण्याचा त्यांना छंद होता. ते लोकांच्या मदतीला तत्परतेने जात. त्यांनी आपला पगार भिकारी व गरजूंना वाटला. लंगोटी व कफनी परिधान करून ते मुंबईहून कोकणात दाभोळला हजर झाले. दाढी-मिशा वाढलेल्या व अंगाला राख फासलेली. शिवनामाचा गजर करीत, मित्राच्या साहाय्याने ते चिपळूणनजीक कोडमळा इथल्या मारुतीच्या देवळात आले. तिथल्या काही नागरिकांनी त्यांना सावर्डे येथील दत्तमंदिरात श्री. रामचंद्र वहाळकरबुवा यांच्याकडे आणले. या वहाळकरबुवांवर श्री गोपाळबुवा केळकर यांचा अनुग्रह होता. सीतारामबुवा देवळाची झाडलोट करीत, भिक्षा मागत व देवळातच राहत.

गुरूंची आज्ञा मानून सीतारामबुवांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांना तीर्थयात्रेत श्री स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला व अनेक सिद्ध पुरुषांची ओळख झाली. सद्गुरू वहाळकरबुवांचे निर्वाण १९५१ मध्ये झाल्यावर शिष्य सीतारामबुवांनी कश्यपी तीरावर सावर्डे येथे त्यांची समाधी बांधून मठ स्थापना केली.

सीतारामबुवा सहा फूट उंच होते, सुदृढ होते व अफाट शारीरिक कष्टही करणारे होते. ते शेती, दगडफोड, बांध घालणे वगैरे अंगमेहनतीची कामे करीत. श्री गुरुचरित्र व श्री शिवलीलामृत या ग्रंथांची त्यांनी शेकडो पारायणे केली. सेवाभावी वृत्ती, दीनांविषयी कणव, मनमिळाऊ स्वभाव, निरीच्छ आचरण यांमुळे ते डेरवण—सावर्डे परिसरात लोकप्रिय होते. गुरुसेवा, परमार्थ चिंतन यांत त्यांचा खूप वेळ जाई. मंत्रसाधना करून त्याचा उपयोग त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी केला.

१८ जानेवारी १९६९ रोजी सीतारामबुवा वालावलकर समाधिस्थ झाले. त्यांना श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या परंपरेतील एक थोर संत अशी मान्यता लाभली. त्यांनी चंदनासारखा देह झिजवून आपल्या जन्माचे सार्थक केले. पुढील पिढ्यांना त्यांनी लोकसेवा, प्रेम व भक्ती आणि शारीरिक कष्टांची प्रेरणा दिली. सीतारामबुवांनी नि:स्वार्थपणे समाजसेवेचा आदर्श दिला. डेरवणला संत वहाळकर, संत वालावलकर यांची पुण्यतिथी, दासनवमी (माघ वद्य नवमी), शिवछत्रपती जयंती वगैरे उत्सव साजरे होतात.

वि.ग. जोशी

वालावलकर, सीताराम बुवा