Skip to main content
x

वाळिंबे, सदाशिव चिंतामण

     स्वभावाने गरीब व कष्टाळू मातोश्रींच्या पोटी एका साधारण कुटुंबामध्ये कोपरगाव जि. अहमदनगर इथेे सदाशिव चिंतामण वाळिंबे यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच अभ्यासा बरोबर क्रिकेट व टेनिस यासारख्या खेळांमध्ये त्यांना रुची होती. इ.स. १९२५ मध्ये पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालया’तून मॅट्रिकची परीक्षा तर इ.स. १९२७ मध्ये पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामधून इंटर सायन्स व पुढे इ.स. १९२९ मध्ये पदार्थ विज्ञान व रसायन शास्त्र विषय घेऊन बी.एस्सी.ची पदवी संपादिली. सुमारे ५ वर्षे अध्यापनाचे काम केल्यानंतर १९३४ मध्ये बी.टी. चे प्रशिक्षण पूर्ण केले. याच काळात जी.डी.सी. व वी.डी.सी. अँड ए. सारखे लेखा व व्यापारशास्त्राशी संबंधित अभ्यासक्रमही अवगत केले. एक वर्ष कमी वेतन घेऊन मुंबईत त्यांनी बँकेत नोकरी केली. 

     शिक्षकी पेशाचे हे प्रशिक्षण बी.टी. घेतल्यामुळे शेवटी अहमदनगरच्या ‘युनियन ट्रेनिंग कॉलेज’मध्ये गणित व शास्त्र विषयाचे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून १९३७ ते १९५२ अशी १५ वर्षे उत्तम शिक्षक घडविण्याचे काम केले. याच काळात ‘वाणिज्य पदविके’चा वर्ग चालविण्याचाही प्रयोग केला. श्रमनिष्ठेवर आधारित व्यावसायिक शिक्षण पद्धती (म. गांधी कृत ‘वर्धा योजना’) राबविण्याचा प्रयत्न केला. पदवी परीक्षेस ‘गणित’ स्वतंत्र विषय नसतानाही इ. स. १९४० ते १९६० या कालखंडात व्यावहारिक अंकगणित, स्वावलंबी अंकगणित, प्राथमिक अंकगणित, नागरिकांचे अंकगणित, नवीन व्यावहारिक अंकगणित, अंकगणित, नवीन माध्यमिक भूमिती, नवगणित, भूमिती सारखी पाठ्यपुस्तके (इ. ८ वी ते ११ वी) जोशी, लोखंडे, चितांबर, घारे यांच्या सहकार्याने लिहिली ती सर्व महाराष्ट्रात गाजली.

     इ.स. १९५२ ते १९६८ सुमारे १६ वर्षे अहमदनगर येथील ‘अमेरिकन मिशन गर्लस् स्कूल’मध्ये गणितासारख्या अमूर्त विषयास मूर्त रूपामध्ये, प्रात्यक्षिकांसह सादर करून मुलींमध्ये आत्मविश्‍वास रुजविण्याचे काम केले. ‘मॅथस् क्लब’ व ‘वार्ता विहार’ सारखे उपक्रम राबवून विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाविषयीची गोडी निर्माण केली. याच सेवाभावी प्रामाणिक वृत्तीची दखल घेऊन केंद्र शासनाने १९ जाने. १९६० रोजी त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्रदान केला.

     अधिकार आणि हक्काशिवाय केवळ भरपूर काम आणि कमी पगार, नोकरीची शाश्‍वती नाही अशा विचित्र अवस्थेत असणाऱ्या तत्कालीन शिक्षकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करून शैक्षणिक उपक्रमाबरोबरच शिक्षकांच्या आर्थिक स्वस्थतेसाठी प्रयत्न म्हणून इ.स. १९४० मध्ये शहर माध्य. शिक्षक संघांच्या स्थापनेत सदूभाऊंचा पुढाकार होता. इ.स. १९४२ मध्ये या संघाचे जिल्हा माध्य. संघात रूपांतर झाले. इ. स. १९४४ मध्ये शिक्षकांची पतपेढी सुरू होऊन रेशन व कापड दुकाने चालविली गेली. अहमदनगर येथे माध्य. शिक्षक भवनाची कल्पना पुढे आल्यानंतर वाळिंबे, सन १९६० मध्ये रु. ५०० ची देणगी व सन १९६८ मध्ये पुन्हा रु. ५०० ची देणगी देऊन आत्मीक समाधानाचे भागीदार झाले. पुढे मामासाहेब हतवळणेंच्या मार्गदर्शनाखाली रू. ५ लाखाची इमारत उभी राहिली. जिल्हा माध्य. शिक्षक संघाचे कार्यवाह अध्यक्ष, माध्य. शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष, राज्य शिक्षक संघावर जिल्हा प्रतिनिधी इ. विविध पदांचा भार सांभाळीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.

     शिक्षकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी सुमारे ७०० शिक्षकांकडून प्रश्‍नावली भरून घेऊन त्याचा समर्पक अहवाल तत्कालीन ‘देसाई समिती’ पुढे सादर केला. शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी वेतन उपदान, निवृत्ती वेतन इ. च्या आवश्यकतेवर ‘अध्यापक’ मासिकामधून वेळोवेळी लेखन केले. शालान्त परीक्षेच्या वाढीव शुल्का संदर्भात विद्यार्थ्यांची बाजू मांडली. गणित अध्यापन साहित्याचे अहमदनगर येथे प्रदर्शन भरविले. शालान्त परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणित विषयाचे तसेच एस. टी. सी. च्या विद्यार्थी - शिक्षकांनाही वर्षानुवर्षे मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून १० वर्षे काम पाहिले. शिक्षण विषयक विचार मांडताना ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण व मातृभाषेच्या माध्यमाचा आग्रह धरतानाचा कार्यानुभव, हस्तकौशल्य व श्रमप्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व देऊन उच्च शिक्षणासाठी किमान गुणांची अट आवश्यक असल्याचे सांगितले.  केवळ विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विश्‍वात रमलेल्या सदूभाऊंचे ६ मार्च २००० रोजी निधन झाले.

     - प्रा. विश्‍वास काळे

संदर्भ
१. वाळिंबे स. चिं. आत्मचरित्र  ;‘चिंतामणी ’ .
वाळिंबे, सदाशिव चिंतामण