Skip to main content
x

वाळंबे, मोरेश्वर रामचंद्र

     शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे व शुद्धलेखनाचे ज्ञान व्हावे म्हणून तळमळीने ग्रंथलेखन करणारे भाषातज्ज्ञ, अनुवादक व चरित्र लेखक मोरेश्वर वाळंबे यांचे शिक्षण बी.ए.बी.टी.पर्यंत झाले. कोल्हापूर येथे पाच वर्षे, सातारा येथे पंधरा वर्षे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्रशाला, पुणे येथे दोन वर्षे, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे चौदा वर्षे, अशी १९३७ ते १९७३ सालापर्यंत तीन तपे शिक्षक, पर्यवेक्षक, शाळाप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात नऊ वर्षे, मराठीचे संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या मराठी शब्दकोशाचे साहाय्यक संपादकपदही त्यांनी भूषविले होते.

     ‘डॉ. बाळकृष्ण चरित्र, कार्य व आठवणी’ (१९४२) हे मो.रा.वाळंबे यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकातून त्यांनी इतिहास संशोधक डॉ. बाळकृष्ण यांचे जीवनदर्शन घडविले आहे. इंग्रजी भाषेचा चांगला व्यासंग असल्याने, इंग्रजी भाषेतील अलंकारांची मराठीतून ओळख करून देण्यासाठी त्यांनी १९४५मध्ये ‘आंग्लभाषेचे अलंकार’ हे पुस्तक लिहिले. ‘बॉर्न फ्री’ या इंग्रजी ग्रंथाचा ‘वनराणी एल्सा’ या नावाने संक्षिप्त अनुवाद करून तो ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.

     ‘शिकारीच्या सत्यकथा’ (१९६०) हे त्यांचे शिकारविषयक लेख असलेले पुस्तक लक्षवेधी आहे. मात्र त्यांची प्रमुख कामगिरी म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असा दृष्टिकोन ठेवून ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’ (१९६५), ‘मराठी व्याकरण’ (इयत्ता पाचवी ते सातवी), ‘शुद्धलेखन परिचय’ (१९६५), ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ (इयत्ता आठवी, नववी, दहावी), ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ (१९७२) अशी व्याकरणविषयक व शुद्धलेखनावरची ग्रंथरचना होय.

     ते हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे मराठी व्याकरणासारखा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय सहज, सोप्या भाषेतून व उदाहरणे देऊन त्यांनी समजावून दिलेला आहे. विद्यार्थ्यांची मराठी भाषाविषयक जाणीव समृद्ध व्हावी यासाठी तळमळीने कार्य करणारा भाषातज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख कायम राहील.

- डॉ. संजय देशमुख

वाळंबे, मोरेश्वर रामचंद्र