Skip to main content
x

वानखेडे, संजय गोविंद

              संजय गोविंद वानखेडे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे झाला. त्यांचे वडील पंचायत समितीत कारकून होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बाळापूर येथेच झाले. त्यांनी डॉ. पं.दे.कृ.वि.तून १९७५मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी घेतली व १९७८ मध्ये कृषि-रसायन व मृदाशास्त्र विषयात आय.आय.टी. खरगपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व १९९४मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. वानखेडे यांनी १९७९मध्ये तेथूनच सॉइल टेक्नालॉजीची पदविकाही मिळवली आहे. त्यांनी १९८३मध्ये डॉ. पं.दे.कृ.वि.च्या नवेगाव बांध येथील ऊस संशोधन केंद्रात कनिष्ठ संशोधन साहाय्यक म्हणून नोकरीला सुरुवात केली.

              त्यानंतर त्यांनी डॉ.पं.दे.कृ.वि.च्या उपकरण योजना विभागामध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम केले. सध्या ते नागार्जुन वनौषधी उद्यान येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी वनौषधी उद्यानामध्ये ४३० प्रजातींचे संकलन व संगोपन केलेले आहे. त्यांनी सत्तर संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांनी औषधी वनस्पतीविषयीच्या ‘मेडिसिनल प्लँटस्’ या पुस्तकात एक प्रकरण लिहिले आहे.

              वानखेडे यांना डॉ. पं.दे.कृ.वि.तर्फे डॉ. के.जी. जोशी पारितोषिक १९९२-१९९३मध्ये; तसेच त्यांना २००५-०६ मध्ये सुवर्णपदकही देण्यात आले. त्यांना २००३-०४मध्ये डॉ. राधाकिसन शांती मल्होत्रा रोख पारितोषिक देऊन गौरवले आहे. त्यांनी ‘मेडिसिनल प्लँटस्’ या विषयावर एक ध्वनिचित्र चकती तयार केली. औषधी वनस्पतींच्या लागवडीवर दोन पुस्तिका प्रकाशित केल्या.

 - प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

वानखेडे, संजय गोविंद