Skip to main content
x

वाळिंबे, सुभाष रामचंद्र

     पुरातत्त्वीय स्थळांवर उत्खननात अनेकदा मानवांची दफने आढळून येतात. मानवी अस्थींचा सखोल अभ्यास करून प्राचीन काळातील मानवांसंबंधी विविध प्रकारचे निष्कर्ष काढता येतात. मानवी अस्थिपंजराचा जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणार्‍या शाखेला पुरामानवविज्ञान (पॅलिओअँथ्रॉपॉलॉजी) असे म्हणतात. या विषयाला संपूर्णपणे वाहिलेली सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा डेक्कन कॉलेजमध्ये निर्माण करणे व ती वाढवणे हे सुभाष रामचंद्र वाळिंबे यांचे प्रमुख योगदान आहे. प्रा. वाळिंबे यांनी पुणे विद्यापीठातून प्राणिविज्ञान या विषयात बी.एस्सी. ही पदवी घेतल्यानंतर मानवविज्ञान या विषयात १९७२मध्ये एम.एस्सी. ही पदवी घेतली. त्यानंतर १९७२ ते १९७५ या काळात त्यांनी कोलकाता येथे भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण या संस्थेत नोकरी केली. ते १९७६मध्ये पुणे विद्यापीठाच्या वारली जमातीवरील संशोधन प्रकल्पात सहभागी झाले. नोकरीच्या दरम्यान त्यांनी डॉक्टरेटसाठी संशोधन केले व १९७८मध्ये ‘बायो-जेनेटिक अ‍ॅफिनिटिज ऑफ कोलीज ऑफ महाराष्ट्र’ हा प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. १९८०मध्ये ते डेक्कन कॉलेजमध्ये व्याख्याता या पदावर रुजू झाले व तेथे ते २००९पर्यंत होते. त्यानंतर ते २०१०मध्ये पुणे विद्यापीठातून प्राध्यापक या पदावरून निवृत्त झाले. त्यांचे भारतातील व परदेशांतील नियतकालिकांत ८० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

     प्रा. वाळिंबे यांनी त्यांच्या तीस वर्षांच्या सेवाकाळात पुरामानवविज्ञानाच्या अनेक पैलूंवर मूलभूत संशोधन केले. पुरामानवविज्ञानात मानवसमूहाच्या उत्क्रांतीचा व त्या दरम्यान झालेल्या जैविक व सांंस्कृतिक बदलांचा मागोवा घेतला जातो. प्रा. वाळिंबे यांचे संशोधन प्रामुख्याने जैविक पैलूंशी निगडित होते. पुरामानवविज्ञानाचे अनेक प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या सर्व संशोधनाचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.

     मानवाने शेतीला सुरुवात केल्यानंतर दातांच्या रचनेत फरक पडला ही सिद्धान्तकल्पना योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी १९८४-१९८६ दरम्यान ओरेगॉन विद्यापीठातील प्रा. जॉन ल्युकाक्स यांच्या सहकार्याने एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला. त्याचप्रमाणे वाळिंबे व ल्युकाक्स यांनी डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या ताम्रपाषाणयुगीन सांगाड्यांच्या दातांचा त्या दृष्टीकोनातून विशेष अभ्यास केला. प्रा. वाळिंबे यांनी कोळी जमातीच्या केवळ परस्परांशी लग्नसंबंध ठेवणार्‍या सहा गटांवर संशोधन करताना त्यांच्या शरीराची पुरामानववैज्ञानिक पद्धतीने मोजमापे केली. हे काम त्यांनी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये केले होते.

     पुरातत्त्वीय स्थळांवर उत्खननात मिळणार्‍या मानवी अस्थींवरून त्या काळातील आहाराचा व कुपोषणाचा अभ्यास करण्यासाठी आजच्या काळातील मानवाचा अभ्यास करणे गरजेचे असते. प्रा. वाळिंबे यांनी जवळजवळ क्ष-किरण वापरून १५०० अस्थी नमुन्यांचा अभ्यास केला व त्यांची पुरातत्त्वीय अस्थींशी तुलना केली. शेतीला प्रारंभ केलेल्या मानवसमूहांचा त्यांच्या अस्थींवरून सर्वांगीण अभ्यास करण्याचे महत्त्वाचे कार्य प्रा. वाळिंबे यांनी केले. त्यांनी नेवासे, चांडोली, इनामगाव, कवठे व दायमाबाद या ताम्रपाषाणयुगीन स्थळांवर मिळालेल्या सर्व मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास केला. माणूस जिवंत असताना त्याला जे काही विकार होतात अथवा त्याला ज्या सर्व शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांमधल्या काहींच्या खुणा अस्थींवर व दातांवर दिसून येतात. पुरातत्त्वीय स्थळांवर उत्खननात मिळणार्‍या मानवी अस्थी आणि दात यांच्या अवशेषांचा उपयोग करून प्राचीन काळातील रोग-विकार अथवा शारीरिक विकृती यांचा सखोल अभ्यास पुरामानवविज्ञानाच्या पुराविकृतिविज्ञान या उपशाखेत केला जातो. भारतात अशा प्रकारचे संशोधन करण्याचे श्रेय प्रा. वाळिंबे यांचे आहे. तसेच त्यांनी प्राचीन आहारासंबंधी (पॅलिओडाएट) अतिशय महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत

     हिमालयात रूपकुंड या हिमनदीच्या भागात बर्फामध्ये अनेक माणसांचे अवशेष आढळले आहेत. तेथे नॅशनल जिओग्रफिक या वाहिनीने केलेल्या मोहिमेत प्रा. वाळिंबे यांचा सहभाग होता. रूपकुंड येथे मिळालेल्या मानवी अवशेषांमधील डीएनए रेणूंचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी डेक्कन कॉलेजमधील डॉ. प्रमोद जोगळेकर व हैद्राबाद येथील डॉ. लालजी सिंग यांच्या सहकार्याने भारतातील पहिली प्राचीन डीएनए प्रयोगशाळा कार्यान्वित केली. तसेच डॉ. लालजी सिंग यांच्यासह त्यांनी महादेव, कोळी, वारली, ठाकर, कातकरी व गोंड अशा आदिवासींच्या डीएनए रेणूंमधील विविधता पाहण्याचा प्रकल्प पूर्ण केला. डीएनए रेणूंमधील विविधता तपासून वेगवेगळ्या जमातींची गेल्या काही शतकांमधील स्थलांतरे व त्यांच्यातील जैविक घडामोडी यांचा मागोवा घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता.

डॉ. प्रमोद जोगळेकर

वाळिंबे, सुभाष रामचंद्र