Skip to main content
x

वानखेडे, अशोक शिवराम

          शोक शिवराम वानखेडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. त्यांना लहानपणापासूनच  शेतीविषयी आवड होती. त्यांच्याकडे फुलशेती २ हेक्टर, संत्रा बाग २ हेक्टर, मोसंबी २ हेक्टर असून त्यांनी आपल्या शेतीवर चिकू आणि आंबा यांची लागवड केलेली आहे. उसामध्ये ते बटाटा, गहू आणि हरभरा यांचे आंतरपीक घेत आहेत. उन्हाळी हंगामामध्ये भुईमूग, तीळ व चवळी ही पिके प्रामुख्याने घेतात. त्यांना २००२मध्ये वसंतराव नाईक शेतिमित्र पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला आहे. तसेच आर.सी.एफ. या भारत सरकारच्या मुंबई येथील संस्थेने त्यांचा २००५ व २००७मध्ये सन्मान केलेला आहे. कुणबी समाजातर्फे त्यांना कृषिभूषण पुरस्कार दिलेला आहे. वानखडे यांनी ग्रामीण रोजगार योजनेतून फळबागा सजवल्या आहेत. त्यांनी सुकळीला कृषी प्रबोधन करणारे विज्ञान मंडळ स्थापन केले आहे. ते स्वतः त्याचे अध्यक्ष आहेत.

          कृषि-प्रबोधन करणारे सुकळीचे हे विज्ञानमंडळ पूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्धीस आले आहे. वानखेडे यांनी आंतरपीक पद्धतीचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. ते सर्व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणूनच डॉ.पं.दे.कृ.वि.ने कृषिदूत या सन्मानाने गौरवले आहे.

          वानखेडे यांनी स्थापन केलेले युवा कृषी विज्ञान मंडळ हे तालुक्यामध्ये नावलौकिकास आले आहे. त्यांनी तालुका स्तरावर सेंद्रिय शेतीचा मोठ्या हिरिरीने  प्रचार व प्रसार केला आहे. विज्ञान मंडळाद्वारे ते नेहमी शेतकर्‍यांना पाणलोट प्रकल्प, जलसंवर्धन, वनीकरण व स्वयंरोजगार याबद्दलचे प्रबोधन करत असतात व शेतकर्‍यांपर्यंत अद्ययावत कृषी विज्ञान पोहोवण्याचे कार्य करत असतात.

- प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

वानखेडे, अशोक शिवराम